द्रष्टे समाजसुधारक ः महात्मा जोतिराव फुले

0
210
  •  डॉ. सोमनाथ कोमरपंत

 

धर्माधिष्ठित बौद्धिक गुलामगिरी, सामाजिक विषमता, उच्च-नीचतेच्या कृत्रिम श्रेणी आणि आर्थिक शोषणप्रक्रिया यांवर त्यांनी कठोरपणे आसूड ओढला. शब्दप्रामाण्य, रूढिपरंपरा, कर्मकांड, जपजाप्य, ईश्‍वरी संकेत आणि स्वर्ग-नरक संकल्पना यांच्या आहारी गेल्यामुळे आपला भारतीय समाज दुबळा झाला होता.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात वैचारिक मंथनप्रक्रिया होऊन प्रबोधनाची पहाट उजाडली. या प्रक्रियेचे अध्वर्यू म्हणून महात्मा जोतिराव फुले यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्यांच्या क्रांतदर्शी व्यक्तिमत्त्वाचे रहस्य शोधताना एक बाब अधोरेखित करता येईल की त्यांना मनुष्यजातीविषयी कणव होती. ते ‘माणसा’चा शोध घेत होते. ज्यांना मानवी जीवनातील दुःख कळलेले असते त्या परमकारुणिकाला माणसाच्या अभ्युदयाची आच लागून राहिलेली असते. त्या ध्यासामुळे त्यांनी आपले आयुष्य समर्पित केलेले असते. काळाची पावले त्यांना अगोदरच दिसत असतात. र्‍हस्व दृष्टीच्या माणसांना त्यांची जीवनस्वप्ने आकळत नसतात. येथेच तर संघर्षाची पहिली ठिणगी पडत असते. महात्मा फुले यांच्या काळात व्यक्तीविरुद्ध समाज असा जो संघर्ष निर्माण झाला, तो काळ आपण समजावून घ्यायला हवा, संघर्षाची मूलबीजे समजावून घ्यायला हवीत. आज आपण म्हणतो खरे की आपला समाज सुधारला. मने प्रगल्भ झाली आहेत. पण कुठे सुधारणा झाली आहे? माणसे पूर्वी जशी जीर्णमतवादी होती तशीच ती आहेत. मनसिकता तशीच आहे. आपल्या संबंधीच्या संवेदना बधिर झाल्या आहेत म्हणून समोरचे प्रखर वास्तव आपल्याला दिसत नाही.

या पार्श्‍वभूमीवर महात्मा फुले यांच्या व्यक्तित्वाचा शोध घ्यायचा आहे. महात्मा फुले यांनी पारमार्थिकतेतून ऐहिकतेकडे समाजाची दृष्टी वळवली. समाजमनाच्या गाभ्यालाच त्यांनी हात घातला. सामाजिक असंतोषाचे ते जनक ठरले. धर्माधिष्ठित बौद्धिक गुलामगिरी, सामाजिक विषमता, उच्च-नीचतेच्या कृत्रिम श्रेणी आणि आर्थिक शोषणप्रक्रिया यांवर त्यांनी कठोरपणे आसूड ओढला. शब्दप्रामाण्य, रूढिपरंपरा, कर्मकांड, जपजाप्य, ईश्‍वरी संकेत आणि स्वर्ग-नरक संकल्पना यांच्या आहारी गेल्यामुळे आपला भारतीय समाज दुबळा झाला होता. सर्वंकष अवनतीमुळे आपल्यावर राजकीय परतंत्र्य ओढवले होते. पण अज्ञानामुळे अन् दारिद्य्रामुळे आपल्याला त्याची जाणीवही नव्हती. याचा प्रथमतः उद्रेक झाला तो महाराष्ट्रात आणि बंगालमध्ये. त्या काळातील प्रबोधनकारांनी केलेल्या चळवळींमुळे समाजमानस खडबडून जागे झाले.
महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनाची जडणघडण कशी झाली याचा आलेख समजून घ्यायला हवा. संवेदनक्षम वयात त्यांना सदाशिव गोवंडे, बापू रावजी मांडे आणि विष्णू मोरेश्‍वर भिडे या मित्रांचा सहवास लाभला. गोवंडे यांच्यासमवेत त्यांनी शिवाजीमहाराज आणि जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या चरित्रांचे वाचन केले. या चरित्रनायकांची वीरवृत्ती, राष्ट्रनिष्ठा आणि उदात्त ध्येयदृष्टी यांपासून त्यांनी प्रेरणा घेतली. देशबांधवांची सेवा करण्यासाठी जीवन व्यतीत करण्याचा त्यांनी संकल्प सोडला. प्रचलित समाजस्थितीविषयी कुणालाही जाणीव होत नाही हे पाहून त्यांच्या मनाला यातना व्हायच्या. खेड्यापाड्यांतील शेतकर्‍यांना ब्रिटिशांच्या राजवटीतील शांतता आणि सुव्यवस्था हे वरदान आहे असे वाटायचे. आधुनिक कालखंडातील औद्योगिकीकरणामुळे दिपून गेलेले लोक आणि संधिसाधू व्यापारीवर्ग परकीय सत्तेचे लांगुलचालन करण्यात गुंतला होता. या परभृत प्रवृत्तीविरुद्ध लढा द्यावा असे महात्मा फुले यांना वाटू लागले. समाजाच्या अधःस्तरावरील माणसांच्या आर्थिक दुःस्थितीचे आणि अज्ञानाचे दर्शन त्यांना घडले होते. हिंदुधर्मातील अनेक दैवतांची उपासना आणि जातिभेद या बाबींविषयी त्यांना तिटकारा वाटत असे. अस्पृश्यता पाळणे हा त्यांना निर्घृण गुन्हा वाटत होता. मानवतावादाचा प्रभाव त्यांच्यावर पडला होता. क्रांतिकारी स्वरूपाचे विचार मांडणारे लेखक थॉमस पेन यांच्या ‘राईटस् ऑफ मॅन’ या ग्रंथातील उदात्त विचारांचा प्रभाव त्यांच्या मनावर पडला. ‘परमहंससभे’कडे त्यांनी आपला संपर्क ठेवला होता. सर्व धर्मग्रंथ मनुष्यनिर्मित, सृष्टी एकमेव ईश्‍वरदत्त ग्रंथ, सत्यनिष्ठा व नीतिमत्ता या मूल्यांवरील निष्ठा, जातिभेद व अस्पृश्यता यांना सक्त विरोध, स्त्रीशिक्षण, प्रौढविवाह व पुनर्विवाह यांना पाठिंबा याबाबतीत ‘परमहंसमंडळी’ आणि महात्मा फुले यांच्यामध्ये समानधर्मेपण होते. दादोबा पांडुरंग तर्खडकर हे ‘परमहंससभे’चे आद्य प्रवर्तक होते.

जोतिराव फुले यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान
आदर्श जीवनाकडे वाटचाल करण्याची धडपड जोतिराव फुले यांच्या व्यक्तिमत्त्वात होती. सदाचार, विवेकनिष्ठा, न्यायप्रियता आणि सहिष्णुता ही त्यांच्या जीवनाची चतुःसूत्री होती. हे शब्द उच्चारायला अत्यंत सोपे, परंतु आचरण करण्यासाठी अत्यंत कठीण.
ध्येयाविषयीची अविचल निष्ठा हा त्यांचा स्थायीभाव असल्यामुळे फुले यांना ते शक्य झाले. उद्योगशीलता, प्रामाणिकपणा, कृतज्ञता, नम्रता, अकृत्रिमता आणि मानवतावादाचे आचरण या मानवाचे उन्नयन करणार्‍या सात्त्विक प्रवृत्तींवर त्यांची नितांत श्रद्धा होती. समतावादाचा त्यांनी सतत पुरस्कार केला. मानवाची सम्यक उन्नती आणि प्रतिष्ठा यांसाठी ते आयुष्यभर झटले. ‘सत्यवर्तन केल्याशिवाय मानव सुखी होणार नाही’ हे त्यांच्या जीवनाचे ब्रीदवाक्य होते. तुकारामांनी अभंग लिहिले. महात्मा फुले यांनी आधुनिक समाजमानसाच्या जडणघडणीसाठी अखंड लिहिले. ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या ग्रंथाच्या प्रारंभी ते म्हणतात ः
सत्य सर्वांचे आदी घर| सर्व धर्मांचे माहेर ॥
जगामाजी सुख सारे| खास सत्याची ती पोरे ॥
१८७३ च्या सप्टेंबर महिन्यात महात्मा फुले यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. कर्मकांडाच्या जोखडातून समाजाला मुक्त करण्यासाठी आणि बहुजनसमाजाला विद्यासंपन्न करून त्यांचे मूलभूत हक्क समजावून देण्यासाठी या समाजाची त्यांनी स्थापना केली.

सत्यशोधक समाजाची प्रमुख तत्त्वे अशी ः
१. ईश्‍वर एक असून तो सर्वव्यापी, निर्विकार, निर्गुण व सत्यरूप आहे.
२. ईश्‍वराची भक्ती करण्याचा प्रत्येक मानवाला पूर्ण अधिकार आहे.
आईवडिलांस संतुष्ट करण्यासाठी जशी मध्यस्थाची जरूरी नसते, तशी सर्वसाक्षी परमेश्‍वराची भक्ती करण्यासाठी भट दलालाची आवश्यकता नाही. सत्यरूप ईश्‍वराची भक्ती आपापल्या कुवतीप्रमाणे करावी.
३. मनुष्य जातीने श्रेष्ठ ठरत नसून तो गुणांनी श्रेष्ठ ठरतो.
यावरून ‘सत्यशोधक समाजा’ची बैठक मानवतावादी मूल्यांवर आधारलेली आहे, विषमतेला तेथे मुळीच थारा नाही हे सहजतेने लक्षात येते. त्यांचे युगधर्माचे आकलन दिसून येते.

हिंदुधर्मातील प्रचलित वर्णव्यवस्था सर्वस्वी त्याज्य आहे हे महात्मा फुले यांनी स्पष्टपणे सांगितले. वर्णव्यवस्था ही कालबाह्य बाब आहे हे वस्तुनिष्ठ सत्य त्यांनी अधोरेखित केले आहे. फुले यांचे चरित्रकार धनंजय कीर म्हणतात ः
‘आधुनिक भारतामध्ये सामाजिक पुनर्घटनेसाठी चळवळ सुरू करणारी पहिली संस्था म्हणजे सत्यशोधक समाज होय. सत्यशोधक समाजाने सामाजिक गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजाचा आवाज हा हिंदुस्थानात अनेक दशके दडपून टाकलेल्या कनिष्ट समाजाची किंकाळी होय.’ महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे समर्पित सहजीवन म्हणजे एक यज्ञ आहे. त्यांनी स्त्रीशिक्षणप्रसारासाठी केलेल्या प्रयत्नांचा सविस्तर मागोवा घ्यावा लागेल. ते एक खडतर पर्व आहे.

महात्मा फुले यांची वाङ्‌मयसंपदा
पुरोगामी विचारांच्या प्रसारार्थ आणि समाजसुधारणेचे एक साधन म्हणून ज्योतिरावांनी वाङ्‌मयनिर्मिती केली. त्यांनी इ.स. १८६९ मध्ये ‘छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा’ रचला. ‘ब्राह्मणांचे कसब’ या ग्रंथात त्यांनी मागासलेल्या लोकांचे अज्ञान व अंधश्रद्धा यांचे दर्शन घडविले. ‘गुलामगिरी’ या ग्रंथात मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम इत्यादींच्या संबंधीच्या पौराणिक कथांचे पुनरावलोकन केले आहे. आर्य व येथील आदिवासी समाज यांच्यामधील संघर्ष किती तीव्र स्वरूपाचा होता हे त्यांनी दाखवून दिले आहे. ‘शेतकर्‍यांचा असूड’ या ग्रंथात त्यांनी शेतकर्‍यांच्या दुरवस्थेचे विदारक चित्रण केले आहे.
‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा त्यांचा शेवटचा आणि महत्त्वपूर्ण ग्रंथ. हा समाजमनस्क पुरुष सदैव प्रातःस्मरणीय आहे.