देशाची अखंडता राखण्यात पटेलांचा मोलाचा वाटा ः नायडू

0
2

>> राजभवनात एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रम

देशाची अखंडता राखण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा मोलाचा वाटा होता, असे प्रतिपादन भारताचे माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी दोनापावल येथील राजभवनाच्या नवीन दरबार सभागृहात आयोजित एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमात बोलताना काल केले.
यावेळी गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई व इतर मान्यवरांची उपस्थिती होती. आंध्र प्रदेश, छत्तीसगड, हरयाणा, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, पंजाब आणि तामिळनाडू तसेच अंदमान आणि निकोबार बेट, चंदीगड, दिल्ली, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरी या 5 केंद्रशासित प्रदेशांच्या स्थापना दिनानिमित्त एक भारत, श्रेष्ठ भारत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.स्वातंत्र्यानंतर भारताला वैभव प्राप्त होत आहे आणि एक मजबूत राष्ट्र बनत आहे. बारकाईने पाहिल्यास जगभरात भारताला ओळख आणि आदर आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील बहुतेक सीईओ भारतीय आहेत, असे श्री नायडू यांनी नमूद केले. माजी उपराष्ट्रपती नायडू यांनी राज्यपाल पिल्लई यांच्या कार्याचे कौतुक केले. राज्यपाल पिल्लई यांनी गोव्याच्या विविध भागांना भेटी देऊन गोमंतकीय जीवन आणि शैली जाणून घेण्याचे काम केले असल्याचे सांगून जात, पंथ आणि धर्म विचारात न घेता सर्वांनी एकजुटीने राहिल्यास मजबूत राष्ट्र निर्माण होईल असे प्रतिपादन नायडू यांनी यावेळी केले.