दक्षिण गोव्यात सनबर्न महोत्सवाला आमदारांचा विरोध

0
9

>> विरोधी पक्षनेते युरी आलेमाव महोत्सवाच्या विरोधात

>> विजय सरदेसाईंसह अनेक आमदारांची हरकत

वादग्रस्त ठरलेला सनबर्न संगीत महोत्सव दक्षिण गोव्यात नको अशा प्रतिक्रिया काल दक्षिण गोव्यातील काही आमदारांनी दै. नवप्रभाशी बोलताना व्यक्त केल्या. या संगीत महोत्सवात अमली पदार्थांचा वापर केला जात असल्याचे दिसून आलेले असून या महोत्सवाला दक्षिण गोव्यातच नव्हे तर उत्तर गोव्यातही परवानगी दिली जाऊ नये, असे या आमदारांचे म्हणणे आहे.

यासंबंधी बोलताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव हे म्हणाले की, यापूर्वी सनबर्न संगीत महोत्सवात अमली पदार्थांच्या ओव्हर डोसमुळे मृत्यूही झालेले आहेत. जगभरात सनबर्न महोत्सवाची मोठी जाहीरात केली जात आहे. ड्रग्ज घेऊन संगीताच्या तालावर नृत्य करण्यासाठीचा महोत्सव अशी या सनबर्न फेस्टिव्हलची प्रतिमा असल्याचे आलेमाव म्हणाले. या महोत्सवामुळे दक्षिण गोव्यातील युवावर्ग अमली पदार्थांकडे वळण्याची भीती असल्याचे आलेमाव म्हणाले. दक्षिण गोव्यातच नव्हे तर उत्तर गोव्यातही हा संगीत महोत्सव करण्यास गोवा सरकारने आयोजकांना परवानगी देऊ नये, असे मत आलेमाव यांनी व्यक्त केले. अमली पदार्थांसाठीची राजधानी अशी गोव्याची ओळख निर्माण झाल्याने राज्याची प्रतिमा काळवंडली असल्याचे ते म्हणाले.

कडाडून विरोध करणार : विजय
गोवा फॉरवर्ड पार्टीचे नेते व फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनीही सनबर्न फेस्टिव्हलला आपला तीव्र विरोध असून दक्षिण गोव्यात हे फेस्टिव्हल नको असे मत व्यक्त केले. सनबर्न यंदा दक्षिण गोव्यात होणार असल्याचे बोलले जात असले तरी तो उत्तर गोव्यातील मोपा येथे होण्याची शक्यता सरदेसाई यांनी व्यक्त केली. मात्र, दक्षिण गोव्यात सनबर्नचे आयोजन करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला तीव्र विरोध करण्यात येणार असल्याचे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.
एकदा जर हा महोत्सव गोव्यात दक्षिण गोव्यात सुरू झाला तर परंपरा असल्याप्रमाणे तो दरवर्षी येथे आयोजित केला जाईल व दक्षिण गोव्यातील लोकांच्या डोक्यावर बसेल, अशी भीती सरदेसाई यांनी व्यक्त केली. उत्तर गोव्यातील लोकांनी विरोध न केल्यामुळेच गेली कित्येक वर्षे सनबर्न तेथे आयोजित केला जात असल्याचे सरदेसाई म्हणाले. उत्तरेतील व दक्षिण गोव्यातील लोकांमध्ये फरक असून दक्षिण गोव्यातील जनता दक्षिणेत सनबर्न होऊ देणार नसल्याचा विश्वास सरदेसाई यांनी व्यक्त केला. उत्तर गोव्यातील लोकांमध्ये अतिसहनशीलता असून वाईट गोष्टींना विरोध करण्याची धमकही त्यांच्यामध्ये नसल्याचे सरदेसाई म्हणाले. दक्षिण गोव्यात या महोत्सवाला मोठा विरोध होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

सनबर्न नकोच : एल्टन
काँग्रेस पक्षाचे केपे मतदारसंघाचे आमदार एल्टन डिकॉस्ता हे सनबर्नविषयी बोलताना म्हणाले की, सनबर्नचे दक्षिण गोव्यात आयोजन करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला 100 टक्के विरोध होणार आहे. दक्षिण गोव्यातील लोकांना दक्षिणेत सनबर्न नको असून आम्हा लोकप्रतिनिधींचाही सनबर्न दक्षिण गोव्यात आणण्यास विरोध असल्याचे डिकॉस्ता म्हणाले. आमचा दक्षिण गोवा हा शांत असून अमली पदार्थांचे सेवन करून संगीताच्या तालावर नाचणाऱ्या लोकांचा हा महोत्सव आम्हांला येथे नको, असे डिकॉस्ता म्हणाले.

कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वाझ यांनीही दक्षिण गोव्यात सनबर्नचे आयोजन करण्यास आपला विरोध असल्याचे सांगितले. दक्षिणेच्या लोकांना सनबर्न नको असून आम्ही या प्रश्नी लोकांबरोबर आहोत असे त्यांनी स्पष्ट केले.

दक्षिणेत सनबर्न झाल्यास ती परंपरा होईल : विजय
एकदा जर हा महोत्सव गोव्यात दक्षिण गोव्यात सुरू झाला तर परंपरा असल्याप्रमाणे तो दरवर्षी येथे आयोजित केला जाईल व दक्षिण गोव्यातील लोकांच्या डोक्यावर बसेल, अशी भीती सरदेसाई यांनी व्यक्त केली. उत्तर गोव्यातील लोकांनी विरोध न केल्यामुळेच गेली कित्येक वर्षे सनबर्न तेथे आयोजित केला जात असल्याचे सरदेसाई म्हणाले.

दक्षिण गोव्यात ‘सनबर्न’ नकोच

वेळसाव ग्रामसभेत सर्वांनुमते ठराव संमत

दक्षिण गोव्यात ‘सनबर्न’ महोत्सवाचे आयोजन करण्यास राजकीय, सामाजिक संघटनांनी विरोध दर्शविला असून आता दक्षिण गोव्यातील मुरगाव तालुक्यातील कुठ्ठाळी मतदारसंघातील वेळसाव पंचायतीच्या ग्रामसभेत तीव्र विरोध केला आहे. ‘सनबर्न’ सारख्या अमली पदार्थांना उत्तेजन देणाऱ्या महोत्सवाला विरोध करीत असल्याचा ठराव वेळसाव पंचायतीच्या ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच राज्य सरकारने देवनागरी लिपी बरोबर रोमन लिपीला सुद्धा राज भाषेचा दर्जा द्यावा, असा ठराव मंजूर करण्यात आला.

कुठ्ठाळी भागातील वेळसाव पंचायतीच्या काल रविवारी झालेल्या ग्रामसभेत विविध ठरावांना मान्यता देण्यात आली. वेळसाव पंचायतीच्या सरपंच डायना गोविया यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या ग्रामसभेत दक्षिण गोव्यात अमली पदार्थांना उत्तेजन देणाऱ्या ‘सनबर्न’ संगीत महोत्सवाला तीव्र विरोध करण्यात आला. अमली पदार्थांना प्रोत्साहन देणाऱ्या या संगीत महोत्सवाला वेळसाव पंचायत सदैव विरोध करत राहणार असल्याचे सरपंच डायना गोविया यांनी ग्रामसभेत ग्रामस्थांच्या उपस्थितीत सांगितले.

दक्षिण गोव्यातील जनता शांततेने जीवन जगत असून ‘सनबर्न’ संगीत महोत्सव येथे आणून येथील शांतता भंग करू नये असे गोयचो एकवट संघटनेचे ओलविर दोरादो यांनी सांगितले. तसेच पंच जीम डिसोझा, सामाजिक कार्यकर्ते रोकोझीन डिसोझा यांनी ग्रामसभेत सनबर्न महोत्सवाला तीव्र विरोध दर्शविला. तसेच राज्य सरकारने मराठी देवनागरी लिपी बरोबर कोकणी रोमन लिपीला सुद्धा समान दर्जा द्यावा, असा ठराव ग्रामसभेत संमत करण्यात आला.

ग्रामसेवक निलंबित
दरम्यान, साकवाळ पंचायतीचे ग्रामसेवक म्हणून निवड करून सचिवपदी नियुक्त केलेले ऑर्विल क्लिंटन वालीस यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबित सचिव ऑर्विल वालीस यांच्यावर जुआरी नगर बिर्ला येथील सायक्लोन शेल्टरच्या व्यवस्थापनात निष्काळजीपणा, गैरवर्तन आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करण्यात अपयशी ठरल्याने सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. या सचिवा विरोधात भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी साकवाळचे सामाजिक कार्यकर्ते नारायण नाईक यांनी पंचायत संचालक, मुख्यमंत्री कार्यालय व पंतप्रधान कार्यालयात केल्या होत्या. साकवाळ पंचायतीत जमीन घोटाळ्यात व इतर विविध प्रकरणात गुंतलेले ग्रामसेवक ऑर्विल वालीस यांची चौकशी करण्यासाठी नारायण नाईक यांनी अनेक संबंधित विभागात तक्रारी दाखल केल्या होत्या. अखेर त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.