दिल्लीने केरळा ब्लास्टर्स बरोबरीत रोखले

0
68
Andrija Kaludjerovic of Delhi Dynamos FC scores a goal during match 13 of the Hero Indian Super League 2018 ( ISL ) between Kerala Blasters FC and Delhi Dynamos FC held at Jawaharlal Nehru Stadium, Kochi, India on the 20th October 2018 Photo by: Faheem Hussain /SPORTZPICS for ISL

कोची
अँड्रीया क्लाऊडेरोविचने दुसर्‍या सत्रात नोंदविलेल्या गोलमुळे दिल्ली डायनॅमोजने केरळा ब्लास्टर्सला कोचीतील नेहरू स्टेडियमवर झालेल्या सामन्यात १-१ असे बरोबरीत रोखत इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेतील लढतीत गुण विभागून घेतला. उत्तरार्धाच्या प्रारंभी सी. के. विनीतने ब्लास्टर्सचे खाते उघडले होते, पण सहा मिनिटे बाकी असताना अँड्रीया क्लाऊडेरोविच याने दिल्लीला बरोबरी साधून दिली.
ब्लास्टर्सची तीन सामन्यांतील दुसरी बरोबरी असून एका विजयासह त्यांचे पाच गुण झाले. त्यांनी दुसरा क्रमांक गाठला. दिल्लीचे दोन गुणांसह आठवे स्थान कायम राहिले. घरच्या मैदानावर सर्वाधिक प्रोत्साहन मिळणार्‍या संघांमध्ये ब्लास्टर्सची गणना होते. अखेरच्या टप्यात बचावातील चुकांमुळे त्यांची कमाल तीन गुण वसूल करण्याची संधी हुकली.
या लढतीत दोन्ही संघांनी अनेक प्रयत्न केले. अखेर पूर्वार्धातील गोलशून्य बरोबरीची कोंडी उत्तरार्धात तिसर्‍याच मिनिटाला सुटली. एकूण ४८व्या मिनिटाला ब्लास्टर्सला कॉर्नर मिळाला. उजवीकडून स्लावीस्ला स्टोजानोविच याने बॉक्समध्ये चेंडू मारला, तो रोखण्यात दिल्लीची बचाव फळी अपयशी ठरली. चेंडू मॅटेज पॉप्लॅटनिकपाशी गेला. त्याने पुढे मारलेला चेंडू विनीतच्या डाव्या पायापाशी गेला. विनीतने मग दिल्लीचा गोलरक्षक फ्रान्सिस्को डोरोन्सोलो याला चकविले.
खाते उघडल्यानंतर केरळने काही प्रयत्न करीत दिल्लीवर दडपण ठेवले होते, पण दिल्लीनेही प्रयत्न सोडले नाहीत. ८४व्या मिनिटाला ब्लास्टर्सचा बदली खेळाडू मॅटेज पॉप्लॅटनिक हेडिंगवर बचाव करू शकला नाही. त्यामुळे प्रीतम कोटलकडे चेंडू गिला. त्याने नेटसमोर फटका मारला. निकोला क्रॅमरेविच याला उडी घेऊनही किकने चेंडू अडविता आला नाही. यामुळे मिळालेल्या संधीने अँड्रीयाने सोने केले.
पूर्वार्धात दोन्ही संघांनी बरेच प्रयत्न केले. यात दिल्लीचे प्रमाण जास्त होते. पहिला प्रयत्न ब्लास्टर्सने दुसर्‍या मिनिटाला नोंदविला, पण साहल अब्दुल समाद याने मारलेला क्रॉस शॉट डोरोन्सोरो याच्या अगदी जवळ गेला. चौथ्या मिनिटाला दिल्लीला कॉर्नर मिळाला. लिलायनझुला छांगटे याला पेनल्टी क्षेत्रात संदेश झिंगन याने रोखले, पण त्याने अडविलेला चेंडू बाहेर गेला. त्यामुळे डावीकडून मिळालेला कॉर्नर रेने मिहेलीच याने घेतला. त्याने चांगला चेंडू मारला होता, पण रोमीओ फर्नांडीस टाचेने प्रयत्न करताना अचूकता साधू शकला नाही. ११व्या मिनिटाला छांगटे याने दिल्लीकडून आणखी एक प्रयत्न केला. पण त्यांनी तो वाया घालविला.
दुसर्‍या सत्रात सुरवातीलाच खाते उघडल्यानंतर ब्लास्टर्सने बरेच प्रयत्न केले. ५२व्या मिनिटाला समादच्या चालीवर सैमीनलेन डुंगल याने केलेले हेडिंग कमकुवत होते.५६व्या मिनिटाला विनीतने उत्तम पास दिल्यानंतर डुंगलने डाव्या पायाने मारलेला फटका थोडक्यात बाहेर गेला. ५९व्या मिनिटाला समादने आणखी एकदा प्रयत्न केला. ६४व्या मिनिटाला मॅटेजच्या चालीवर विनीतची किक फसली.