पणजीत ठिकठिकाणी कचर्‍याचे साम्राज्य

0
77

मनपा कामगारांचा संप सुरूच
वेतन वाढ व सेवेत नियमीत करण्याच्या मागणीसाठी पणजी महापालिकेच्या कामगारांचा काल दुसर्‍या दिवशीही संप चालू होता. त्यामुळे अनेक ठिकाणी कचर्‍याचे ढिग साठले आहेत. मागण्या पूर्ण होईपर्यंत संप चालू ठेवणार असल्याचे त्यांच्या संघटनेचे नेते अजित सिंह राणे यांनी काल पत्रकारांना सांगितले.सुमारे ६५० कामगार संपावर असून काल सकाळी ते महापालिकेसमोर आंदोलनास बसले होते. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या उपस्थितीत महापालिकेचा एक कार्यक्रम होणार होता. त्यामुळे तेथील सर्व कामगारांना आझाद मैदानावर पाठविले. परंतु कार्यक्रम रद्द झाला. आता पुन्हा आझाद मैदानावरून कामगारांना हाकलण्याचे प्रयत्न महापौर व महापालिकेचे आयुक्त करीत आहेत. संघटनेच्या नेत्यांना पोलिसी बळाचा वापर करून धमक्या देण्याचे सत्र सुरू केल्याचे राणे यांनी सांगितले. गुन्हेगारी कारवाया करीत असल्याचा आरोप करून कामगार संघटनेचे नेते शामसुंदर परब यांना काल पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. कामगारांचा संप मोडून काढण्यासाठी प्रतीदिनी एक हजार रुपये वेतन देऊन बाहेरील म्हणजे बांधकाम स्थळांवरील कामगारांना आणल्याचे राणे यांनी सांगितले. हा प्रकार खपवून न घेण्याचा इशारा राणे यांनी दिला. महापौर सुरेंद्र फुर्तादो यांना यासंबंधी विचारले असता शहरातील कचरा उचलण्यासाठी ६ ट्रक व ५० मजूर आणल्याचे त्यांनी सांगितले.