दहावी-बारावीचे वर्ग १००% लसीकरणानंतरच

0
95

>> मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची महत्त्वपूर्ण घोषणा

>> दोन लशींमधील अवधी कमी करण्याचा केंद्राकडे प्रस्ताव

राज्यातील शंभर टक्के लसीकरण पूर्ण होताच दहावी तसेच बारावीचे वर्ग सुरू करण्यात येतील अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल साखळी येथे केली.

शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत शिक्षक व संबंधित कर्मचारी यांच्यातील दोन लशींचा ८५ दिवसांचा अवधी कमी करून तो ३० दिवस करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. केंद्र सरकारकडे त्यासाठी आपण मंजुरीची वाट पाहत आहे. तसे झाल्यास मुलांची सुरक्षा पडताळून विद्यालये व महाविद्यालये सुरू करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी दिली.

सर्वाधिक पहिला
डोस गोव्यात

कोविड व्यवस्थापनात लसीकरण मोहिमेत गोवा हे देशात सर्वाधिक पहिला डोस घेणारे राज्य ठरले आहे, अशीही माहिती यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली. राज्यातील नव्वद टक्के लोकांनी पहिला डोस घेतला असून शंभर टक्के लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ३० जुलैपर्यंत ठेवले आहे. त्यामुळे ज्यांनी अजून पहिला डोस घेतला नाही, त्यांनी त्वरित घेण्याचे आवाहन डॉ. सावंत यांनी केले. अजून किमान एक लाख लोक लसीकरणाशिवाय आहेत असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील कोविड व्यवस्थापनात मोठे यश आले असून सर्व प्रकारची खबरदारी घेताना शैक्षणिक क्षेत्रातील कर्मचारी शिक्षक, बालरथ, चालक व इतरांचे दोन्ही डोस तीस दिवसांत पूर्ण करून शैक्षणिक वर्ग सुरू करण्याचा आमचा विचार आहे. त्या दृष्टीने तयारी सुरू केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दहावी तसेच बारावीचे वर्ग नियमित सुरू करताना सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून वर्ग सुरू करण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करीत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

लसीकरणासाठी आवाहन
राज्यात लसीकरणासाठी पात्र असलेल्या जवळपास ९० टक्के नागरिकांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे. सरकारने ३० जुलैपर्यंत १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे अद्याप ज्या नागरिकांनी लशीचा पहिला डोस घेतलेला नाही त्यांनी त्वरित संपर्क साधून आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रातून किमान पहिला डोस घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले आहे.

चोवीस तासांत ५ बळी,
१३१ नवे कोरोनाबाधित

राज्यात गेल्या चोवीस तासांत नवे १३१ रुग्ण आढळून आले असून आणखी ५ कोरोना रुग्णांचा बळी गेला आहे. राज्यातील सध्याच्या रुग्णांची संख्या १४१३ एवढी झाली आहे. एकूण कोरोना बळींची संख्या ३११८ एवढी झाली आहे. राज्यातील नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण २.९५ टक्के एवढे आहे.

राज्यात नवीन कोरोना रुग्ण आढळून येण्याच्या प्रमाणात चढउतार सुरू आहे. त्याचबरोबर कोरोना बळीच्या संख्येतही जुलै महिन्यात चढउतार सुरू आहे. काल बुधवारी इस्पितळांतून १० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ७० हजार १०२ एवढी झाली आहे. गेल्या चोवीस तासांत ४४२७ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील १३१ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. राज्यातील १२२ रुग्ण बरे झाले आहेत. बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ६५ हजार ५७१ एवढी आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३४ टक्के एवढे आहे. १०७ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे.