चित्ररथात गोव्याच्या पारंपरिक संस्कृती व वारशाची दिसली झलक; कर्तव्यपथावर भारताच्या विविध सैन्य दलांकडून संचलन
भारताचा 76 व्या प्रजासत्ताक दिन सोहळा दिल्लीच्या कर्तव्यपथावर दिमाखात पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रध्वज फडकवून प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची सुरुवात केली. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक केंद्रीय मंत्री हजर होते. कर्तव्यपथावर भारताच्या विविध सैन्य दलांनी संचलन केले. तसेच या संचलनात इंडोनेशियाचे पथकदेखील सहभागी झाले होते. कर्तव्यपथावर काल 16 राज्ये, केंद्रशासित प्रदेश, तसेच केंद्र सरकारच्या 10 मंत्रालयांनी आपले चित्ररथ सादर केले. ‘स्वर्णिम भारत : वारसा आणि विकास’ या संकल्पनेवर हे चित्ररथ सादर झाले. त्यात गोव्याचा चित्ररथ लक्षवेधी ठरला. गोव्याच्या चित्ररथावर कावी चित्रकलेची झलक, पारंपरिक पोषाखात पणती प्रज्लवन करणारी महिला, समुद्र किनाऱ्यावर जलक्रीडांचा आनंद घेणारे पर्यटक, बीच वेडिंग आणि आग्वाद किल्ल्याची प्रतिकृती दिसून आली.
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात 16 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी आपल्या संस्कृती आणि वारशाचे दर्शन चित्ररथांमधून घडवले. गोवा, उत्तराखंड, हरियाणा, झारखंड, गुजरात, आंध्रप्रदेश, पंजाब, उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, त्रिपुरा, कर्नाटक, पश्चिम बंगाल, चंदीगढ, दिल्ली, दादरा नगर हवेली आणि दमण-दीव यांनी चित्ररथ सादर केले.
संस्कृती मंत्रालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने परेडची सुरुवात झाली. 300 कलाकारांनी वाद्ये वाजवत परेड काढली. त्यानंतर इंडोनेशियन लष्करी कर्मचाऱ्यांची एक तुकडी कर्तव्यपथवर परेडमधून गेली. भारतीय सैन्याच्या सैनिकांनी भीष्म टँक, पिनाक मल्टी लाँचर रॉकेट सिस्टीमसह संचलन केले. हवाई दलाच्या फ्लायपास्टमध्ये 40 विमानांनी भाग घेतला. ज्यामध्ये 22 लढाऊ विमाने, 11 वाहतूक विमाने आणि 7 हेलिकॉप्टर सहभागी झाले होते. या फ्लायपास्टमध्ये अपाचे, राफेल आणि हरक्युलिस ही विमाने सहभागी होती.