दशावतारी नाट्यपरंपरा जपण्यासाठी

0
222

– ऍड. शिवाजी य. देसाई, सत्तरी
दशावतारी नाट्य परंपरा जपण्यासाठी मराठी अस्मिता केंद्र- वाळपईच्या वतीने प्रसिद्ध दशावतारी नाट्यकलाकार सूर्यकांत राणे यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम वाळपईतील डॉ. आमशेकर सभागृहात नुकताच संपन्न झाला. मराठी भाषेसाठी सातत्याने सत्तरीत धडपड करणारे विजय नाईक यांनी ही मुलाखत घेतली. या मुलाखतीमधून बर्‍याच गोष्टी उजेडात आणण्यात विजय नाईक यशस्वी ठरले. विजय नाईक यांचा हा आगळा-वेगळा प्रयोग होता. त्यासाठी त्यांनी भरपूर मेहनत आणि प्रयत्न देखील केले होते. त्यांच्या या प्रयत्नातून दशावतारी नाट्यपरंपरेतील अनेक गोष्टींचा उहापोह झाला.सूर्यकांत राणे हे शिरोडा-सत्तरी येथील सुप्रसिद्घ दशावतारी नाट्यकलाकार. अगदी बालपणापासून गेली चाळीस वर्षे अनेक संकटे झेलून यशस्वीततेने त्यांनी या नाट्यकलेचा वसा सांभाळला. आजपर्यंत त्यांनी पाचशेच्यावर दशावतारी नाटकांत भूमिका वठवल्या आहेत. त्यात त्यांनी विशेषत्वाने स्त्री – भूमिका केल्या. ते दशावतारी नाटकांत प्रसिद्ध आहेत ते स्त्रीपात्रांच्या विशेष भूमिकांसाठी. गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, उडुपी, बीड जिल्हा, हैदराबाद, नवी दिल्ली अशा अनेक ठिकाणी राणे यांनी दशावतारी नाट्यप्रयोग सादर केले आहेत. आता मात्र त्यांनी निवृत्ती पत्करली आहे. अशा या नाट्यकलाकाराच्या मनातील भावनांना विजय नाईक यांनी वाट मोकळी करून दिली.
मुळात दशावतारी नाट्य-परंपरा कर्नाटकातून महाराष्ट्रात आली. सिंधुदुर्गातील तीन ब्राह्मण केशव, माधव, मुकुंद-मुरारी हे पूजेसाठी कर्नाटकात गेले होते. तिथे त्यांनी यक्षगान पाहिले. यक्षगानात सूत्रधार असतो. हा सूत्रधार रंगमंचावर येणारा नाट्यकलाकार काय करणार हे सुरुवातीला गाऊन सांगत असतो. नंतर हे तिघे ब्राह्मण आठशे ते नऊशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले. त्यातील एक राहिला कुडाळजवळील वालावल या गावात. दुसरा जन्मतः तिथला तर तिसरा परुळे या गावात राहिला. या ब्राह्मणांनी गावच्या लोकांना जवळ केले आणि दशावतारी नाट्यप्रयोगाला सुरुवात झाली. आज या तिन्ही ब्राह्मणांच्या नावाने तीन दगड वालावल येथे आहेत. दशावतारी नाटकाला सुरुवात करतानाच सुरुवातीला या तिन्ही पूर्वजांची ओवीच्या माध्यमातून नावे घेतली जातात. सूर्यकांत राणेंनी एक-एक किस्सा उलगडायला सुरुवात केली.
महत्त्वाचे म्हणजे दशावतारी नाटकांची परंपरा लिखित संहिता नसताना आजही टिकून आहे. पौराणिक साहित्याचे वाचन करायचे. त्यातून नाटकासाठी लागणार्‍या प्रसंगांवर दशावतारी नाट्यकलाकारांनी चर्चा करायची. पात्रे निवडायची आणि स्वतःच्या शब्दात जसे स्वतःला समजेल तसे दशावतारी नाटक सादर करायचे. केवढा हा अट्टाहास! अर्थात यासाठी निश्‍चितपणे पौराणिक साहित्य वाचनाची गरज लागतेच. व्यावसायिक रंगभूमीवरची पौराणिक नाटके आणि दशावतारी नाटके यातील फरक आपण जाणून घेतला पाहिजे. व्यावसायिक रंगभूमीवरच्या पौराणिक नाटक लिखित स्वरुपात असते. परंतु याचा उपयोग दशावतारी नाटकांत केला जातो असे दिसून येत नाही. अपवाद असू शकेल.
सूर्यकांत राणे यांनी जवळपास सर्व दशावतारी नाटक कंपन्यांसाठी काम केले आहे. त्यात मामा मोचेमाडकर, वालावलकर, पार्सेकर दशावतार, नाईक मोचेमाडकर अशा अनेक नाटक कंपन्यांचा समावेश आहे. सुरुवातीच्या काळात विजेचा अभाव असताना मशाली पेटवून नाटक सादर केले जायचे. नाट्यकलाकारांचा आवाज अगदी मागच्या, शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी बेंबीच्या देठापासून मोठ्याने बोलावे लागायचे. ध्वनिक्षेपक नव्हता त्यावेळी. गावागावात सामान डोक्यावर घेऊन चालत जावे लागायचे. राना-वनांतून, झाडाझुडपांतून रात्रंदिवस नाटक सादर करण्यासाठी चालावे लागायचे. जिथे दोन वाटा मिळतात तिथे झाडाची फांदी किंवा टाळ टाकून मागून येणार्‍या नाट्य कलाकारांसाठी खूण ठेवली जायची आणि अशा परिस्थितीत देखील आरोग्य नीट राखून नाटक वेळेवर सादर होणे गरजेचे असायचे. कधी-कधी तर चालून चालून थकलेला नाट्यकलाकार अचानक आजारी पडायचा. अशा वेळी बाका प्रसंग यायचा. लोकांच्या स्तुतीबरोबरच कधी-कधी टवाळी देखील ऐकायला मिळायची. परंतु संयम महत्त्वाचा असायचा. सूर्यकांत राणेंनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. राणेंच्या जीवनातील एक प्रसंग यावेळी उलगडला. त्यांना महाराष्ट्रात चौकुळ येथे दशावतारी नाट्यप्रयोग सादर करायचा होता आणि त्याचवेळी त्यांच्या पत्नीची प्रसूती होणार होती. त्या नाटकात ते स्त्रीपात्राची भूमिका साकारणार होते आणि स्त्री पात्र करणारे ते एकमेव कलाकार असल्याने कोणत्याही परिस्थितीत त्यांनी ती भूमिका सादर करावीच लागणार होती. बायकोच्या प्रसूतीवेळी नवरा सोबत असणे आवश्यक असते. कशी परिस्थिती येईल याची देखील शाश्‍वती नसते. परंतु हजारो प्रेक्षकांच्या आनंदावर विरजण पडायचे नाही हा तर नाट्यकलाकाराचा धर्म. आणि अशा परिस्थितीत त्यांनी बायकोच्या सोबत राहायचे सोडून फक्त डॉक्टरांवर विश्‍वास ठेवून चौकुळ येथे स्त्री पात्राची भूमिका सादर केली. आपल्या पत्नीने प्रत्येक गोष्टीमध्ये पाठबळ दिल्याचे ते आवर्जून सांगतात, कारण पत्नी पाठीशी असल्याशिवाय वारंवार नाटकांसाठी दौरे करणे शक्य नसते. कौटुंबिक साथ प्रत्येक माणसाला पुढे जाण्यासाठी गरजेची असते. दशावतारी नाट्यक्षेत्रात व्यवसायिक नाटकांप्रमाणे भरपूर पैसा नाही. परंतु समाधान मात्र निश्‍चितच असते. आज जेथे-जेथे कालोत्सव, जत्रोत्सवात दशावतारी नाट्य प्रयोग होतात, तेथील प्रत्येक देवस्थान समित्यांकडे, लोकांकडे दशावतारी नाट्य कलाकारांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असतात. मराठी भाषेची संस्कृती खर्‍या अर्थाने जर कोणी जपली असेल तर ती दशावतारी नाटकांनीच हे सूर्यकांत राणे आवर्जून सांगतात.
आठशे-नऊशे वर्षांपासून जेव्हा मनोरंजनाची साधने नव्हती, तेव्हा दशावतारी नाटकांनीच लोकांचे मनोरंजन केले. परंतु आजची युवा पिढी मात्र या नाटकांकडे वळणे किंवा या नाटकक्षेत्रात प्रवेश करणे कठीण असल्याचे राणे म्हणतात, कारण हे नाट्यक्षेत्र अत्यंत कठीण तर आहेच, पण त्यात जसा पैसा आजच्या युवा पिढीला हवा आहे तो मात्र मिळणार नाही. दशावतारी नाटक हे एक व्रत आहे आणि त्यासाठी कठीण साधना आणि संयम लागतो. या नाटकांची परंपरा जपण्याचे शिवधनुष्य आजच्या युवा-पिढीवर आहे. ही परंपरा जपण्याचे सामर्थ्य युवा पिढीत आहे काय? या प्रश्‍नाचे उत्तर येणारा काळच आपल्याला देणार आहे.