कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले असून त्यांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. त्यामुळे देशात एकूण कोरोना रुग्णांच्या संशयितांची संख्या ११० झाली आहे.
दरम्यान, स्पेनमध्ये गेल्या २४ तासांत १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी स्पेनमध्ये कोरोनाचे दोन हजार नवे रुग्ण आढळले. युरोपमध्ये करोनामुळे प्रभावित झालेल्या देशांमध्ये इटलीनतंर स्पेनचा क्रमांक असून मोठा फटका बसला आहे. स्पेनमधून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशातील कोरोनाबाधितांची संख्या ७७५३ वर पोहोचली असून यामधील २८८ जणांचा मृत्यू झाला आहे.
बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातील खास कोरोना वॉर्डात आणखीन एका कोरोना संशयित रुग्णाला दाखल करण्यात आला आहे. आत्तापर्यंत एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही. एका कोरोना संशयित रुग्ण उपचार सुरू आहेत. संशयित रुग्णाचे रक्त तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३६६ प्रवाशांचे स्क्रिनिंग रविवारी करण्यात आले आहे. आरोग्य खात्याकडे ९२ प्रवाशांनी घरीच निरीक्षणासाठी नोंदणी केली आहे. बांबोळी येथील इस्पितळातून कोरोना संशयित २१ जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविले होते. त्यातील २० जणांच्या रक्त तपासणी अहवाल नकारात्मक आलेला आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.
३१ मार्चपर्यंत अभयारण्ये बंद
वनखात्याने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बोंडला प्राणी संग्रहालय, राज्यातील वन्यजीव अभयारण्य, नॅशनल पार्क येत्या ३१ मार्च २०२० पर्यत जनतेसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
या संबंधीचा आदेश अतिरिक्त प्रधान वनपाल संतोष कुमार यांनी काल जारी केला आहे. राज्य सरकारच्या कोरोनासंबंधीच्या मार्गदर्शक निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील सर्व खासगी प्रवासी, आंतरराज्य बसमध्ये रोज निर्जंतुकीकरण फवारणी करण्याची सूचना वाहतूक खात्याने केली आहे. बसा वाहकांनी सॅनिटायझर वापरण्यावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सूचनेच्या अंमलबजावणीकडे लक्ष देण्याचे साहाय्यक संचालकांना आदेश देण्यात आला आहे.
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर पहिली ते आठवीपर्यंतच्या अंतिम परीक्षा रद्द करण्याचा निर्णय म्हापसा येथील एका विद्यालयाने घेतला आहे. केवळ इयत्ता नववीची परीक्षा आवश्यक सुरक्षा उपाययोजनेची व्यवस्था करून घेतली जाणार आहे. सरकारच्या उत्तीर्ण नियमानुसार मुलांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे, असे विद्यालयाने पालकांना एका नोटीसद्वारे कळविले आहे.
कोरोनाचा पर्यटनावर विपरित परिणाम
जागतिक मंदी पाठोपाठ आता कोरोनाच्या फैलावामुळे राज्यातील पर्यटन व्यवसायावर कधी नव्हे एवढा परिणाम झालेला आहे. किनारपट्टीवरील शॅकवाले, टॅक्सीवाले, गेस्ट हाऊजचे मालक आदींना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकांकडून कर्ज घेतलेले शॅकवाले व अन्य व्यावसायिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे सरकारने या लोकांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. शॅकवाल्यानी विजेसाठी भरलेले शुल्क त्यांना विनाविलंब सरकारने परत करावे. पर्यटन व्यावसायातील जे लोक बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडण्यास असमर्थ आहेत त्यांच्याकडून पुढील ७-८ महिने हप्ते वसूल करू नयेत अशी विनंती सरकारने बँकांना करावी. तसेच पुढील वर्षी शॅकवाल्यांना परवाना शुल्क माफ केले जावे, अशी मागणी काल कॉंग्रसचे सरचिटणीस आग्नेल फर्नांडिस यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केली.
परीक्षा घेण्याचा
निर्णय चुकीचा
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शाळा व महाविद्यालये बंद करण्याचा सरकारचा निर्णय चांगला आहे. मात्र, ठरलेल्या वेळापत्रकानुसार जर परीक्षा घ्यायच्या झाल्यास २० रोजीपासून त्या घ्याव्या लागतील. असे सांगून सरकारचा हा निर्णय चुकीचा असल्याचे फर्नांडिस म्हणाले.