‘दयानंद’च्या लाभार्थ्यांना लवकरच मिळणार मानधन

0
16

>> समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांची माहिती

राज्य सरकारच्या समाज कल्याण खात्याच्या दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना दोन महिन्यांचे मानधन लवकरच वितरित केले जाणार आहे, अशी माहिती समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी काल दिली.

समाज कल्याण खात्याच्या दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या (डीएसएसवाय) १ लाख ४० हजार लाभार्थ्यांना मागील चार महिन्यांचे मानधन देण्यात आलेले नाही, असे गोवा दिव्यांग संघटनेने राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर बोलताना समाजकल्याण मंत्री फळदेसाई यांनी सांगितले की, डीएसएसवाय योजनेच्या लाभार्थ्यांचे चार महिन्यांचे मानधन प्रलंबित आहे. विधानसभा निवडणूक व इतर कारणामुळे मानधन वितरित होण्यास विलंब झाला आहे.

डीएसएसवाय योजनेच्या लाभार्थ्यांच्या मानधनासाठी महिना २७ कोटी रुपयांची गरज असून, या योजनेखाली सुमारे ५४ कोटी रुपयांचे वितरण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात डीएसएसवायच्या लाभार्थ्यांना दोन महिन्यांचे मानधन दिले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

सांगेत आयआयटी प्रकल्पाचे स्वागत : फळदेसाई
सांगे मतदारसंघात आयआयटी प्रकल्पाचे स्वागत केले जाणार आहे. सांगे येथील सरकार तुमच्या दारी या उपक्रमात स्थानिक नागरिकांनी सांगे तालुक्यात आयआयटी प्रकल्प सुरू करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगे तालुक्यात आयआयटी प्रकल्पाला प्राधान्य देण्याचे आश्‍वासन दिले आहे. आयआयटी प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो, असे सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.