दीपोत्सव.. मांगल्याचा, उत्साहाचा, समृद्धीचा!

0
116

– नीला भोजराज
अश्‍विन महिन्याची अखेर आणि कार्तिक महिन्याची सुरुवात या दरम्यान दिवाळीचा सप्ताह सगळीकडे साजरा केला जातो. यंदा दिवाळी ऑक्टोबर महिन्यात म्हणजे नेहमीपेक्षा थोडी लवकरच आल्यामुळे दिवाळीच्या वेळी हवेत जाणवणारा गारवा यावेळी अजून जाणवत नाही. दिवसभर उकाडा सहन करून रात्रीची थंडी अंगाची काहिली थोडी कमी करते, ती सध्या जाणवत नाही. पण तरीही दिवाळी या सणाची इतकी म्हणून काही वैशिष्ट्ये आहेत की त्यामुळे वातावरण कसेही असले तरी सर्वांच्या उत्साहाला उधाणच आलेले दिसते. दिवाळी- दीपावली या नावातच या सणाचे मर्म साठवले आहे. दीपांची आरास, दीपपूजन, दीपांच्या ओळी असा शब्दशः अर्थ जरी घेतला तरी एक गोष्ट आपल्या लक्षात येते की या सणाच्या निमित्ताने सर्व परिसरात अंधाराचे साम्राज्य संपून प्रकाशाचे साम्र्राज्य प्रस्थापित होते. मग हा अंधार वातावरणातील प्रदूषणाचा, कचर्‍याचा, धुळीचा, आपापसातील मतभेदांचा, कलहाचा, रोगराईचा, असा अनेक कारणांमुळे पसरलेला असतो. तो दूर करण्यासाठीच जणू या सणाची योजना आपल्या हिंदू संस्कृतीत केलेली आहे असेच वाटते. सर्वप्रथम दिवाळीमध्ये पहिला मान असतो तो स्वच्छतेचा. प्रत्येक जण मग तो गरीब असो की श्रीमंत आपले घर, कार्यालय आणि सभोवतालचा परिसर स्वच्छ, सुंदर करण्याच्या कामानेच तो या सणाच्या तयारीला सुरुवात करतो. त्यातच सजावटीला जास्त महत्त्व दिले जाते. तेलाच्या पणत्यांचे महत्त्व अनन्यसाधारण असले तरी इलेक्ट्रीक दीपांच्या माळांनी घरे, कार्यालये सजविण्यानेही सौंदर्यात भरच पडते. नरकासुर म्हणजे राक्षसी, दुष्ट विचारांचे साम्राज्य संपून श्रीकृष्णाच्या दैवी, दिव्य व सात्त्विक विचारांचे साम्राज्य प्रस्थापित होते. तसेच या सणाच्या निमित्ताने यम म्हणजेच मृत्यूची देवता, ज्याच्या नावानेही सामान्य माणसांची भीतीने गाळण उडते, त्या देवतेची पूजाही याच काळात केली जाते व तिला प्रसन्न करून घेतले जाते. याशिवाय पती-पत्नीच्या नात्यामधील गोडवा वृद्धिंगत करणारा पाडवा, भाऊ-बहीण या नात्याची वीण घट्ट करणारी भाऊबीज, हेही दिवाळीतले तितकेच महत्त्वाचे दिवस आहेत.
दिवाळीचा पहिला दिवस हा वसु-बारस या दिवसापासून सुरू होतो. यालाच गोवत्स द्वादशी किंवा गाई-गोर्‍याचे बारस असेही संबोधण्यात येते. या दिवशी गाय आणि वासराची पूजा केली जाते. हिंदू संस्कृतीत गोमातेला महत्त्वाचे स्थान आहे हे आपण जाणतोच. एकप्रकारे ती आपल्या सर्वांसाठी कामधेनूच आहे. या दिवशी गाय आणि वासरू यांची एकत्रितपणे पूजा केली जाते, हे वैशिष्ट्य!
दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनतेरस किंवा धनत्रयोदशी! या दिवशी देवतांचे वैद्य धन्वंतरीचे पूजन केले जाते. यादिवशीपासूनच तेलाचे दिवे लावण्यास प्रारंभ होतो. या दिवशी सकाळी घरोघरी स्त्रिया अंगणात शेणाचा सडा-सारवण करून रांगोळी घालतात व डोक्यावरून स्नान करून लक्ष्मीचे पूजन करतात. या दिवशी घरात काहीतरी नवीन वस्तू घेऊन तिचेही पूजन केले जाते. सायंकाळी पणत्या, आकाश कंदील लावून धन्वंतरीची व लक्ष्मीची पूजा केली जाते. जो दिवाळीचे पाच दिवस दिवे लावतो त्याला अकाली मरण येणार नाही असे यमराजाने सांगितले आहे.
तिसरा दिवस म्हणजेच नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान करणे महत्त्वाचे मानले जाते. शरद ऋतूचा शेवट आणि हेमंत ऋतूचे आगमन अशा संधिकालावर दिवाळीचा सण साजरा करताना पुढे येणार्‍या थंडीच्या काळासाठी तेल लावून स्नान करण्याची सुरुवात नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नानापासून होते. अकाली मृत्यू येऊ नये म्हणून नरक चतुर्दशीच्या दिवशी यमतर्पण करायला धर्मशास्त्राने सांगितले आहे. तसेच या दिवशी पणती लावताना तिची ज्योत ही दक्षिण दिशेकडे म्हणजेच यमाच्या दिशेकडे करायची असते.
गोव्यामध्ये नरक चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला नरकासुर दहनाच्या तयारीत सर्व युवा वर्ग गढून गेलेला असतो. खरे तर नरकासुर बनविण्याची तयारी १५ दिवस अगोदरच सुरू केली जाते. पण त्याच काळात शाळांमध्ये परीक्षा असतात त्यामुळे त्या कामाला गती येत नाही. साधारणपणे पूर्वसंध्येला हा नरकासुर पूर्ण बनवून तयार झालेला असतो. त्यानंतर ठिकठिकाणी नरकासुर स्पर्धा असतात. त्यासाठी वाजत-गाजत, नाचत-नाचत, मिरवत-मिरवत हे नरकासुर स्पर्धेच्या ठिकाणी नेण्यात येतात व बक्षिसे मिळविली जातात. ती संपूर्ण रात्र जागवली जाते. स्पर्धेनंतर जेवण जेवून नरकासुराजवळ गप्पा मारीत युवा वर्ग बसलेला दिसतो. नंतर पहाटे वाद्ये वाजवून, हल्ला-गुल्ला करून सर्व लोकांना जागे करण्यात येते व त्यानंतर जवळजवळ पहाटे पाच वाजता नरकासुराचे दहन केले जाते. एका सप्ताहापासून नरकासुर बनविण्यामध्ये थकलेला, जागरण झालेला युवा वर्ग मग घरी येऊन झोप घेतो. पण तीच वेळ असते अभ्यंग स्नानाची आणि गोड-धोड पदार्थ बनवून ती स्वतः तसेच लोकांना वाटून खाण्याची. गोव्यात पोह्यांचे अनेक प्रकार करून ते घरोघरी देण्याची पद्धत आहे. त्याबरोबरच फराळाचे पदार्थ खाल्ले जातात.
दिवाळीचा चौथा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजनाचा. भारतासारख्या आपल्या कृषिप्रधान देशातील महत्त्वाचा घटक असलेल्या शेतकरी बांधवांसाठी ज्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातील पोळा अमावास्या शुभ मानण्यात आली आहे, त्याचप्रमाणे महत्त्वाच्या व्यापारी वर्गासाठी आश्विन महिन्यात येणार्‍या अमावास्येचे महत्त्व मोठे आहे. पुराणात उल्लेख केलेल्या एका कथेप्रमाणे आश्विन अमावास्येला रात्रीच्या वेळी लक्ष्मी सर्वत्र संचार करत असते. सुंदरता, स्वच्छता, शोभा, आनंद, उत्साह अशा सकारात्मक गोष्टी जिथे जिथे असतात, अशा ठिकाणी लक्ष्मी देवी आकर्षित होत असते. म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सूर्यास्तानंतर लक्ष्मी-कुबेर यांचे आनंदाने पूजन करून ऐश्वर्य, संपत्ती, समृद्धीसाठी प्रार्थना करायची असते.
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा. या दिवशी बली आणि त्याची पत्नी विंद्यावली यांचे चित्र काढून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी गोवर्धन पूजाही करतात. या दिवसापासून विक्रमसंवत्सराचा प्रारंभ होत असल्याने व्यापार्‍यांचे नवे वर्षही याच दिवशी सुरू होते. मंगलस्नान करून स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात. काही ठिकाणी रात्रीही ओवाळतात. दिवाळीतील महत्त्वाच्या दिवसांपैकी एक असा हा दिवस आहे. या दिवसा निमित्त अनेक कथा पुराणात प्रसिद्ध आहेत- महादेव-पार्वतीची, बळीराजाची!
दिवाळीचा सहावा दिवस म्हणजेच कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजेच यमद्वितीयेलाच भाऊबीज म्हटले जाते. या दिवशी भाऊ बहिणीकडे हक्काने जातो. प्रेमाने जातो. औक्षण केल्यावर तिला प्रेमाने भेटवस्तू देतो. ऋग्वेदात एक कथा आहे. ब्रह्मदेवाने पृथ्वी निर्माण केली. या सर्व गोष्टींची परतङ्गेड म्हणून सर्व ऋषीमुनींनी मोठा यज्ञ केला. मग या यज्ञात बळी काय द्यायचे हा प्रश्न पडला. यमराज तयार झाला आणि त्याने यज्ञात उडी घेतली. यमाने यज्ञात उडी घेतली, असे कळताच बंधूप्रेमामुळे यमाची बहीण यमी हिनेदेखील यज्ञात उडी घेतली. या आहुतीने यज्ञ समाप्ती झाली. देवही संतुष्ट झाले. त्यांनी यमाला वर दिला, सर्व लोक हा दिवस नक्कीच लक्षात ठेवतील. तुझे आत्मदहन वाया जाणार नाही. त्याची आठवण म्हणून हा दिवस साजरा करतील. यम हा कार्तिक शुद्ध द्वितीयेला बहीण यमीच्या घरी जातो. यमी स्वागत करते, ओवाळते. यम तिला भेट देतो. याच दिवशी नरकात पडलेल्यांना एक दिवसापुरते मुक्त करतो. म्हणून भाऊबीजेला यमद्वितीया असेही म्हणतात. आजच्या काळात भाऊ-बहिणीचे नाते पवित्र आहे. आज हे नाते नि:स्वार्थ कसे राहील याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक स्त्रीकडे सन्मानाने पाहिले पाहिजे.
अशा तर्‍हेने दिवाळीचे सहा दिवस अत्यंत आनंदात, उत्साहात, दिव्यांच्या झगमगाटात, प्रेम-वात्सल्याच्या सागरात डुंबत साजरे करण्यात आगळाच आनंद आहे.