देशात कोरोनाची दुसरी लाट सुरु असताना दिल्लीत म्युकरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगसचे रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या काही दिवसात राजधानी दिल्लीत ब्लॅक फंगसची अनेक प्रकरणे दिसून येत आहेत. त्यात दोन रुग्णांना दुर्मिळ ब्लॅक फंगसची लागण झाल्याने डॉक्टरांतही चिंता वाढली आहे.
दिल्लीत ५६ आणि ६८ वर्षीय अशा दोन व्यक्तींना दुर्मिळ ब्लॅक फंगसची लागण झाली आहे. या दोघांनाही मधुमेह आहे. तर एका रुग्णाला कोरोना उपचारादरम्यान स्टेरॉइड दिले होते. डॉक्टरांनी त्यांना सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला. त्यात दोघांच्या छोट्या आतड्यांना छीद्र पडल्याचे दिसून आले. हा दुर्मिळ ब्लॅक फंगसचा प्रकार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले आहेत.
औषधाचा पुरवठा वाढवला
देशातल्या म्युकरमायकोसिस आजारावरच्या उपचारासाठी वापरण्यात येणार्या एस-फोटेरिसिन बी या औषधाच्या उपलब्धतेबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आता माहिती देण्यात आली आहे. या औषधाचा पुरवठा वाढवण्यात येणार असल्याचेही मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. सध्या देशामध्ये या औषधाचा तुटवडा आहे. पण आता त्याची उपलब्धता आणि पुरवठा वाढवण्यात आल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले. तर ५ अतिरिक्त उत्पादकांना या औषधाच्या निर्मितीसाठीचा परवाना देण्यासाठी औषध मंत्रालय आरोग्य मंत्रालयाशी समन्वय साधत असल्याचेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.
विरोधकांची मागणी
देशात सध्या म्युकरमायकोसिस अर्थात काळ्या बुरशीवरील उपचारासाठीच्या औषधांचा तुटवडा भासू लागला आहे. यामुळे विरोधकही आक्रमक झाले आहेत. काल कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदींकडेपत्राद्वारे या औषधाची उपलब्धता तात्काळ वाढवावी अशी मागणीही केली आहे. तसेच अन्य आरोग्य विम्यांमध्ये म्युकरमायकोसिसचाही समावेश करण्याची मागणी त्यांनी केली आहे. याचबरोबर उपचारासाठी रूग्णांना हे औषध मोफत उपलब्ध करून दिले जावे अशीही विनंती त्यांनी केली आहे.