दीड दिवसीय गणेशाचे विसर्जन

0
3

दीड दिवसाच्या गणपतींचे काल राज्यात वाजतगाजत थाटात विसर्जन करण्यात आले. तत्पूर्वी घराघरांत करण्यात आलेल्या आरत्या व भजनांमुळे सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. मिरवणुका व फटाक्यांची आतषबाजी अशा वातावरणात राज्यभरात दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेले होते. गावागावांतील तसेच शहरातील नद्या, तलाव, विहिरी, मंदिरांजवळील तळ्या आदी ठिकाणी गणपतींच्या मूर्तींचे भाविकांच्या गर्दीत विसर्जन करण्यात आले. पणजी परिसरातील मिरामार, करंजाळे, फेरी धक्का, मळा, रायबंदर, सांताक्रूझ, चार खांब व इतर अनेक ठिकाणी दीड दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. काही ठिकाणी विसर्जनाच्या वेळी आलेल्या जोरदार पावसामुळे भाविकांची तारांबळ उडाली. यानंतर आता पाच दिवसांच्या गणपतींचे बुधवारी, तर सात व नऊ दिवसांच्या गणपतींचे अनुक्रमे शुक्रवारी व रविवारी विसर्जन होणार आहे.