क्रीडापटूंसह सर्वांची कडक तपासणी करण्याचे पोलीस महासंचालकांचे निर्देेश

0
20

>> केरळ बॉम्बस्फोटामुळे सुरक्षा व्यवस्था कडक

केरळमधील कोची येथील साखळी बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. राज्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरू असल्याने सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. या स्पर्धांत सहभागी होणाऱ्या क्रीडापटूंसह सर्वांची कडक तपासणी करण्याचा निर्देश पोलीस महासंचालक डॉ. जसपाल सिंग यांनी दिला आहे. राज्यभरात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरू असलेल्या ठिकाणी गोव्याबरोबरच महाराष्ट्रातील जलद कृती दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
केरळ येथील बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने सर्व राज्यांना सतर्क राहण्याची सूचना केली आहे. पोलीस महासंचालक डॉ. सिंग यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढविण्याची सूचना केली आहे.

केरळ येथे घडलेल्या बॉम्बस्फोटाच्या घटनेची माहिती सर्व पोलीस अधिकाऱ्यांना दिली आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरू असलेल्या विविध ठिकाणी प्रत्येकाची कसून चौकशी केली जात आहे. कांपाल पणजी येथे क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणी महाराष्ट्रातील कमांडो तैनात करण्यात आले आहे. पोलिसांकडून क्रीडा स्पर्धांच्या ठिकाणी अनोळखी व्यक्तीच्या हालचाली किंवा बेवारस वस्तूंवर लक्ष ठेवले जात आहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुमारे 5 हजार पोलीस कर्मचारी, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या चार कंपन्या विविध ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. राज्यातील धार्मिक स्थळांच्या कार्यकारी समित्यांना परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून करून सुरक्षेचे नियम पाळावेत, असे आवाहन महासंचालकांनी केले आहे.