तालिबान्यांकडून १०० विद्यार्थ्यांची हत्या

0
77
अतिरेक्यांच्या गोळीबारात ठार झालेल्या एका विद्यार्थ्याची शवपेटी इस्पितळातून बाहेर आणली जात असताना.

पाकमधील शाळेत घुसून बेछूट गोळीबार : एकूण बळी १४५ : नऊही हल्लेखोरांचा खात्मा
अद्ययावत शस्त्रसामुग्रीने सुसज्ज अरबी बोलणार्‍या आत्मघाती तालिबानी हल्लेखोरांनी काल पाकिस्तानच्या पेशावर शहरातील लष्करातर्फे चालविल्या जाणार्‍या एका शाळेत घुसून तेथील वर्गांमध्ये जाऊन केलेल्या बेछूट गोळीबारात किमान १०० विद्यार्थ्यांसह १४५ जण ठार झाले. याचबरोबर या अमानुष कृत्यासाठी या हल्लेखोरांनी मानवी ढालीच्या स्वरूपात शंभराहून अधिक विद्यार्थी व शिक्षकांना ओलीसही ठेवले होते. पाकिस्तानमधीलच तेहरीक-ए-तालिबान या दहशतवादी गटाने हा हल्ला घडवून आणल्याचे सांगण्यात आले. अखेर ८ तासांच्या धुमश्‍चक्रीनंतर हा थरार संपला व पाक लष्कराने शाळेचा ताबा घेतला.या हल्ल्याची जगभरातील नेत्यांसह भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कठोर शब्दात निर्भत्सना केली. पाकिस्तानमधील शाळेमधील हल्ला हे भ्याड कृत्य असून शब्दात व्यक्त न होऊ शकणारी निर्दयी अशी घटना आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे. दोन वर्षांपूर्वी नोबेल विजेती मलाला मुसुफजाई हिच्यावरही तालिबान्यांकडून तिच्या शाळेजवळ प्राणघातक हल्ला झाला होता.
अधिकृत माहितीनुसार हल्ला झालेली शैक्षणिक संस्था ही लष्करी सार्वजनिक शाळा असून तेथे पहिली ते दहावी पर्यंतचे वर्ग चालविले जातात. या नृशंस हत्याकांडाचा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी तीव्र निषेध केला असून पेशावर येथे ते दाखल झाले. आत्मघाती हल्लेखोरांची संख्या मोठी नसल्याचेही सांगण्यात आले. पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी शाळा सुरू झाल्यानंतर हल्ल्याची घटना घडली. अर्धा डझन बंदुकधारी शाळेत घुसले व त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला व घाबरलेल्या विद्यार्थ्यांची पळापळ सुरू झाली. मुलांच्या किंकाळ्या सुरू झाल्या. या हल्ल्यानंतर लगेच लष्कराच्या गाड्यांनी शाळेचा संपूर्ण परिसर घेरला व वरून लष्करी हेलिकॉप्टर्सनी टेहळणी सुरु केली.

दरम्यान, तालीबानने या अमानुष्य हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तालीबानच्या प्रवक्ता महम्मद खुरासानी याने प्रसारमाध्यमांशी दूरध्वनीवरून त्यासंदर्भात संपर्क साधून पाकिस्तानी सरकारकडून तालीबानच्या सहा जणांच्या झालेल्या हत्येचा बदला म्हणून सहा आत्मघाती हल्लेखोरांकडून हे हत्याकांड घडविण्यात आणल्याचे सांगितले. मात्र पेशावर प्रांताच्या मुख्यमंत्र्यांनी हल्लेखोर आठजण होते व ते लष्करी गणवेषात होते असे म्हटले आहे. त्यापैकी दोघेजण सुरक्षा दलांकडून मारले गेले व एकाने स्वत:ला उडवून लावले. तर अन्य अजूनही सुरक्षा दलांशी लढत असल्याचे सांगितले. अन्य एका वृत्तानुसार चार दहशतवाद्यांनी स्वत:ला उडवून लावले. तर दोघेजण सुरक्षा दलांच्या कारवाईत ठार झाले आहेत.