दीप अखेरचा निमाला…

0
168
  • ज. अ. रेडकर.
    (पेडणे)

हा प्रभू येशूचा पुत्र होता. काही काळासाठी तो या भूतलावर आला होता. आपले कार्य संपन्न करून तो माघारी जात आहे. तो देवपुत्र होता. त्याचे काम संपले म्हणून तो जात आहे. त्याला आपण प्रेमाने आणि आनंदाने निरोप देऊया.

९ फेब्रुवारी १९९१ हा दिवस उजाडला तोच मुळी ढगांनी सूर्य झाकोळलेला. माझे नोकरीतील गुरु असलेले आणि माझ्यावर अतोनात प्रेम करणारे शिक्षणखात्यातील एक वरिष्ठ अधिकारी श्री. जे. ए. वारेला हे पणजी येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये यकृत व फुप्फुसाच्या आजारावर महिनाभर उपचार घेत होते. अत्यंत देखणा माणूस. धर्माने ख्रिस्ती असूनदेखील धर्मभेद, जातिभेद, प्रांतभेद न मानणारा एक उत्तम अधिकारी. आपल्या अधिकार कक्षेत येणारे कोणतेही काम मग ते कुणाचेही असो, अविलंब करणारा त्यावेळचा अधिकारी म्हणजे वारेला सर! त्यांच्या केबिनमध्ये जाताना कधी भीती वाटली नाही. कारण आपण शिक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकारी आहोत याचा कधी टेंभा ते मिरवणारे नव्हते. गोव्यातील शिक्षणाशी संबंधित कुणीही व्यक्ती त्यांना सहज भेटू शकत होती आणि त्यांना भेटल्यावर आपले काम होणारच याची जणू हमी त्यांना भेटणार्‍या व्यक्तीला वाटायची. त्यांची सौजन्यपूर्ण वागणूक हे त्याचे कारण होते.

तर अशा या शिक्षण अधिकार्‍याचा मृत्यू ९ फेब्रुवारी १९९१ रोजी झाला ही बातमी समजली आणि मी कोलमडून पडलो. वारेलासर माझ्यासाठी काय होते हे मी शब्दात नाही सांगू शकत. गुरु, मार्गदर्शक, फिलॉसॉफर सर्व काही ते माझ्यासाठी होते. किंबहुना नोकरीतील स्थैर्य आणि माझ्या पुढील आयुष्यात मिळालेल्या बढत्या यांच्या मागे वारेलासरांचे माझ्या डोक्यावर असलेले आशीर्वाद होते. कारण १९७३, १९७६ आणि १९८१ या तीन वेळा शिक्षणखात्याने बढतीपासून मला वंचित केले होते. मी वैतागलो होतो. प्रत्येकवेळी मुलाखत उत्तम होत होती परंतु प्रत्यक्ष निवडीच्या वेळी कुठे माशी शिंकत होती हे कळायला मार्ग नव्हता. १९८१ ची मुलाखत झाली त्यावेळी मी पुणे येथे एका कोर्ससाठी डेक्कन कॉलेजमध्ये होतो. शिक्षणखात्यानेच मला एका वर्षाच्या सेवांतर्गत भाषा प्रशिक्षणासाठी तिथे पाठविलेले होते. त्याच दरम्यान सर्व सरकारी हायस्कूलना खात्यामार्फत परिपत्रक पाठविले की, जे शिक्षक पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि बीएड उत्तीर्ण असतील त्यांनी ए.डी.ई.आय. या पदासाठी अमुक अमुक तारखेपर्यंत अर्ज करावेत. मी या पदासाठी पात्र होतो परंतु अर्ज मागविल्याची कोणतीच माहिती मला नव्हती कारण मी गोव्याबाहेर होतो व माझ्या त्यावेळच्या मुख्याध्यापकांनी ही गोष्ट मला कळवली नव्हती, जी त्यांची जबाबदारी होती. शाळेतील एका सहकारी शिक्षकाचे नेहमीप्रमाणे पत्र आले. शाळेतील घडामोडीबद्दल त्याने लिहिले होते. त्यांत ही बातमी त्याने मला सहज म्हणून कळवली. मुख्याध्यापकाने ही महत्त्वाची गोष्ट माझ्यापासून लपवली या विचाराने रागाने माझ्या डोक्याचा भुगा झाला. मी अर्ज लिहिला, अर्जाला डेक्कन कॉलेजच्या प्राचार्या सौ. लीला माडगुळकर यांचे शिफारसपत्र आणि सहमती जोडली (कारण त्याच आता माझ्या तात्कालिक अधिकारी होत्या.) आणि तडक रात्रीच्या बसने पुण्याहून गोव्याला आलो.

खात्यात अर्ज दाखल करायची मुदत तर संपली होती आणि दुसर्‍याच दिवशी मुलाखती सुरू होणार होत्या. तरीदेखील धीर केला आणि साहाय्यक शिक्षण संचालक (प्रशासन) असलेले वारेला साहेब यांच्या केबिनचे दार उघडून त्यांच्या परवानगीने आत गेलो. त्यापूर्वी त्यांची माझी कधीच भेट झाली नव्हती. कारण अशा वरिष्ठ अधिकार्‍यांचा शिक्षकांशी थेट संबंध कधीच येत नसे. शाळेच्या तपासणीसाठीदेखील अन्य दुय्यम अधिकारी येत असत आणि तेदेखील कधीतरी वर्षातून एकदा. त्यामुळे वरिष्ठ शिक्षण अधिकार्‍याला अशा कामासाठी प्रत्यक्ष भेटण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. मनात धाकधूक होती की ते माझ्यावर चिडतील, अर्ज करायची तारीख उलटून गेली, आता काही होणार नाही असे सांगतील आणि मला हाकलून लावतील. पण तसे काही घडले नाही. मी त्यांना माझी सर्व हकिगत सांगितली. यापूर्वी माझ्यावर कसा अन्याय झाला हे सांगितले, आतादेखील माझ्या त्यावेळच्या मुख्याध्यापकाने मला खात्याने अर्ज मागविले आहेत हे कळवले नाही व म्हणून मी वेळेत अर्ज दाखल करू शकलो नाही आणि थेट पुण्याहून आज आल्याचे सांगितले. अगदी शांतपणे वारेला साहेब माझी कैफियत ऐकत होते. त्यांनी अर्ज वाचला. बेल मारून शिपायाला आत बोलावले व आपल्या स्वीय सहाय्यिका सौ. मंगला भोबे हिला बोलावून घेतले. माझा अर्ज तिच्याकडे देऊन ते तिला म्हणाले, हा अर्ज घे आणि याचे नाव उद्याच्या मुलाखतीच्या उमेदवारांच्या यादीत समाविष्ट कर. कोणत्या शब्दात त्यांचे आभार मानावेत हेच मला समजत नव्हते. त्यांच्या जागी कोणताही दुसरा अधिकारी असता तर त्याने नियमाचा बडगा दाखवून मला विन्मुख करून परत पाठविले असते. त्या दिवशी वारेला माझ्यासाठी देवदूत ठरले आणि पुढे मी त्यांचा निस्सीम भक्त झालो!

मुलाखतीचा दिवस उजाडला. ती तारीख होती १६ जानेवारी १९८१. सर्व तयारीनिशी मी पणजीच्या मुख्यालयात दाखल झालो. त्यावेळी शिक्षणखात्याचे संचालक निवृत्त झाले होते व खात्याचा तात्पुरता ताबा राज्याचे अर्थसचिव श्री. धर्मदत्त या आय.ए.एस. अधिकार्‍याकडे होता. त्याचवेळी गोवा विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होते. श्री. धर्मदत्त अर्थसचिव असल्याने त्यांना सकाळी अधिवेशनाला उपस्थित राहणे आवश्यक होते. त्यामुळे मुलाखती दुपारी दोन नंतर सुरू होतील अशी घोषणा करण्यात आली. शेवटी प्रतीक्षा संपली आणि दुपारी अडीच वाजता धर्मदत्तसाहेब आले, मुलाखतींना सुरुवात झाली. एकामागून एक उमेदवार आत जात होते आणि पंधरावीस मिनिटांनी बाहेर येत होते. मनावर प्रचंड ताण होता. कारण मुलाखतींचा वेग पाहिला तर माझी मुलाखत आज होईल असे वाटत नव्हते. कारण एकूण शंभर दीडशे उमेदवार होते आणि माझा यादीतील क्रमांक तर सर्वांत शेवटी होता. जी भीती वाटत होती तेच झाले. साडेपाच वाजता प्यून केबिनमधून बाहेर आला आणि म्हणाला की, आजच्या मुलाखती संपलेल्या आहेत, उरलेल्यांनी उद्या यावे. मी तर हबकूनच गेलो. काय करावे काही कळेना. पण मला अचानक काय सुचले कोण जाणे, मी एका चिटोर्‍यावर चार ओळी मोडक्या तोडक्या इंग्रजीत खरडल्या त्यांत धर्मदत्त यांना विनंती केली की, ‘मी पुण्याहून या मुलाखतीसाठी एका दिवसाची रजा घेऊन आलो आहे आणि आज रात्रीच मला पुन्हा माघारी जायचे आहे, तेव्हा कृपया माझी मुलाखत आजच घ्यावी.’ चिठ्ठी प्यूनमार्फत आत पाठविली. चिठ्ठीचा उपयोग होईल असे वाटत नव्हते. एवढी मोठी माणसे माझ्या चिठ्ठीला थोडीच प्रतिसाद देतील असे वाटत होते. परंतु दैव बलवत्तर होते, मला आतून बोलावणे आले. मी आत गेलो. माझी मुलाखत सुरू झाली. धर्मदत्त, वारेला साहेब आणि अन्य एक अधिकारी मुलाखत घेत होते. तिघांनीही मला प्रश्‍नांनी घेरले. परंतु मी त्या सर्वांची समर्पक उत्तरे दिली. धर्मदत्त तर खूश झाले आणि वारेला सरांना त्यांनी माझ्या पुढ्यातच सांगितले, टिक् मार्क हीज नेम. मला आनंदाच्या उकळ्या फुटल्या. एवढी धडपड केली त्याचे सार्थक झाले असे वाटले.
त्याच रात्री मी पुण्याला येण्यासाठी बसमध्ये बसलो. वाटेत स्वप्न रंगवीत होतो की, पुण्याचे ट्रेनिंग पूर्ण होताहोताच मी इकडे येऊन शिक्षकांचा साहेब होणार आहे. एप्रिल १९८१ मध्ये मी माझे पुण्याचे ट्रेनिंग उत्तम श्रेणीत पूर्ण करून पुन्हा शाळेत हजर झालो. तेव्हा कळले की ए. डी. ई. आय.च्या मुलाखतीत निवडलेल्या लोकांना नेमणूक पत्रे दिली गेली आहेत व नवीन जागेवर लोक हजरदेखील झाले आहेत. त्यांत माझे नाव नाही. मला आश्चर्य वाटले. सगळ्यात जास्त राग आला तो या गोष्टीचा की माझ्यापेक्षा ज्युनिअर व कमी शैक्षणिक पात्रता असलेल्यांना नेमणुका मिळाल्या होत्या. ही सगळी पैशाची व वशिलेबाजीची कमाल होती. वैतागण्याशिवाय माझ्या हातात काहीही नव्हते. पण मी निर्णय घेतला की ही सरकारी शिक्षकाची नोकरी सोडावी आणि कोणताही दुसरा व्यवसाय करावा. परंतु एका जिव्हाळ्याचा मित्राने सल्ला दिला की, तू तुझ्या त्या वारेला साहेबांना जाऊन का भेटत नाहीस ज्यांनी तुझा अर्ज उशीर झाला असतानादेखील स्वीकारला होता? मला त्याचे म्हणणे पटले आणि मी वारेला साहेबांच्या भेटीला गेलो. तो दिवस होता १२ जानेवारी १९८२. तब्बल एक वर्षाने आम्ही दोघे भेटत होतो, पण मला पाहताच त्यांनी मला ओळखले. मी त्यांना विचारले, ‘साहेब, मुलाखतीच्यावेळी तर माझी निवड झाली होती ना? मग असे कसे झाले?’ ते थोडे मिस्कीलपणे हसले. त्यांनी आपल्या स्वीय साहाय्यकाला ती मुलाखतीची फाईल घेऊन बोलावले. निवड यादी काढली आणि म्हणाले. ‘‘खरेच तुझे दुर्दैव, तुझा निवड यादीत ५ वा क्रमांक होता परंतु वरच्या पातळीवर तो १३ वा झाला. मला अश्रू अनावर झाले. काही क्षण शांतता पसरली. वारेलासाहेब काही विचार करून म्हणाले की, पण एक जागा अजून आम्ही भरलेली नाही. कारण त्यावेळी ती तातडीने भरावी अशी आवश्यकता भासली नाही. ही जागा होती मध्य शिक्षण विभागातील ए. डी. ई. आय.ची. म्हणजे तालुक्याचा स्वतंत्र ताबा नाही तर झोनल ऑफिसरचा साहाय्यक म्हणून काम करायचे होते. वारेला म्हणाले, इथल्या नेमणुकीची ऑर्डर देतो, उद्याच्या उद्या हजर हो! मला आसमान ठेंगणे झाले. शेवटी पुहा एकदा वारेलारुपी देवदूत माझ्यासाठी धावून आला होता. मी भीत भीत म्हटले, ‘सर, उद्या १३ तारीख आहे तेव्हा उद्याऐवजी परवाच्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी हजर होऊ का? वारेला साहेब पुन्हा हसले आणि म्हणाले, ‘हरकत नाही, पण परवाचा दिवस चुकवू नको कारण या यादीची मुदत १५ जानेवारीला संपते आहे’.

या प्रसंगानंतर वारेला साहेबांशी माझे घनिष्ठ संबंध तयार झाले. परस्परांच्या घरी जाणे-येणे वाढले. माझ्या विवाहात त्यांनी सपत्नीक उपस्थिती लावली. आम्हां उभयतांस आशीर्वाद दिले. असे अधिकारी आता कुठेच दिसत नाहीत. पुढे दिसतील अशी शक्यता नाही. कारण काळ आता बदलला आहे. माणसे बदलली आहेत. असा हा देवतुल्य, सहृदयी माणूस ९ फेब्रुवारी १९९१ रोजी ख्रिस्तवासी झाला. बातमी कळल्यापासून डोळ्यातील अश्रूंना खंड नव्हता. मी ओक्साबोक्शी रडत होतो. त्यांच्या अचेतन देहाच्या पायाशी मी बसलो होतो. खात्यातील अन्य अधिकारी, कर्मचारी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन जात होते. मी मात्र हलायला तयार नव्हतो. अंत्ययात्रा निघाली. शवपेटी त्यांच्या आप्तेष्टांच्या खांद्यावर घेतली गेली. मी त्यामागून अश्रू ढाळीत चाललो होतो. सांतिनेजच्या चर्चमध्ये अखेरच्या प्रार्थनेसाठी तो देह आणण्यात आला. धार्मिक प्रार्थना म्हटली गेली. बायबलमधील वचने म्हटली गेली. धर्मगुरूने प्रवचन दिले. हा प्रभू येशूचा पुत्र होता. काही काळासाठी तो या भूतलावर आला होता. आपले कार्य संपन्न करून तो माघारी जात आहे. तो देवपुत्र होता. त्याचे काम संपले म्हणून तो जात आहे. त्याला आपण प्रेमाने आणि आनंदाने निरोप देऊया. धर्मगुरूच्या त्या बोलाने माझे सांत्वन झाले का माहीत नाही पण माझे अश्रू थांबले. चर्चचा घंटानाद झाला आणि नंतर शवपेटी अलगद भूमातेच्या कुशीत विसावली. अचानक माझ्या मुखातून शब्द उमटले :-

               दीप अखेरचा निमाला, ठेवून क्रूसावर डोळे 
              आनंदयात्री जणुं निघाला उधळीत फुलांचे झेले 
              उरी कल्लोळ असा उठला, पेटे आक्रोशाचे रान 
              उचलता शवपेटी त्याची आसवांचे फुटले बांध 

               मूक बधीर यात्रा चाले राजपथावरून जेव्हा 
             साश्रू नयनी मुजरे झडले अगणित जीवांचे तेव्हा 
               धीर गंभीर ख्रिस्तवचने गिरीजाघरी गायली
             धर्मगुरुची प्रवचने तेव्हा घुमटाखाली घुमली 

             करुण झाले घंटानाद चर्चबेलचा अर्थ उमगला 
           ख्रिस्ताच्याही डोळी तेव्हा अश्रू एक मायेचा ओघळला 
                सांत्वनाचा होई शिडकावा शांत शांत मन झाले 
                नश्वरतेचे आभास सारे, प्रभुचरणी लीन झाले 

               सुमने शोभित शवपेटी बहु बाहूवर विराजली 
              दफनभूमीच्या खंदकी ती आता अलगद विसावली.