दयानंद नुसते नाव नाही..

0
35

… सिंधुसागराने आपले काळीज दिले आहे या माणसाला
खवळेल, उसळेल, पण सीमा सोडणार नाही…
… माडांच्या झाडांनी उंची दिली आहे याच्या मनाला
मेघाने मस्तक टेकावे अशी…
… दयानंद नुसते नाव नाही, तो स्वभाव आहे याचा
हा सहज विसावेल त्या आसनालाच
शासन समजतो अवघा गोमंतक… –ग. दि. माडगुळकर


गोव्याचे भाग्यविधाते दयानंद ऊर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांची आज 50 वी पुण्यतिथी. खरे तर 12 मार्च आणि 12 ऑगस्टची गोमंतकाला कधी आठवण करून द्यावी लागत नाही. दशके उलटली असली तरी आपल्या या लाडक्या भाऊंची दिलदारी, कर्तबगारी आणि द्रष्टेपण यांची आठवण अवघा गोमंतक काढत असतोच. खऱ्या अर्थाने गोव्याचा ‘लोकनेता’ म्हणावे असे हे व्यक्तिमत्त्व. वास्तविक, मुक्त गोमंतकाचे सत्ताशकट त्यांना जेमतेम दहा वर्षे हाकता आले, परंतु या दहा वर्षांमध्ये पुढच्या शंभर वर्षांच्या विकासाचा आणि प्रगतीचा भक्कम पाया ज्या प्रकारे भाऊसाहेबांनी अष्टांगांनी रचला, त्या द्रष्टेपणातच या लोकोत्तर व्यक्तिमत्त्वाचे मोठेपण आणि महानता सामावलेली आहे. राजकारण्याला सरसकट ‘नेता’ म्हटले जाते खरे, परंतु प्रत्येक राजकारणी हा क्वचितच ‘नेता’ असतो. ज्याला सर्वांना आपल्यासोबत नेता येते तो खरा नेता असे म्हणतात. भाऊ हे खरेखुरे लोकनेते होते. त्यांना गोव्याचे ‘भाग्यविधाते’ म्हटले जाते ते नुसते नामाभिधान नाही. मुक्त गोमंतकाची भाग्यरेषा ह्या द्रष्ट्या नेतृत्वाने आखली आणि अवघे दोन मंत्री आणि एका राज्यमंत्र्याच्या आपल्या सरकारद्वारे भावी वाटचालीसाठी मार्गही रेखून दिला. रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, संस्कृती, आरोग्य, उद्योग, पर्यटन, शेती बागायती, पशुसंवर्धन, दुग्धोत्पादन, जलसिंचन, सहकार.. गोव्यात असे एकही क्षेत्र नाही, ज्यावर भाऊसाहेबांच्या द्रष्टेपणाची नाममुद्रा उमटलेली नाही. या प्रत्येक क्षेत्रामध्ये पायाभूत स्वरूपाचे काम त्यांच्या कार्यकाळात झाले.
गोवा पारतंत्र्यातून भले मुक्त झालेला होता, परंतु सरंजामशाहीतून त्याची सुटका झालेली नव्हती. बहुजन समाज अज्ञान, निरक्षरता आणि शोषणाच्या पाशांत अडकलेला होता. त्याला त्यातच जखडून ठेवण्यासाठी वर्चस्ववादी शक्ती प्रयत्नशील होत्या, परंतु त्याला त्या सर्व पाशांतून मुक्त करून ताठ कण्याने, स्वाभिमानाने उभे राहण्याची ताकद आणि सरंजामशाही व्यवस्थेचे जोखड फेकून देण्याची हिंमत जर कोणी दिली असेल, तर ती भाऊसाहेबांच्या नेतृत्वाने आणि त्यांच्या सरकारने दिली. गोव्याच्या खेड्यापाड्यांमध्ये अक्षरशः शेकडो मराठी प्राथमिक शाळांद्वारे शिक्षणाची गंगा पोहोचवून त्यांनी दीनदुबळ्यांचे उत्थान घडविले. त्यांच्या आशा आकांक्षांना पालवी फुटू दिली. त्यांच्या स्वप्नांना कर्तृत्वाचे पंख दिले. भाऊ नसते तर हा समाज अज्ञान, गरीबी आणि लाचारीतच अडकून राहिला असता. कूळ कायदा असो, जमीन सुधारणा असो, शैक्षणिक क्रांती असो, हे सगळे त्यांच्याच कार्यकाळात घडले. प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आणि कुटिर रुग्णालयांचे जाळे गोव्यात उभे राहिले ते त्यांच्याचमुळे. गोव्याच्या पायाभूत प्रकल्पांची संकल्पना त्यांच्याच कार्यकाळात रचली गेली. जुवारी खत कारखाना, एमआरएफचा टायर कारखाना, सीबा गायगीचा औषधनिर्मितीचा प्रकल्प अशा बड्या प्रकल्पांतून त्यांनी गोमंतकीयांना रोजगाराच्या जशा व्यापक संधी उपलब्ध करून दिल्या, तशी मोठी गुंतवणूक आजही होताना दिसत नाही. गोव्यात पहिले पंचतारांकित हॉटेल त्यांनीच आणायला लावले. उद्योगाला चालना देताना शेती मागे राहू नये यासाठीही व्यापक प्रयत्न केले. जलसिंचनाची गरज ओळखून तिळारी आणि साळावलीसारख्या मोठ्या धरणप्रकल्पांची आणि छोट्या पाटबंधाऱ्यांच्या जाळ्याची मुहूर्तमेढ त्यांच्याच काळात रोवली गेली. सहकार क्षेत्राला ‘संजीवनी’ देण्याचा प्रयत्न केला. शेतकरी सोसायट्या उभ्या केल्या. महाराष्ट्र सरकारकडे रखडलेल्या कला अकादमीच्या प्रकल्पाविषयी विमान प्रवासात ऐकू येताच तो गोव्यात भव्य दिव्य स्वरूपात साकार करून दाखवला. चौफेर कार्य करायला तशी दृष्टी लागते. अस्मानउंची गाठतानाही तळागाळाशी त्यांची नाळ घट्ट जोडलेली होती. नावाप्रमाणेच दयाळू अंतःकरण लाभलेल्या या कर्णाने किती दान, गुप्तदान केले याची तर गणतीच नाही. म्हार्दोळच्या जायाजुया विकणाऱ्या मुलांसाठी बिस्किटांचे पुडे घेऊन जाणारा, गुराख्यांच्या आग्रहाखातर गोपाळ गणपतीचे मंदिर बांधून देणारा, आपली सगळी संपत्ती म्हाळशेची म्हणणारा आणि मुख्यमंत्री असूनही स्वतःची गाडी, स्वतःचा बंगला आणि एक रुपया मानधन घेणारा असा लोकनेता पुन्हा होणे नाही!