थोडं मुक्त.. थोडं बद्ध..

0
396
  • सौ. माधुरी रं. शे. उसगावकर
    (फोंडा)

स्त्रीने खरं तर स्त्रीच असावं. तिने पुरुषाप्रमाणे वागूच नये. जुन्या चालीरीती झुगारून देऊ नये. जुने कालबाह्य न करता दूरदृष्टिकोनाने नावीन्याचा स्वीकार करावा. ‘थोडं मुक्त.. थोडं बद्ध..’ अशा परिघात राहावं. शेवटी मायेची माणसं, आपले नातेवाईक हीच जीवनातील सर्वांत मोठी संपत्ती आहे.

‘‘अगं, ती शेजारची मृदुला आहे ना, तिला तिच्या नवर्‍यानं टाकली!’’
‘‘अगंबाई! का गं?’’
‘‘काय तर म्हणे, ती आपल्या मित्रमैत्रिणींसोबत पिकनिकला गेली हे कळताच रागाच्या भरात नवर्‍याने तिला फरफटत ओढून घराबाहेर काढली.’’
मॉर्निंग वॉकला गेले असता हा संवाद माझ्या कानी पडला आणि हृदयाचा थरकाप उडाला.
क्षुल्लक कारणावरून टोकाची भूमिका घेऊन एका स्त्रीचे जीवन बेचिराख करणे म्हणजे मानवतेला काळिमा फासणे, होय ना? हाच का पुरुषार्थ? आज स्त्री सुरक्षित आहे का?..हा आंतरिक वेध घेणारा यक्षप्रश्‍न अंतरी उपजतो.
शास्त्रज्ञांचे नवनवे बौद्धिक शोध, सामाजिक, वैज्ञानिक प्रगती यशोशिखरे काबीज करीत आहे, हे आपण वाचतो, अनुभवतो. या तांत्रिक युगात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला वावरत आहे. तिने नाना परीने आपल्या कार्यप्रणालीतून यशस्वी भूमिकेचे आव्हान पेलले आहे. पेलते आहे. आजही विदारक प्रसंग स्त्रीच्या बाबतीत घडतात याचाच अर्थ पुरुषाला तिचे स्वतंत्र अस्तित्व मान्य नाही. स्वतंत्र विचारप्रणालीसाठी तिला एकतर कौटुंबिक पाश तोडावे लागतात अन्यथा पारंपरिक चालीरीतींच्या विळख्यात गुरफटावं लागतं.

जाहीररीत्या महिलामंडळं भरवली जातात. महिला दिन साजरा केला जातो. स्त्रीच्या कर्तृत्वावर आवेशाने भाषणबाजी होते. स्त्रीचा मानसन्मान चारचौघांत कार्यक्रमापुरता. प्रत्यक्षात तिचे जीवन अजूनही पारंपरिक बंधनांच्या विळख्यात जखडलेले दिसून येते. बंधनांच्या शृंखलांतच तिचा जीवनप्रवास टप्प्याटप्प्याने होत जातो. यात तिचे यश का अपयश हे कुटुंब किंवा समाज ठरवतो. तिला स्वयंनिर्णय असतो याचं सोयर सुतक समाज पाळत नाही, या विचाराने मन आक्रसतं.
एके ठिकाणी स्त्रीचा सजग, सबला म्हणून उदो उदो केला जातो आणि व्यक्तिशः तिच्या भावनांची कदर न करता तिची अवहेलना होते. यात कसला आलाय शहाणपणा?
पारंपरिक चालीरीतींचे जोखड तिच्या मानेवर ठेवून स्वतः पुरुष नामानिराळा होतो. अशा दुटप्पी वागण्यात विविध भूमिका सांभाळताना तिच्या आयुष्याची घुसमट होते. पुरुषाला मात्र बंधनमुक्त जगण्याचे स्वातंत्र्य आहे. स्त्री आणि पुरुषाच्या छंदोपासनेकडे सारख्याच निखळ दृष्टिकोनातून बघितलं जात नाही. स्त्रीच्या बाबतीतच झुकतं माप का? हे सलतं.
स्त्रीची संस्कृती आहे. स्त्री आपली वेगळी ओळख निर्माण करू शकते, नव्हे तिच्यात ती क्षमता आहे. मन, हृदय यांची हृदयंगम अनुभूती घ्यायची असेल तर स्त्रीमनातच जावं लागेल. कधी स्त्रीच्याही प्रतिभेला धुमारे फुटतात. कोर्‍या कागदाची हाक तिच्या अंतर्मनाला साद घालते. आजही पांढरपेशा स्त्री साहित्यनिर्मितीकडे वळली की तिच्या नशिबी उपेक्षा, अवहेलना येते. हे फक्त साहित्यक्षेत्रापुरतेच सीमित नाही तर संगीत, वक्तृत्व, नाट्यक्षेत्र अशा विविध क्षेत्रातील स्त्रियांच्या अंतरंगावर आक्षेप घेतला जातो.

स्त्रीलाही तिच्या आवडी-निवडी असतात. तिलाही मित्र-मैत्रिणी असतात. कधीतरी त्यांना भेटावे, मनसोक्त गप्पा-गोष्टी कराव्यात, गतस्मृतींना उजाळा द्यावा असं तिलाही वाटतं. स्वतःसाठी कधीतरी ती जगण्याचा प्रयत्न करते; पण म्हणून काही ती स्वैराचारी होते? पुरुषाला स्त्री समजून घेते त्याचप्रमाणे स्त्रीलाही पुरुषाने समजून घ्यावे, असे तिला वाटणे साहजिकच आहे. स्वकीयांच्या कौतुकाचा एक शब्द दहा हत्तींचे बळ तिला देऊन जातो.

आजही जनमानसात स्त्रीची उडी कुंपणापर्यंत असावी असाच बहुधा मानस दिसून येतो. जरा कुठे संस्कारांच्या भिंती ओलांडल्या की घरच्यांची सुरूच झाली म्हणावी प्रश्‍नांची सरबत्ती. ‘घराण्याच्या इभ्रतीला धोका देणारी’ असा ताशेरा मारण्यासही ते मागे-पुढे पाहत नाहीत. तिने़ कुटुंबीयांची आवड-निवड जपली तरच तिला वाखाणले जाते. तिच्या वेगळ्या विश्‍वाची तमा त्यांना नसते. हे धारिष्ट्य तडफदार स्त्रीच करू शकते. आयुष्याच्या पुढील वाटचालीत काटेकुटे असतील याची तिला कल्पना असते. त्यातूनही काटेरी मार्ग पत्करून आपले चौकटीबाहेरचे लक्ष्य साधण्यासाठी पराकोटीची मेहनत घेते. कित्येक प्रासंगिक वादळ-वार्‍यात मानसिक तोल सांभाळून संतुलित राहण्याचा प्रयत्न करते. हे फक्त स्त्रीलाच शक्य आहे. स्त्रियांचं जग हे त्यांच्या जगण्याशी निगडित असतं.

अष्टभुजेप्रमाणे कुटुंबीयांना सांभाळून घेण्याची क्षमता तिच्या अंगी असूनही तिला तिचे वेगळे स्वातंत्र्य दुरापास्त होते. संवेदनशील, भावनेने ओथंबलेली स्त्री आपल्या स्वातंत्र्याचा विचार न करता कौटुंबिक हितासाठी सामाजिक बंधनांच्या वेटोळ्यात राहणे पसंत करते. स्त्रीची त्यागी वृत्ती स्त्रियांच्या स्वभावाचा परमोच्च बिंदू मानला जातो. अष्टभूजेचे नऊही अवतार धारण करणारी स्त्री ही परमेश्‍वराची अंतर्बाह्य सुंदर कलाकृती आहे. स्त्रीची कलाकृती वाखाणण्याआधी तिला अग्निदिव्य करावे लागते. टाकीचे घाव अंगाखांद्यावर सोसावे लागतात. नंतर कुठे तिच्या त्यागी वृत्तीची दखल घेतली जाते.

मुंबईच्या एका नावाजलेल्या लेखिकेचे आत्मकथन आठवले. कसलेल्या या साहित्यप्रेमी स्त्रीला पुस्तक व कोरा कागद याचे भयंकर आकर्षण होते. किंबहुना तेच तिचं विश्‍व होतं. कोर्‍या कागदावरची ललकार तिला ललकारत असे. अफाट वाचन व लेखनाच्या व्यासंगात तिच्याकडून दर्जेदार साहित्यनिर्मिती होत गेली. बाहेरून भरपूर मानसन्मान, पुरस्कार मिळाले. पुढे कालौघात आयुष्य उतरणीवर येऊन ठेपले. याची तिला चाहूल लागली. शारीरिक व्याधी डोकं वर काढू लागल्या. शारीरिक क्षमता क्षीण झाली. संधिवाताने अंग आक्रसलं.
आयुष्याच्या अखेरीस आलेला एकाकीपणा खायला उठला. जोपर्यंत ती कार्यक्षम होती तोपर्यंत तिचा गवगवा झाला. मग वाढत्या वयानुसार निरुपयोगी झाली आणि ह्याच तिचे कौतुक करणार्‍या मंडळींनी तिला अलविदा केला. आयुष्याच्या अखेरीस जेव्हा शरीर-मन खचते, तेव्हा स्वाभिमानातील हवा फुस्स होते. अंतःप्रेरणेच्या साद-प्रतिसादात लग्नाचा विचारही तिच्या मनाला शिवला नाही. संधिकालात एकटेपणा तिला खायला उठला. काळजी घेणारी मायाममतेची माणसं नाहीत. वास्तवाचा वेध घेता घेता ती मानसिकरीत्या कोसळली नि मग व्यसनांच्या विळख्यात आत्मशांती शोधू लागली. आयुष्यभर एकटे राहूनसुद्धा आयुष्याच्या उतरणीवर वाट्याला येणारे एकटेपणाचे दुःख दारुण असते.

स्त्रीने खरं तर स्त्रीच असावं. तिने पुरुषाप्रमाणे वागूच नये. स्त्रीची संस्कृती वेगळी, पुरुषाची वेगळी. पारंपरिक जुन्या संस्कारात बदल करून शहाणपणाने आपला मार्ग निवडावा. शाश्‍वत काय आणि अशाश्‍वत काय यातील मर्म ओळखावं. जुन्या चालीरीती झुगारून देऊ नये. जुने कालबाह्य न करता दूरदृष्टिकोनाने नावीन्याचा स्वीकार करावा. ‘थोडं मुक्त.. थोडं बद्ध..’ अशा परिघात राहावं. शेवटी मायेची माणसं, आपले नातेवाईक हीच जीवनातील सर्वांत मोठी संपत्ती आहे.