दबंगगिरीला धडा

0
437

चंदेरी पडद्याप्रमाणेच प्रत्यक्ष जीवनातही दबंगगिरी करीत आलेला अभिनेता सलमान खान याला काल काळवीट हत्याप्रकरणी जोधपूरच्या न्यायालयाने पाच वर्षांच्या तुरुंगवासाची सजा सुनावली. मात्र, आज सत्र न्यायालयात त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आज तो जामीनमुक्त होण्याची शक्यता आहे. सलमानविरुद्धच्या आजवरच्या सर्व प्रकरणांत शेवटी तो निर्दोष मुक्त होत आला आहे. मुंबईत ‘हिट अँड रन’ प्रकरणात एकाच्या मृत्यूस आणि चौघांना जायबंदी होण्यास कारणीभूत ठरूनही त्या प्रकरणातून तो शेवटी सहीसलामत सुटला. चिंकारा हत्येच्या तीन प्रकरणांत सत्र न्यायालयांनी त्याला दोषी ठरवून कारावासाची शिक्षा दिली, परंतु तेव्हाही उच्च न्यायालयात तो शेवटी निर्दोष सुटला. त्यामुळे काळवीट हत्येच्या या त्याच्याविरुद्धच्या शेवटच्या प्रकरणाची इतिश्रीही अशीच तर होणार नाही ना? काळवीट हत्येचे हे प्रकरण आहे १९९८ सालचे. म्हणजे गेली वीस वर्षे हा खटला चालला आहे. या वीस वर्षांत या गुन्ह्याबद्दल सलमानला पोलीस ‘पकडू’ शकले नाहीत. एखाद्या सर्वसामान्य गुन्हेगाराला जो न्याय लावला जातो तो अशा सेलिब्रिटींना लावला जात नाही असा समज त्यामुळे सामान्यजनांमध्ये दृढ झाला तर त्यांची काय चूक आहे? या खटल्यात सलमानला शिक्षा सुनावताना तो एक चित्रपट अभिनेता आहे आणि त्याच्यासारख्या व्यक्तीला समाज आदर्श म्हणून पाहत असतो. त्यामुळे त्याच्याकडून योग्य वर्तनाची अपेक्षा आहे अशी टिप्पणी न्यायाधीशांनी केली आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र अशा सेलिब्रिटी असण्याचा फायदाच अशा व्यक्तींना मिळताना दिसतो. वांद्य्राच्या त्या प्रसिद्ध ‘हिट अँड रन’ खटल्यामध्ये कसकसा खेळ चालला हे जनतेने पाहिले. शेवटी ना सलमानने दारू पिऊन गाडी चालवली, ना त्याच्या चालकाने, त्यामुळे त्याची लँडक्रूझरच दारु प्यायली आणि तिने रस्त्याकडेला झोपलेल्यांना चिरडले की काय असा प्रश्न तेव्हा जनतेला पडला होता. त्या प्रकरणात सत्र न्यायालयाने ज्याच्या साक्षीवरून सलमानला दोषी धरले होते तो पोलीस अंगरक्षक गूढरीत्या मृत्यू पावला, सलमानने मद्यप्राशन केल्याची चाचणी घेणार्‍या इस्पितळातील वॉर्डबॉयच दारू प्यायल्याचे ‘सिद्ध’ झाले, त्याचा चालक तेरा वर्षांनी आपणच गाडी चालवत होतो असे सांगायला हजर झाला. असे अनेक चमत्कार त्या खटल्यात घडले होते. या काळवीट प्रकरणात राजस्थानच्या पर्यावरणस्नेही बिश्‍नोई पंथाचे लोक साक्षीदार आहेत म्हणून हा खटला अजून तग धरून आहे. हे बिश्‍नोई निसर्ग आणि वन्यप्राण्यांचे खरेखुरे रक्षक आहेत. १४८२ साली बिकानेरच्या जंभेश्वर भगवान यांनी आपल्या अनुयायांना हा अनोखा मंत्र दिला. हे बिश्‍नोई जात – पात मानत नाहीत. त्यामुळे हिंदू आणि मुसलमानही या पंथाचे अनुयायी आहेत. जंभेश्वर भगवाननी त्यांना ज्या तत्त्वांचे अनुकरण करायला सांगितले ती बीस आणि नौ म्हणून हे बिश्‍नोई म्हणवतात. हरणाच्या पाडसांना आपलेच मूल मानून स्तनपान करणार्‍या माता या समाजात आहेत. याच पंथाच्या अमृतादेवीने खेजाडली गावी झाडे वाचवण्यासाठी आपल्या तीनशे साथीदारांसह प्राणत्याग केला होता. वन्य जीव आणि निसर्गसंपदेच्या रक्षणाचा असा जाज्वल्य वारसा असलेले हे बिश्‍नोई पैशाच्या आमिषांना पुरून उरले आहेत. आजच्या समाजात पैशासाठी काहीही करायची आणि कोणत्याही थराला जायची तयारी असलेली नीरव मोदीसारखी माणसे असताना आर्थिक आमिषांना बळी न पडता आणि सारे दबाव झिडकारून आपल्या म्हणण्याला वीस वीस वर्षे चिकटून राहणे हे सोपे नाही. सलमान खानची चित्रपट कारकीर्द तीस वर्षांची आहे आणि आजही तो चंदेरी दुनियेतील रेस का घोडा आहे. आजच्या घडीस त्याच्यावर जवळजवळ सातशे कोटींचा जुगार निर्माते खेळले आहेत. ‘दबंग ३’, ‘किक २’, ‘भारत’ असे त्याचे शंभर शंभर कोटींचे चित्रपट येऊ घातलेले आहेत. त्यामुळे या खटल्याकडे किती निर्मात्यांचे डोळे लागले असतील यावरून बिश्‍नोईंवरील दबावाची कल्पना येऊ शकते. प्रश्न सलमान प्रत्यक्षात किती सजा भोगणार हा आता उरलेलाच नाही. त्याला जन्माची अद्दल या खटल्याने घडवलेली आहे. पैशाच्या जोरावर पर्यावरणाची आणि वन्य जीवांची वाट्टेल तशी कत्तल करण्याच्या मुजोर वृत्तीला खरे तर हा एक फार मोठा धडा आहे. वन्य जीव संरक्षण कायदा आपल्याकडे अस्तित्वात येऊन पाच दशके उलटली. हा कायदा नुसता कायद्याच्या पुस्तकांतच उरला आहे. निसर्ग आणि पर्यावरणाची बेसुमार हानी चौफेर सुरू आहे. अशा वेळी स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी वन्य जीवांची निर्दयी हत्या करणार्‍या एका दबंग अभिनेत्याला आणि त्याच्या मनमौजी साथीदारांना या देशात कायद्याचे राज्य आहे हा धडा मिळण्याची गरज होती. आता एवढ्या वर्षांनंतर सुटका झाली काय, न झाली काय, परंतु आपण केलेला अपराध मोठा होता आणि असा अपराध कोणाच्या हातून घडता कामा नये ही जरब किमान या निवाड्याने या मंडळींना आणि त्यांना आदर्श मानणार्‍या मंडळींना बसेल अशी आशा आहे.