देशभरात कोरोना रुग्णसंख्येत वाढ

0
78

देशात गेल्या काही दिवसांत कोरोनाने उच्चांक गाठला असून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, उडिसा, तेलंगणा आदी सर्व राज्यांमध्ये गेल्या आठवड्यापेक्षा कितीतरी अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. तेलंगणा, कर्नाटक, उडिसामध्ये कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले असल्याने ही संख्या वाढल्याचे म्हणता येत असले तरी जेथे चाचण्यांचे प्रमाण वाढलेले नाही, तेथेही मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत. सर्वाधिक वाढ महाराष्ट्रात दिसून आली असून शनिवारी महाराष्ट्रात कोरोनाचे सोळा हजार नवे रुग्ण आढळले.

आंध्र प्रदेशमध्ये जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी दिसू लागली होती, परंतु गेल्या पाच दिवसांत रोज राज्यातील रुग्णसंख्या दहा हजारांवर जाताना दिसत आहे.
राजधानी दिल्लीमध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून जवळजवळ दीड महिना दैनंदिन रुग्णसंख्या कमी दिसत होती, पण गेल्या दहा दिवसांत दिल्लीमध्ये पुन्हा रुग्णांत वाढ दिसू लागली आहे. शनिवारी दोन हजार नवे रुग्ण आढळून आले. गेला दीड महिना हे प्रमाण रोज एक हजाराहून कमी असे होते. बिहार आणि उत्तर प्रदेशातील स्थलांतरित मजुर परतू लागल्याने ही वाढ दिसत असावी असे सांगितले जात आहे.

दिल्लीपेक्षा पुण्यामध्ये रुग्णसंख्या वाढत असून गेल्या काही दिवसांतील सततच्या वाढीनंतर पुण्यात सध्या एक लाख ६९ लाख जणांना केव्हा ना केव्हा कोरोनाची बाधा झाली आहे.
देशात कोरोना चाचण्यांची संख्या चार कोटी चौदा लाखांवर गेली आहे. दिवसाला साडे दहा लाख कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. १००३ सरकारी आणि ५८० खासगी प्रयोगशाळांत सध्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत.