आयुर्वेदातला एक झंझावात हरपला….!!!!

0
214
  • वैद्य विनोद वसंत गिरी

वैद्य अनिल विनायक पानसे. एक आयुर्वेद वैद्य. सर गोमन्तक आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्र, वाजे, शिरोडा, गोवा येथील कायचिकित्सा विभागात विभाग प्रमुख व महाविद्यालयाशी संलग्न असणार्‍या कामाक्षी आरोग्य धाम येथे मुख्य चिकित्सक म्हणून कार्यरत होते. कर्तव्यनिष्ठ, कर्मविभुति, शिस्तबद्ध, कठोर पण तितकंच प्रेमळ, प्रसन्न, विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्त्व वर देवालाही आवडलं असावं का?

‘दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती’
गुरुवर्यांची अशी अकाली निघून जाण्याची कल्पनासुद्धा करवत नाही. पण आयुष्य क्षणभंगुर असतं हेही तितकंच सत्य. काही गोष्टी स्वीकाराव्याशा वाटत नसल्या तरी स्वीकाराव्या लागतात. विश्वास ठेवावा लागतो.

वैद्य अनिल विनायक पानसे. एक आयुर्वेद वैद्य. सर गोमन्तक आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्र, वाजे, शिरोडा, गोवा येथील कायचिकित्सा विभागात विभाग प्रमुख व महाविद्यालयाशी संलग्न असणार्‍या कामाक्षी आरोग्य धाम येथे मुख्य चिकित्सक म्हणून कार्यरत होते. संपूर्ण गोमन्तकातून दुर्धर आजारांवर उपचारासाठी सरांकडे रुग्ण यायचे. फोंडा येथे सरांची वैयक्तिक प्रॅक्टिस चालायची.

‘पुणे तिथे काय उणे’ याला साजेशी अशी गुरुवर्यांची व्यक्तिशैली. हेच कर्तव्यनिष्ठ, कर्मविभुति, शिस्तबद्ध, कठोर पण तितकंच प्रेमळ, प्रसन्न, विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्त्व वर देवालाही आवडलं असावं का?
सर तसें पुण्यातले. विद्यार्थिदशेत असतानाच आयुर्वेदोक्त बरीच कामे हातात घेणारा हा माणूस. आयुर्वेदासाठी बंडखोरी (सात्त्विक) करावी लागली तरी चालेल पण उद्दिष्ट साध्य करून घेता आलं पाहिजे असा सरांचा हट्ट असे आणि तसा बाणा त्यांनी जपलाही. अगदी त्यांच्या पदवी शिक्षणापासून ते आत्तापर्यंत.

माझ्या माहितीनुसार १९९६ साली सर गोमन्तकात आले. पुण्यासारख्या ज्ञानाच्या माहेरघरातून थेट फक्त गुरूंच्या आदेशावरून कोकणभूमी गाठली. आदेश एवढाच की सगळे पुण्यात राहिलात तर बाहेर आयुर्वेद कसा पोचणार.
जा.. तुमची खरी गरज तिकडे आहे, असंच जणुकाही महागुरुंनी सांगितलं असावं आणि ते आज सार्थ करून दाखवलंही. पानसे सरांचा मला जास्त सहवास लाभला तो शेवटच्या वर्षाला. त्यात रविवारचा क्लिनिकचा वार असेल तर अजूनच मजा यायची. सरांनी कित्येक विद्यार्थी घडवले. पण महागुरुंच्या आठवणी सांगताना मात्र ते स्वतः एक विद्यार्थी बनायचे. त्यामुळे कितीही मोठे झालात तरी मधली गुरुनिष्ठा कमी होऊ देऊ नका आणि आयुष्यभर विद्यार्थीदशेत रहा… हेच सरांना जणू विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ठसवायचे असे. शिक्षकीपेशा आणि वैद्यकीय पेशा या दोन बाजू हाताळताना सरांनी कधी या दोन्ही गोष्टी एकमेकांमध्ये येऊ दिल्या नाहीत. कारण सर कॉलेजमध्ये वेगळे असत आणि प्रॅक्टिसमध्ये वेगळे हे मला तरी जाणवलेलं एक सत्य. कारण सर समोर आले की हुशार असू तर गप्प मान खाली घालून जाणे किंवा काहीतरी टोमणा ऐकण्याची तयारी ठेवणे. अर्थात सरांचा तसा मूड असेल तरच. पण या दोन गोष्टींबाबत तयारी ठेवावी लागे. हा सरांना अनुभवलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा अनुभव असेल हे गृहीत धरतो. पण हेच सर क्लिनिकमध्ये पूर्ण वेगळे.. तिथे मात्र मॅडम समोर बॅटींग करताना सर मात्र आमच्या टीममध्ये असायचे. अर्थात काही अपवाद सोडले तर.

पण सरांची शिस्तबद्धता ही सर्वत्र दिसून यायची. आपल्या शिष्यांनीही ते आत्मसात करावं अशी त्यांची इच्छा असे. अगदी काय चिकित्सा विभागापासून घ. उ. बाह्यरुग्ण, आंतर रुग्ण विभाग, ते स्वतःचा दवाखाना टापटीप, स्वच्छ आणि प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथे लागत असे. सरांचं क्लिनिक तर एका छोट्याशा जागेमधे क्लिनिक कसे असावे याचा एक उत्तम नमुनाच जणू.

रविवारी क्लिनिकचा अनुभव हा वेगळाच. कारण त्यादिवशी सर वेळ मिळाला की त्यांचे अनुभव सांगायचे. आपण कसं वागलं पाहिजे, आपली जबाबदारी काय आहे, कुठे चुकतो इत्यादी गोष्टी सर त्यांच्या भारदस्त शैलीत सांगत असत. एवढंच नाही तर रुग्ण तपासून झाल्यावर ..बाहेर सरांचे काही काम असेल तर मग सरांसोबत जाण्याची मजा काही औरच. जणू काही लहान मुलगा बाहेर जाताना वडिलांच्या मागे लागतो तसंच काहीसं.

त्यातच क्लिनिकच्या अटी अन् नियमांना इतरत्र कुठे तोड नाही. भविष्यात ही आपली पोर स्वतःचं क्लिनिक नीट सांभाळायला शिकावीत म्हणून क्लिनिकची चावी सोबत ठेवण्यापासून, लवकर पोचणे, समोरचं आवार स्वच्छ करणे, आत गेल्यावरही सर्वांत पहिल्यांदा स्वतःचा स्टेथो बाहेर काढून ठेवणे, ए.सी. नीट लावणे, चार्जिंगला लावलेले टॉर्च स्विचऑन करणे, देव्हार्‍याजवळ दिवा, तेल, काडेपेटी, अगरबत्ती इत्यादी सर्व साहित्य व्यवस्थित समोर आणून ठेवणे. या गोष्टी झाल्या की मग काय …सर मॅडम कधी येतायत याची वाट बघत बसणे, हेच काम असे.

सरांची गुरुश्रद्धा महान होती. त्यांच्या प्रत्येक शब्दातून, कृतीतून, वागण्यातून आम्ही महागुरू मा.वा.कोल्हटकर सरांना अनुभवत होतो. कोणत्याही वैद्याचं सध्याचं वैभव न पाहता प्रत्यक्ष वैभवसंपन्न होण्यासाठी त्या वैद्याने शून्यातून वैभवसंपन्न जग कसं निर्माण केलं हे समजून घ्या आणि तसं वागायला शिका हा गुरुजींचा हट्ट असे आणि एवढंच नाही तर ते अनुभव आम्हाला पटवून देत असत. सरांचं विद्यार्थी-प्रेम इतकं की सरांनी खास विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर मोठा प्रशस्त हॉल तयार केला. किती ते थोरभाग्य आमचं की असा गुरु आम्हाला लाभला.

सरांना फोनवर हॅलो असं बोलताना क्वचितच ऐकल्याचं आठवतं. कारण सरांना फोन केला की ‘हं बोल रे…..!!!’ हेच शब्द कानावर पडत आणि आता पुढे काय बोलायचं हेच सुचत नसे.
आता आता तर सरांनी ‘विनोबा’ नावाने मारलेली हाक ही तर मनात घर करून बसली आहे. कारण यापुढे अशी हाक मला ऐकायला मिळणार नाही ..ती ही गुरुजींकडून हे मनाला समजावणं कठीण आहे.

आयुर्वेदाबरोबरच सरांनी आयुष्याचा रथ कसा चालवायचा याबाबतही आमची कानउघाडणी करत राहायचे. भले सुरुवातीला चटणी भाकरी खाऊन दिवस काढावे लागले तरी चालतील पण शून्यातून स्वकष्टाने विश्व निर्माण करायची हिम्मत ठेवा असं सर सांगत असत.

सर आज तुम्ही आम्हाला सोडून गेलात. तुम्ही यापुढे सोबत नसलात तरी तुमचे संस्कार तुम्ही आधीच आमच्यावर केले आहेत, तुमचे आचार विचार, तुमची गुरुभक्ती, अध्यात्म, विद्यार्थी प्रेम, आयुर्वेद सेवा, आयुर्वेद प्रसार, नेतृत्व कौशल्य आणि बरंच काही या सगळ्या गोष्टी तुम्ही आमच्यात रुजवल्या आहेत. त्या आमच्या आजन्म सोबतच असणार आहेत. त्या आम्ही पुढे न्यायच्या आहेत हा मॅडमचा आदेश नक्कीच मनाशी बाळगून पुढचा प्रवास तुमच्या संस्कार छत्राखाली राहूनच चालू ठेवू.
माझ्या आयुर्वेद त्रिगुरुंमध्ये तुमचं स्थान नेहमी ब्रह्मा विष्णू महेश मधल्या ‘महेशाचं’ राहील.