थिएटरमध्ये चित्रपट पाहणार्‍यांच्या संख्येत घट : करण जोहर

0
126

डिजिटलच्या वाढत्या प्रभावामुळे चित्रपटगृहात जाऊन सिनेमा पाहणार्‍या लोकांची संख्या हळुहळू घटू लागलेली आहे. लोकांना सिनेमागृहात पुन्हा आणण्यासाठी ‘बाहुबली’सारख्या भव्यदिव्य अशा चित्रपटांची निर्मिती करण्याचे आव्हान चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यांना स्वीकारावे लागणार असल्याचे बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध निर्माते व दिग्दर्शक करण जोहर यांनी काल ‘मास्टरिंग अ न्यू रिएलिटी, टॅक्नोलॉजी ऍण्ड इनोव्हेशन’ या विषयावरील मास्टर क्लासमधून बोलताना सांगितले.

चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणार्‍या लोकांची संख्या २० टक्क्यांनी घटली असल्याचे जोहर यांनी यावेळी सांगितले. ही धोक्याची घंटा असून भविष्यात हा आकडा वाढू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे कसे आकर्षित करता येईल याचा अभ्यास करावा लागणार असल्याचेही जोहर यांनी स्पष्ट केले. या घडीला टीव्हीबरोबर ऍमेझोन, नेटफिल्म आदींशी चित्रपटगृहांना स्पर्धा करावी लागत असल्याचे ते म्हणाले. २०१७ वर्ष बॉलिवूड चित्रपटांसाठी व्यवसायाच्या दृष्टीने फारच वाईट होते. मोजके चित्रपट सोडल्यास बहुतेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोसळल्याने चित्रपट उद्योगाचे कधी नव्हे एवढे नुकसान झाल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना सुधाशुु वट्‌स म्हणाले की सध्या चित्रपटांचा थिएटरसाठीचा काळ हा ६० दिवसांचा आहे. नंतर हेडलाईट, टीव्ही असा प्रवास सुरु होत असल्याचे ते म्हणाले. भारतात जास्तीत जास्त लोकांपर्यंत चित्रपट पोचायचा असला तर देशातील चित्रपटगृहांची संख्या वाढवावी लागणार असल्याचे ते म्हणाले. चीनमध्ये भारतापेक्षा चारपट जास्त चित्रपटगृहे असल्याचे ते म्हणाले.
भारतीय चित्रपट उद्योग तारण्यासाठी मोठ्या बजेटचे भव्यदिव्य चित्रपट बनवावे लागतील, असेही त्यांनी नमूद केले. ‘बाहुबली’ ही सुंदर हिरोची कथा सांगणार अथवा उत्तम दर्जाची कथा असलेले चित्रपटच आजच्या मार्केटच्या युगात टिकाव धरू शकणार असल्याचे ते म्हणाले. एकता कपूर यांनीही या स्पर्धेच्या युगात टिकायचे असल्यास असाधारण असे चित्रपट बनवावे लागतील, असे नमूद केले.