दोन मुलांना फिनेल पाजून मातेचाही आत्महत्येचा प्रयत्न

0
19

>> कौटुंबिक भांडणातून उचलले पाऊल

>> पर्वरी पोलिसांत मातेविरुद्ध गुन्हा दाखल

>> उपचारानंतर मातेसह मुलांची प्रकृती स्थिर

पती-पत्नीतील कौटुंबिक भांडणातून सुकूरमधील एका मातेने स्वतः फिनेल प्राशन केले, शिवाय आपल्या छोट्या दोन मुलांना फिनेल पाजले. सोमवारी ही घटना घडली. सदर महिलेच्या पतीने पर्वरी पोलीस स्थानकात या प्रकरणी तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी तिघांना गोमेकॉमध्ये उपचारासाठी दाखल केले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी आराडी-सुकूर येथील लक्ष्मी शिवनगौडा हिडामणी (26) या महिलेने रागाच्या भरात स्वतः फिनेल पिऊन नंतर स्वतःच्या 3 आणि 5 वर्षीय दोन मुलांना तेच फिनेल पाजून मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पती शिवनगौडा हिडामणी याने पर्वरी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहिता-2023, 109 कलम व 8(2) गोवा बाल कायदा-2003 अन्वये गुन्हा नोंदवला. उपनिरीक्षक लॉरेन सिकेरा पुढील तपास करीत आहेत.