दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ खासगी करण्याचा भाजपचा डाव

0
6

>> कॅ. विरियातो फर्नांडिस यांचा आरोप

भाजप सरकार सार्वजनिक आरोग्य सेवा क्षेत्राचे खासगीकरण करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ सरकारकडेच राहील. तेथे आयसीयू, कॅथ लॅब, न्यूरो सर्जरी विभाग त्वरित सुरू होईल असे आश्वासन दक्षिण गोव्याचे लोकसभा उमेदवार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी दिले आहे.

खासगी वैद्यकीय महाविद्यालय स्थापून दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे खासगीकरण करण्याच्या आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केलेल्या वक्तव्यावर कॅ. विरियातो यांनी वरील प्रतिक्रिया दिली. आरोग्य मंत्र्यांचे वक्तव्य म्हणजे येणाऱ्या काळात भाजप गरीब लोकांकडून मोफत आरोग्य सेवा हिसकावून घेणार असल्याचे स्पष्ट होत असल्याची टीका त्यांनी केली.
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचा प्रकल्प लोकांना परवडणारी आरोग्य सेवा देण्यासाठी काँग्रेसने सुरू केला होता. 2012 मध्ये सदर इस्पितळाचे बांधकाम जवळपास 70 टक्के पूर्ण झाले होते. परंतु उर्वरित 30 टक्के काम पूर्ण करण्यासाठी भाजप सरकारला 8 वर्षे लागली, असा दावा कॅ. विरियातो यांनी केला.

सध्या दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्ण व कुटुंबीयांना त्रास सहन करावे लागत आहेत. हे रुग्णालय एक रेफरल इस्पितळ बनले आहे. तेथे येणाऱ्या रुग्णांना गोमेकॉ किंवा खासगी रुग्णालयात पाठवले जाते, असे कॅ. विरियातो म्हणाले.

सरकार कार्यक्रमांच्या आयोजनावर करोडो रुपये खर्च करत असताना सरकारला अत्यंत आवश्यक असलेले आयसीयू, कॅथ लॅब व न्यूरो सर्जरी विभाग का सुरू करता आले नाहीत, याचे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी द्यावे. भाजप सरकारने गेल्या 11 वर्षांत गोव्यातील विविध कार्यक्रमांवर जवळपास 1000 कोटी रुपये खर्च केले आहेत, असा आरोप कॅ. विरियातो यांनी केला.