दक्षिण गोव्यातील उमेदवार दुसऱ्या किंवा तिसऱ्या यादीत जाहीर होणार

0
8

>> भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांची माहिती

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघासाठी संभाव्य महिला उमेदवारांची नावे लवकरच निश्चित करून भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठविली जाणार आहेत. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या बैठकीत दक्षिण गोवा मतदारसंघाचे उमेदवाराचे नाव निश्चित केले जाणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी काल दिली.

दक्षिण गोवा मतदारसंघासाठी तीन पुरुष उमेदवारांची नावे कायम आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने काही महिला संभाव्य उमेदवारांची नावे पाठविण्याची सूचना केली आहे. केंद्र सरकारने महिलांना 33 टक्के राखीवता देणारे विधेयक संमत केले आहे; मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी महिला राखीवता जाहीर होणार नाही, तरीही भाजपने निवडणुकीत महिलांना प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय समितीकडून दक्षिण गोवा मतदारसंघाच्या उमेदवाराची निवड केली जाणार आहे. भाजपने कोणत्याही संभाव्य महिला उमेदवारांची नावे निश्चित केलेली नाहीत. शेफाली वैद्य यांच्या नावाची भाजपच्या स्थानिक पातळीवर बैठकीत चर्चा झालेली नाही, असेही तानावडे यांनी सांगितले.