दवर्लीतील रेल्वे दुपदरीकरणाचे काम स्थानिकांनी बंद पाडले

0
225

दवर्ली येथील रेल्वे फाटकाजवळील काम काल मंगळवारी स्थानिकांनी बंद पाडले. यावेळी नावेलीचे आमदार लुईझिन फालेरो हे स्थानिकांसमवेत उपस्थित होते. आमदार फालेरो यांनी यावेळी उपस्थित रेल्वे अधिकारी व उपजिल्हाधिकारी ज्योती कुमारी यांच्याशी चर्चा करून हे काम बंद पाडले. यापूर्वी स्थानिकांनी नेसाय येथे सुरू असलेले काम बंद पाडले होते.

दवर्ली येथे दुपदरीकरणासाठी रेल्वेने येथील जमीन संपादन केली नसल्याचे दिसून आले. उपजिल्हाधिकारी ज्योती कुमारी यांच्याशी फालेरो यांनी चर्चा केल्यानंतर रेल्वेने येथील जमीन संपादित केली नसल्याचे समजले.

येथील स्थानिकांचा रेल्वे दुपदरीकरणास विरोध असून या भागात आदिवासी जमातीचे लोक शेती व भाजी पिकवून आपला उदरनिर्वाह चालवतात. कोळसा वाहतुकीने प्रदूषण होऊन शेती नष्ट होईल. याबाबत आपण गोव्याच्या राज्यपालांना दोन दिवसांआधी पत्र लिहून गोव्यातील हे विघातक प्रकल्प रद्द करण्याची मागणी केल्याचे फालेरो यांनी सांगितले.

प्रकल्पाचे महत्त्व समजून
विरोध मागे घ्या ः श्रीपाद

गोव्यात होऊ घातलेले प्रकल्प जनतेला खरेच त्रासदायक आहेत असे वाटत असेल तर नागरिकांनी विरोध जरूर करावा. पण आंदोलकांनी या प्रकल्पाविषयी महत्त्व समजून घेत आपले आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी वास्कोत केले.
मंत्री श्री. नाईक हे वास्कोत आले असता त्यांना गोव्यातील होत असलेल्या प्रकल्पांविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. ते म्हणाले की, गोव्याच्या विकासासाठी हे प्रकल्प पूरक आहेत. या प्रकल्पाविरोधात जे आंदोलक आंदोलन करत आहे त्यां आंदोलकांना या प्रकल्पाची पार्श्वभूमी समजत नाही. सरकारने यसमोरासमोर बसून त्यांची योग्य प्रकारे समजूत काढून विषयास पूर्णविराम देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.