दिगंबर कामत यांची पुन्हा चौकशी

0
77

>> लुईस बर्जर लाचप्रकरण 

 

लुईस बर्जर लाचप्रकरणी सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने काल सकाळपासून संध्याकाळपर्यंत माजी मुख्यमंत्री तथा मडगावचे सध्याचे आमदार दिगंबर कामत यांची कसून चौकशी केली. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ईडीच्या कार्यालयात सकाळी दाखल झाले होते.
न्यूजर्सीस्थित वरील कंपनीला दिलेल्या कंत्राटासंबंधी कामत यांच्यासह माजी साबांखामंत्री चर्चिल आलेमाव, प्रकल्प संचालक आनंद वाचासुंदर यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप आहे. काल कामत यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती करण्यात आली. मुख्यमंत्री असताना कामत यांनी सदर प्रकल्पाच्या ङ्गाईलवर केलेल्या नोंदीविषयी त्यांना विविध प्रश्‍न विचारल्याचे सूत्रांनी सांगितले. लुईस बर्जर लाचप्रकरणी गुन्हा अन्वेषण पोलिसांनी कामत यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केल्याने त्यांना अटक करणे पोलिसांना शक्य झाले नव्हते. कामत यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, बरेच महिने उलटूनही न्यायालयाने या आव्हान याचिकेवर निवाडा दिलेला नाही.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जायका प्रकल्पासाठी सल्लागाराचे कंत्राट मिळालेल्या अमेरिकास्थित लुईस बर्जर कंपनीने एका भारतीय मंत्र्याला कोट्यवधींची लाच दिल्याचा गौप्यस्ङ्गोट करून खळबळ उडवून दिली होती. यानंतर ईडीने गुन्हा नोंद करून तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव, जायकाचे प्रकल्प संचालक आनंद वाचासुंदर व लुईस बर्जर कंपनीचे भारतातील उपाध्यक्ष सत्यकाम मोहंती या संशयितांना अटक केल्यानंतर न्यायालयाने नंतर त्यांची जामिनावर सुटका केली होती.