दहावी, बारावी परीक्षांच्या नवीन तारखांबाबत परिपत्रक

0
134

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची मार्च मधील पुढे ढकलण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेची नवीन तारीख परीक्षेच्या ५ दिवस आणि दहावीच्या परीक्षेची नवीन  तारीख  परीक्षेच्या १० दिवस अगोदर जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव भागिरथ शेट्ये यांनी एका परिपत्रकाद्वारे काल दिली.

राज्यातील बारावी आणि दहावीच्या परीक्षा कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षांबाबत काही जणांकडून अफवा पसरविण्यात येत आहेत. त्यामुळे मंडळाला खास परिपत्रक जारी करून माहिती द्यावी लागत आहे. बारावीच्या परीक्षेतील काही पेपर्स शिल्लक आहेत. तर, दहावीच्या परीक्षेला सुरुवात झालेली नाही. या दोन्ही परीक्षा या प्रवेश परीक्षा आणि प्रवेश तारखा लक्षात घेऊन घेतल्या जाणार आहेत, असे पत्रकात म्हटले आहे.

मंडळातर्फे बारावीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम अद्यापपर्यंत हाती घेतले नाही. उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाबाबत २ ते ३ दिवस पूर्वी मुख्य परीक्षा नियंत्रक, परीक्षा नियंत्रक  आणि परीक्षकांना माहिती  दिली जाणार आहे.

नववी आणि अकरावी इयत्तांच्या मुलांच्या अंतिम गुणपत्रिकेत सुधारणा आवश्यक असा शेरा असलेल्या मुलांना पुरवणी परीक्षेला बसण्यास मान्यता दिली जाणार आहे, असेही परिपत्रकात म्हटले आहे.

शाळा प्रमुखांनी शिक्षकांना सुट्टी देऊ नये. परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी शिक्षकांची आवश्यकता आहे. सूचनेचे पालन न करणार्‍यावर कारवाई केली जाऊ शकते. शाळा प्रमुखांनी नवीन परिपत्रकाबाबत सर्वांना माहिती द्यावी. मंडळाच्या परीक्षांबाबत अफवांवर कुणीही विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.