दुहेरी झटका

0
34

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात उतरलेल्या तृणमूल कॉंग्रेसने लुईझिन फालेरोंसारख्या ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्यास जवळ करून आगमन करतानाच धमाका केला. चार दशकांच्या आपल्या कॉंग्रेसी कारकिर्दीवर लुईझिन यांनी काल पाणी सोडले. तृणमूलचे गोव्यात येणे आणि त्याच मुहूर्तावर फालेरो व त्यांच्या समर्थकांचे रुसवेफुगवे सुरू होणे ह्याला काही विशेष अर्थ आहे, असे आम्ही काही दिवसांपूर्वी बदलते राजकीय रंग टिपताना म्हटले होते. लुईझिन यांच्या मागोमाग आता तृणमूलकडे विविध पक्षांतील बंडखोरांची आणि राजकीय अस्तित्व धोक्यात आलेल्या नेत्यांची रांग लागेल. लवू मामलेदारांनी दुसरा नंबर लावला आहेच. तृणमूलचे हे गोव्यात अवतरणे येत्या निवडणुकीत ह्या बंडखोरांना आसरा देण्यापुरतेच नसावे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय पातळीवर ममता बॅनर्जींच्या नावाला सहमती निर्माण करण्याच्या व्यापक उद्दिष्टाचाही तो निश्‍चितपणे भाग आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाची सरकारे असलेल्या विविध राज्यांमध्ये उतरून दोन हात करण्यासाठी बंगालबाहेर पडण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी भवानीपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत ममता बॅनर्जींनी केली होती. उत्तर प्रदेश, आसाम, गोवा आणि त्रिपुरा अशी चार राज्यांची नावेही त्यांनी सांगितली होती, परंतु इतक्यातच फालेरोंसारखा ज्येष्ठ नेता त्यांच्या आसर्‍याला येण्याने तृणमूलने जनतेचे निश्‍चितपणे लक्ष वेधून घेतले आहे, जे आम आदमी पक्षालाही शक्य झालेले नव्हते.
२०१२ च्या निवडणुकीत डॉ. विल्फ्रेड डिसोझांनी तृणमूलला प्रथम गोव्यात आणले होते आणि तेव्हा पक्षाच्या वीस उमेदवारांची दाणादाण उडाली होती हे खरे, परंतु तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. यावेळी ममतांच्या मागे नुकत्याच होऊन गेलेल्या पश्‍चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीतील देदीप्यमान यशाचे मोठे वलय आहे. मोदी – शहांना टक्कर केवळ ममताच देऊ शकतात, अशी त्यांची झुंजार प्रतिमा देशभरामध्ये निर्माण झालेली आहे. काल फालेरो यांनीही तीच भावना व्यक्त केली. कॉंग्रेसी विचारधारेतून निर्माण झालेल्या ज्या चार कॉंग्रेस देशात आहेत, त्यापैकी केवळ ममतांची तृणमूल कॉंग्रेस हीच भाजपाला रोखू शकते हे सिद्ध झाले असल्याचे ते म्हणाले. कॉंग्रेस आज विभाजित आहे, तिला एकत्र आणायचे आहे, आपण कॉंग्रेसी विचारधारा त्यागलेली नाही, असे ते म्हणाले, म्हणजेच तृणमूल हा मुळात कॉंग्रेसमधून निर्माण झालेला पक्ष असल्याने आपल्या आजवरच्या कॉंग्रेसी विचारधारेशी तो सुसंगत आहे असे फालेरोंना त्यातून सुचवायचे आहे. याचाच दुसरा अर्थ मूळ कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व आज नाकर्ते बनले असल्याने भाजपाचा विजयरथ रोखण्यास तो असमर्थ आहे असाही होतो. लुईझिन हे सोनियानिष्ठ नेते. राहुल गांधींशीही त्यांची बर्‍यापैकी जवळीक. कॉंग्रेसने त्यांच्या रूपाने पहिल्यांदाच एका गोमंतकीयाला राष्ट्रीय सरचिटणीसपदावर नेमले होते आणि ईशान्येच्या सात राज्यांची महत्त्वपूर्ण जबाबदारीही सोपविली होती. कर्नाटकचे निवडणूक समितीचे नेतृत्वही त्यांना दिले गेले होते. परंतु राष्ट्रीय राजकारणात महत्त्व दिले गेले असले तरी स्थानिक राजकारणात आपल्याला काही स्थान नाही आणि ते मिळण्याची शक्यताही नाही, ह्याची बोच त्यांना लागून राहिली होती. त्यामुळेच त्यांनी पक्षाला हा रामराम केलेला आहे. पक्षाच्या राज्यातील तेरा सदस्यीय निवडणूक प्रचार समितीचे प्रमुखपद त्यांना दिले गेले होते, परंतु ती केवळ वरवरची मलमपट्टी होती. त्यांच्या अस्वस्थतेची दखलही पक्षश्रेष्ठींनी घेतलेली दिसली नाही.
सात वेळा नावेलीतून फार मोठ्या मताधिक्क्याने निवडून येणार्‍या फालेरोंचे सालसेतमधील ख्रिस्ती मतदारांमध्ये निश्‍चितपणे एक स्थान आहे. शिवाय माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचा राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून राष्ट्रीय पातळीवरही त्यांना वलय आहे. त्यामुळे असा ज्येष्ठ नेता जेव्हा कॉंग्रेसला नाकारून तृणमूलला जवळ करतो, तेव्हा त्याचे पडसाद कॉंग्रेसने कितीही नाकारण्याचा प्रयत्न चालवलेला असला तरी त्यांच्यासाठी हा निश्‍चितपणे मोठा झटका आहे. स्वबळावर लढण्याची बात करीत आलेल्या कॉंग्रेसपुढे लुईझिन यांच्या तृणमूल प्रवेशामुळे निर्माण झालेले आव्हान दुहेरी आहे. एक तर आपला पारंपरिक ख्रिस्ती मतदार दुरावण्याची निर्माण झालेली शक्यता आणि दुसरीकडे कॉंग्रेसेतर विरोधी पक्षांना एकत्र आणून समर्थ तिसरी आघाडी बनवून भाजपचा सामना करण्याच्या दिशेने तृणमूल कॉंग्रेस पावले टाकणार असल्याने त्यातून निर्माण झालेले मतविभाजनाचे आव्हान असा हा दुहेरी फटका कॉंग्रेसला खावा लागणार आहे. बुडत्या जहाजाची आता सुरू झालेली ही गळती पक्षनेतृत्व कशी थांबवणार आहे?