- ॲड. अशोक मोये
आमच्या पुण्यभूमीत वेदकाळापासूनच गाईची मोठ्या आदराने, श्रद्धेने तसेच भक्तीने पूजा होत आली आहे व वर्तमानातही ती त्याच भावनेने, श्रद्धेने केली जात आहे. ऋषिमुनी, साधुसंत, महापुरुषांनी तिच्या महतीचे वर्णन अनेक ग्रंथांतून केलेले आढळते. अशी ही गोमाता आमच्या देशाच्या मानबिंदूंपैकी एक आहे.
संस्कार, सभ्यतेचे प्रतीक असलेली गाय आपल्या कृषिप्रधान भारत देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, आमच्या देशात तिच्या आणि तिच्या पुत्रांच्या आधारे शेती व शेतीवर आधारित, दूध तसेच दुधावर आधारित, शेण तसेच शेणावर आधारित, दळणवळण आणि त्याच्यावर आधारित अशा अनेक उपक्रमांद्वारे प्रचंड प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागांतही प्रचंड प्रमाणात रोजगार निर्माण होत असल्याने लाखो कुटुंबे त्या उपक्रमाच्या आधारे आपला उदरनिर्वाह करत आहेत. गाय ही जणू आपल्या जीवनाचा भक्कम आधारस्तंभ आहे, असे म्हटले तरी ते वावगे ठरू नये.
भारतामध्ये अनेक धर्मपंथ, संप्रदाय असून त्यांच्या तत्त्वज्ञानात, विचारांत, आचारांत भेद नक्कीच आहेत; परंतु या सर्वधर्म, पंथ, संप्रदायाचे गोमातेच्या अगाध अनंत महात्म्याबद्दल एकमत आहे. वैदिक ऋषिमुनी, साधू-संत, जैन तीर्थकर, बौद्धधर्म संस्थापक, शिख धर्माचे दशगुरू, एवढेच नव्हे तर भारतात नांदणाऱ्या पारसी लोकांतही गोमातेला देवत्वाचे स्थान असल्याचे दिसून येते.
इच्छा पूर्ण करणारी देवी म्हणून गायीला ‘कामधेनू’ संबोधले जाते. भगवान श्रीकृष्णाच्या गोकुळातील लीला प्रसिद्ध असून ते गोवत्सांना अरण्यात चरायला नेत असल्याने त्याना ‘गोपाल’ असे संबोधले गेले. कामधेनू गाईने आपल्या दुधाने, देवराज इंद्राने ऐरावत हत्तीच्या सोंडेद्वारे आणलेल्या आकाशगंगेच्या जलाने अभिषेक करून त्याला ‘गोविंद’ असे संबोधले. भगवान श्रीकृष्णाच्या द्वारकेतील लीलांना जणू उजाळा देण्यासाठीच भारतातील लाखो लोक गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी ‘दहीहंडी’ उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा करत असतात. आमच्या पुण्यभूमीत वेदकाळापासूनच गाईची मोठ्या आदराने, श्रद्धेने तसेच भक्तीने पूजा होत आली आहे व वर्तमानातही ती त्याच भावनेने, श्रद्धेने केली जात आहे.
ऋषिमुनी, साधुसंत, महापुरुषांनी तिच्या महतीचे वर्णन अनेक ग्रंथांतून केलेले आढळते. अशी ही गोमाता देशाच्या मानबिंदूंपैकी एक आहे. आई जीजाबाईंकडून रामायण- महाभारतातील झालेल्या सुसंस्कारांमुळे शिवाजी महाराजांना बालपणापासूनच गोमातेविषयी प्रेम तथा आदर निर्माण झाला होता. बाल शिवाजी आठ-दहा वर्षांच्या वयात गोहत्येचे दृश्य पाहून खूपच बेचैन झाले आणि त्यांनी आपले पिताश्री शहाजी महाराजांना ‘क्षत्रियाने गो-रक्षणासाठी आपल्या प्राणाचे बलिदान द्यायला हवे. गोहत्या करणाऱ्या कसायाचे शिर छाटून टाकले पाहिजे. क्षत्रियांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी गोहत्येचे दृश्य बघण्यापेक्षा मरण पत्करणे चांगले’ अशी त्यांच्या दरबारात निवेदने सादर केल्याने शहाजीराजे थक्क झाले होते. तसेच त्यांनी बालपणातच एक कसाई गाईला फटके मारत नेत असताना त्या कसायाजवळ जाऊन काहीच न बोलता गाईला दोरी कापून मोकळे केले आणि त्या कसायाचा शिरच्छेद केला. आणि जेव्हा बाल शिवाजीला त्या गुन्ह्यासंदर्भात आदिलशहाच्या दरबारात उभे केले गेले तेव्हा शिवाजीने त्याला ‘मी गो-भक्त आहे. मी गाईला माता मानतो. तिचे रक्षण करणे मी माझे आद्य कर्तव्य समजतो आणि ते मी पार पाडले आहे,’ असे बाणेदारपणे सांगताच आदिलशहाही आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी कसायाला गुन्हेगार ठरवून तक्रार खारीज केली. शिवाजीला दोषमुक्त केले. अशा शिवाजी महाराजांच्या गाईविषयी प्रेम तसेच आदर दाखवणाऱ्या अनेक गोष्टी ऐतिहासिक पुस्तकांतून वाचनात आल्या.
हिंदूंचे गर्भधारण, जन्म, नामकरण, विवाह, मरण आदी वेळी जितके धर्मसंस्कार होतात, पूजाअर्चा होतात, तसेच गृहप्रवेश, भूमिपूजन, उपनयन संस्कार या सर्वांमध्ये गोमातेचे दूध, तूप, दही, शेण, गोमूत्र आदींचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. ब्राह्मणांना जे यज्ञोपवीत दिले जाते त्यात गोमातेच्या पंचगव्याचे सेवन करणे भाग असते आणि मी पण माझ्या उपनयन संस्काराच्या वेळी त्याचे सेवन केल्याचे आठवते. ते सेवन केल्यावर ब्राह्मणाला वेद पठण करण्याचा अधिकार प्राप्त होत असतो. तसेच गोमातेशिवाय आपले कोणतेच धार्मिक कार्य पूर्ण होत नाही, असेही शास्त्रात उल्लेख सापडतात.
हिंदू धर्मात दूध, ताक, दही, साखर, तूप घालून ‘पंचामृत’ नावाचा एक रूचकर पदार्थ तयार करून तो देवाला नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो. गाईच्या दुधाने देवाला अभिषेकही केला जातो. गाय ही स्वर्गातही पूजनीय ठरली आहे. ती सर्व मनोइच्छित वस्तू देते अशी लोकमानसांत धारणा आहे. गाईपेक्षा वरचढ तसेच श्रेष्ठ अशी दुसरी कोणतीही गोष्ट या जगात नाही, असे महाभारतात म्हटले आहे.
गायीपासून आपल्याला पौष्टिक दूध मिळते. त्या दुधात प्रचंड ताकद दडलेली असते, म्हणूनच गायीचे वासरू जन्म होताच मातेचे दूध प्राशन केल्यानंतर वायुवेगाने धावू लागते. हे दृश्य मी स्वतः माझ्या बालपणी आमच्या कालापूर गावातील शेजाऱ्यांच्या गोठ्यात पाहिले आहे. जेव्हा माणूस आजारी होतो तेव्हा त्याला गोमातेचे दूध प्यायला दिले जाते. माणूस अंतिम क्षणी मरणासन्न अवस्थेत असताना त्याच्या मुखात दही घातले जाते. त्यामुळे परलोकांत त्याचे मंगल होते असे शास्त्रविधान आहे. जेव्हा बालकाला आईचे दूध मिळत नाही अथवा कमी प्रमाणात मिळते तेव्हा गाईचेच दूध त्याच्यासाठी धावून येते.
देवणी, साहिवाल, रेड सिंधी, गीर, राठी, खिल्लार, डांगी, गवळाऊ असे अनेक गोवंश भारतात आढळतात. गाईच्या दुधापासून दही, ताक, लोणी, तूप, श्रीखंड, बासुंदी, पेढे, बर्फी असे अनेक रूचकर पदार्थ बनवले जातात. गाय आपल्या बछड्यांना आम्हा माणसांच्या सेवेसाठी सुपूर्द करते. शेत नांगरण्यास, विहिरीचे पाणी काढण्यास, गाड्या ओढण्यास, माल वाहून नेण्याच्या कामात त्यांचा फार उपयोग होतो. विशेषतः शेतकऱ्यांना त्यांचा फार उपयोग होतो. त्यामुळेच तर ‘तो बैलासारखा काम करतो’ ही म्हण प्रचलित झाली आहे. आधुनिक युगात जरी यंत्रांद्वारे शेती केली जात असली तरी शेतकरी आपल्या कामासाठी बैलांचा (तिच्या पुत्रांचा) मोठ्या प्रमाणात वापर करीत असतो. कारण त्यांच्यामुळे यांत्रिक शेतीला लागणाऱ्या महागड्या पेट्रोल-डेझिलची बचत होते, ज्याचे भाव आज गगनाला भिडले आहेत. बैलांच्या आधारे केलेली शेती निसर्गाच्या कलानुसार केली जाते, असे म्हटले तर त्यात गैर नाही. सध्या चालू असलेले अमेरिका-इस्रायल-ईराण युद्ध लांबल्यास आपल्याला या बैलांचे खरे मोल नक्कीच कळून येईल.
गाईच्या शेणात तसेच तिच्या मूत्रात औषधी तसेच किटकनाशक गुण असतात. त्यामुळेच आमच्या वडिलोपार्जित घरात शेणाने जमिनी सारवल्या जात, तसेच जमिनीवर शेणाचे शितोंडे टाकले जात. घराच्या भितींवरील रंगातही शेणाचा वापर केला जात असे, ज्यामुळे भिंती निर्जंतुक होत. गाईचे मूत्र औषधी असल्यामुळे त्याच्यावर प्रक्रिया करून ते सीलबंद बाटलीतून उपलब्ध केले जाते. गाईच्या शेणाचा, मूत्राचा खते बनवण्यासाठीही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तिच्या शेणापासून बायोगॅस तयार करून तो इंधन म्हणून वापरला जातो. भाकरीच्या आकाराच्या शेणी तयार करून- त्या उन्हात वाळवून- त्यांचा इंधन म्हणून वापर केला जातो. सध्याच्या अमेरिका-इस्रायल-इराण युद्धामुळे अशी अनेक दृश्ये आपणाला पाहायला मिळत आहेत.
गोव्याच्या पारतंत्र्यातील शेवटच्या दशकातील माझ्या जाणिवेनुसार, त्याकाळी आजच्यासारखे मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन तसेच वितरणही होत नसे. अनेक लोक एकदोन गाईचे पालन करून आपल्या स्वतःच्या घरातील गरजा भागवत असत व उर्वरित दूध पितळीच्या छोट्या-छोट्या भांड्यांतून शेजाऱ्यांना दारोदारी विकत फिरायचे. अनेकांजवळ चारपाच गाई असायच्या आणि तो ते आपल्या जोडधंदा समजून घरखर्च भागवीत असत. काहीजण तर दहा-बारा गाईंचे पालन करून तो प्रमुख धंदा करून आपला पुरेपूरपणे उदाहनिर्वाह करत असत.
त्या काळात घरातील मंडळी गाईच्या देखभालीची कामे आपापसात वाटणी करून घेत. त्यांना वेळोवेळी आंघोळ घालणे, खाण्यापिण्यास देणे, गोठ्याची स्वच्छता राखणे, तिन्हीसांजेला शेणीच्या आधारे धुरी घालून किटकांचा बंदोबस्त करणे अशी अनेक कामे केली जात असत. गायींची पुरेपूर काळजी घेतली जात असे. घरातील तसेच शेजारची मुले गोठ्यात जाऊन आपलं गाईवासरांबरोबर मनोरंजनही करीत. अनेकजण त्यांना ठेवलेल्या नावानुसार हाका मारत, तर काहीजण मायेनं बोलत. जेवणाच्या वेळी भात तयार होताच त्यातला काही गरमागरम भात गायींना घातला जात असे. अर्थातच गाय ही ‘देवरूप’ समजूनच तिची सेवा केली जाई. त्या काळी बहुतेककरून गाई चरून घरी परतण्याच्या वेळी म्हणजे गोरज मुहूर्तावर विवाह केले जात असत आणि अशा प्रकारे जणू गायीचा सन्मानच केला जात असे. त्या काळात 1959 पर्यंत आमचे आजोबा कै. सगुण आत्माराम प्रभू मोये शिवोली तसेच कालापूर गावात आम्हाला गाईला खावड घालण्यासाठी पाठवत. त्यांना गाईविषयी अपार प्रेम आणि आदर असल्यामुळे ‘कामधेनू’ ही 30 ओळींची कविता लिहून त्यांनी त्यात गाईचे सुंदर वर्णन केले होते. ती कविता आपणाला गोवा मराठी अकादमीने प्रकाशित केलेल्या त्यांच्या ‘सगुण काव्यसंग्रहात’ वाचायला मिळते. वर्तमानकाळात गोव्यात काही गोशाळा असून डिचोली- गोवा येथील मये, शिकेरी भागात एक प्रचंड मोठी गोशाळा उभी करण्यात आली आहे. त्या गोशाळेत जवळपास सहा हजार गाईंव्यतिरिक्त त्यांची वासरे तसेच अनेक बैलांची महिन्याला लाखो रुपये खर्चून खूप काळजी घेतली जाते. तेथे एकदा भेट दिल्यावर परत-परत जावेसे वाटते. आजच्या मुलांना गोव्यातील त्या दशकातल्या गाईंविषयी सांगितलं तर त्यांना जणू त्या कहाण्याच वाटतात. म्हणूनच गायीची महती गाताना म्हणावेसे वाटते-
इहलोकीची कामधेनु ही खास असे गाय
म्हणुनीच तिजला आदरपूर्वक जन म्हणती माय!