दिवाळी व नाताळची सुट्टी कमी

0
289

>> शिक्षण संचालकांची माहिती

कोरोना महामारीमुळे विद्यालये बंद राहिल्याने शैक्षणिक दिवसांचे झालेले नुकसान थोड्या प्रमाणात का होईना पण भरून काढण्याचा प्रयत्न करताना काल शिक्षण खात्याने दिवाळी व नाताळ सणाच्या सुट्टीचे दिवस कमी करण्याचा निर्णय घेतला. दिवाळीची सुट्टी आठ दिवस तर नाताळची सुटी दोन दिवस कमी करण्यात आली असल्याची माहिती शिक्षण संचालक संतोष आमोणकर यांनी काल दै. नवप्रभाशी बोलताना दिली. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यास अडचणी येऊ नयेत यासाठी शिक्षण खात्याने हे पाऊल उचलण्याची माहिती त्यांनी दिली. शिक्षण खात्याने काल काढलेल्या एका आदेशाद्वारे दिवाळीच्या व नाताळ सणाच्यावेळी दिल्या जाणार्‍या वार्षिक सुट्टीत फेरबदल करताना दिवाळीची सुटी आठ दिवस तर नाताळाची सुटी दोन दिवस कमी केली. या फेरबदलानुसार यंदा दिवाळीची सुटी ही ९ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर अशी असेल. तर नाताळाची सुटी ही २४ ते ३१ डिसेंबर अशी असेल.

मात्र, शिक्षकांनी यासंबंधी आपले मत व्यक्त करताना शाळा काही सुरू झालेल्या नसल्याने शिक्षण खात्याने सुट्टी कमी करण्याचे पाऊल का उचलले हे खात्यालाच माहीत अशा प्रतिक्रिया दिल्या. दरम्यान, राज्यातील विद्यालये कधी सुरू करावीत याबाबत राज्य सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही.