दूधसागर धबधब्यावर सुविधा पुरविणार : दीपक पाउस्कर

0
64
कुळे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पायाभरणी कार्यक्रमात नामफलकाचे अनावरण करताना आमदार दीपक पाऊस्कर, सोबत इतर.

फोंडा (न. वा.)
सावर्डे मतदारसंघाचा विकास करताना जगप्रसिद्ध दूधसागर धबधब्यावर जाणार्‍या पर्यटकांना आकर्षित करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच कुळे पंचायत क्षेत्रातील रस्त्याचे हॉटमिक्स येत्या ४ महिन्यांत करून पाण्याची समस्या कायमची सोडविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन सावर्डे मतदारसंघाचे आमदार तथा गोवा साधन सुविधा मंडळाचे अध्यक्ष दीपक पाऊस्कर यांनी कुळे येथे केले.
ग्रामीण आरोग्य केंद्राच्या ठिकाणी नव्याने बांधण्यात येणार्‍या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या पायाभरणी कार्यक्रमात आमदार दीपक पाऊस्कर बोलत होते. यावेळी सरपंच मनीष लांबोर, उपसरपंच खुशी वेळीप, जिल्हा पंच सदस्य गोविंद गावकर, दत्ता कोरे, व अन्य पंच सदस्य उपस्थित होते. कुळे येथील ग्रामीण आरोग्य केंद्राची दुर्दशा झाली होती. निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. दसर्‍याच्या शुभ मुहूर्तावर प्राथमिक आरोग्य केंद्राची पायाभरणी करण्यात आली असून येत्या दीड वर्षात काम पूर्ण होणार आहे. त्याचा लाभ कुळे पंचायत तसेच परिसरातील लोकांना होणार असल्याचे आमदार दीपक पाऊसकर यांनी सांगितले.
जिल्हा पंच सदस्य गोविंद गावकर यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून कुळे ग्रामीण आरोग्य केंद्राकडे सरकारचे साफ दुर्लक्ष झाले होते. मात्र आमदार दीपक पाऊस्कर यांनी लोकांच्या आरोग्याची दखल घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्यात मोठे योगदान दिले असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मच्छिन्द्र देसाई यांनी केले. मनीष लांबोर यांनी स्वागत तर नंदिश देसाई यांनी आभार व्यक्त केले.