ऋषभ पंतला वनडे पदार्पणाची संधी

0
60
New Delhi: Rishabh Pant of Delhi Daredevils in action during an IPL 2018 match between Delhi Daredevils and Mumbai Indians at Feroz Shah Kotla Stadium in New Delhi on May 20, 2018. (Photo: ​Surjeet Yadav/​IANS)

गुवाहाटी
वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेला आज गुवाहाटीतील दिवसरात्र होणार्‍या पहिल्या लढतीने प्रारंभ होणार असून भारतीय संघ पुढील वर्षी होणार्‍या विश्वचषकाच्या तयारीसाठी मैदानावर उतरणार आहे. या सामन्यात डावखुरा युवा फलंदाज ऋषभ पंतला अंतिम अकरात स्थान मिळणार हे निश्‍चित झाले आहे. हा सामना दुपारी १.३० वा. सुरू होणार आहे.
काल भारतीय संघ व्यवस्थापनाने पहिल्या वनडेसाठी आपल्या १२ सदस्यीय संघाची घोषणा केली असून अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन व लोकेश राहुलला त्यात स्थान मिळालेले नाही. डावखुरा दु्रतगती गोलंदाज खलिल अहमदची १२वा खेळाडू म्हणून निवड झाली आहे. तर अंबाती रायडूलाही अंतिम अकरात स्थान मिळालेले आहे.
पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणार्‍या विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला एकूण १८ सामने खेळण्यास मिळणार आहे. त्यानुसार संघरचना केली जात असून युवा खेळाडूंनाही परखले जात आहे. ऋषभ पंतने विंडीजविरुद्धच्या मालिकेत शतकी खेळी केली होती. त्याचा फायदा त्याला झाला असून फलंदाज म्हणून त्याला संघात स्थान मिळालेले आहे. कारण यष्टिरक्षक म्हणून महेंद्रसिंह धोनीलाच प्रथम पसंती असेल. ऋषभच्या समावेशामुळे मात्र मध्यफळी काहीशी मजबूत बनणार आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीही या मालिकेद्वारे वनडेमध्ये पुन्हा परतणार आहे. त्याला या मालिकेत १० हजारी पल्ला गाठण्याची संधी आहे. सध्या कोहलीने वनडेन ९७७९ धावा बनविल्या असून त्याला ‘दहा हजारी’ बनण्यासाठी केवळ २२१ धावांची आवश्यकता आहे. ऋषभला पदार्पणाची संधी दिल्याने धोनीला आपली कामगिरी उंचावण्याची जबाबदारी वाढलेली आहे. कारण आशिया चषक स्पर्धेत त्याला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्याने चार सामन्यात केवळ ७७ धावा बनविल्या होत्या. आशिया चषकातील सरस कामगिरीमुळे अंबाती रायडूलाही संघात स्थान मिळालेले असून त्याला आपले स्थान आणखी मजबूत करण्याची संधी आहे. आशिया चषकात त्याने ६ डावात १७५ धावा बनविल्या होत्या. गोलंदाजीत कुलदीप यादव व युजवेंद्र चहल हे फिरकीद्वयी आपले जादू पुन्हा पसरविण्यासाठी सज्ज असतील. त्यांच्या साथीला डावखुरा फिरकीपटू रविंद्र जडेजाही असेल. जसप्रीत बुमराह बाहेर असल्याने द्रुतगती गोलंदाजीची धुरा मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांच्यावर असेल. दरम्यान, पाहुणा संघ कसोटीतील मानहानीकारक पराभव विसरून वनडेत नवीन सुरुवात करण्यासाठी प्रयत्नशील असेल. परंतु ख्रिस गेल, आंद्रे रसेल आणि इविन लुईस संघात नसल्याने त्यांच्यावरील दबाव आणखी वाढलेला असेल हे मात्र निश्‍चित. संघाची धुरा कर्णधार जेसन होल्डरच्या कामगिरीवर असेल. फेबियन एलिन, सुनील अँब्रिस, देवेन बिशू, शिमरोन हेटमेयर व किरॉन पॉवेल यांनाही चांगली कामगिरी करीत विंडीजला मालिकेत विजयी सलामी देण्यासाठी प्रयत्न करावा लागले.
संघ पुढील प्रमाणे ः भारत – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायडू, ऋषभ पंत, महेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, उमेश यादव, मोहम्मद शमी, खलील अहमद.
वेस्ट इंडीज – जेसन होल्डर (कर्णधार), फेबियन एलिन, सुनील अँब्रिस, देवेंद्र बिशू, चंद्रपॉल हेमराज, शिमरोन हेटमेयर, शाई होप, अल्जरी जोसेफ, कायरॉन पॉवेल, ऍश्‍ले नर्स, कीमो पॉल, रोवमॅन पॉवेल, केमार रोच, मर्लोन सॅमुअल्स, ओशाने थॉमस आणि ओबेद मॅक्कॉय.