गुळेलीत आयआयटीला विरोध सुरूच

0
301

>> मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही महिलांचे आंदोलन

जोपर्यंत सरकार आम्हाला येथून आयआयटी प्रकल्प अन्य ठिकाणी नेतो असे लिहून देत नाही तोपर्यंत प्रकल्पाला आमचा विरोध कायम राहणार आहे. मग आम्हाला कितीही भुलवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही भुलणार नाही असा इशारा काल शुक्रवारी मुरगुणे येथे आंदोलनकर्त्या महिलांनी दिला.

गुरुवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नियोजित गुळेली आयआयटी प्रकल्पाच्या ठिकाणी भेट देऊन तेथील लोकांचे म्हणणे ऐकून घेतले होते. परंतु त्यातून समाधान न झाल्याने येथील विरोधकांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले असून काल शुक्रवारीही मुरमुणे या ठिकाणी सकाळी महिलांची उपस्थिती होती.

गुरूवारी मुक्मयंत्री डॉ. सावंत यांनी नियोजित आयआयटी प्रकल्पाच्या ठिकाणी भेट दिली होती. स्वत: मुख्यमंत्री सावंत, उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मनेका, सत्तरी तालुका उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर, सत्तरी मामलेदार दशरथ गावस, पंच अर्जुन मेळेकर, माजी नगरगाव जिल्हा पंचायत सदस्य प्रेमनाथ हजारे, वाळपई पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर आदींची यावेळी उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नियोजित आयआयटी प्रकल्पाच्या जागेची पाहणी मेळावली व मुरमुणे या भागात फिरून केली होती. लोकांना विश्वासात घेऊन सरकार सर्व ठिकाणी प्रकल्प राबवत असतात. तेव्हा या ठिकाणी ही लोकांना विश्वासात घेतले जाईल अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली होती. सरकार बरोबर चर्चा करण्यासाठी या बैठकीत मुख्यमंत्री डा. यावंत यांनी मेळावलीवासीयांना एक १०-१५जणांची समिती स्थापन करण्याचे व प्रकल्पाला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाने लोकांचे समाधान झाले नाही.

मुख्यमंत्री गेल्यानंतर स्थानिक महिला प्रतिनिधी निकिता नाईक म्हणाल्या की, मुख्यमंत्री या ठिकाणी आपले म्हणणे आम्हाला सांगायला आले होते का? कारण आमचे विशेषत: महिलांचे काय म्हणणे आहे ते मुख्यमंत्र्यांनी ऐकूनच घेतले नाही. आम्ही त्यांना विचारु इच्छितो की आज जे त्यांनी आम्हाला आश्‍वासने दिली आहेत. मात्र त्या आमच्या मागण्या यापूर्वी का पूर्ण केल्या नाहीत? जमीन नावावर करण्याचा प्रश्‍न तसेच घरक्रमांक तसेच शौचालय बांधून देणे या सर्व गोष्टी आम्ही आयआयटीला विरोध केल्यानंतरच सरकारला का आठवल्या? यापूर्वी राणे सरकारने हे प्रश्‍न का सोडवले नाहीत? असे सवाल त्यांनी केले.