त्रिनबागो नाईट रायडर्स अंतिम फेरीत

0
573

त्रिनबागो नाईट रायडर्सने जमैका तलावाहज्‌चा उपांत्य फेरीत ९ गडी व ३० चेंडू राखून पराभव करत कॅरेबियन प्रीमियर लीग टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. तलावाहज्‌ने विजयासाठी ठेवलेले १०८ धावांचे माफक लक्ष्य त्रिनबागोने १५ षटकांत केवळ सुनील नारायण (४) याला गमावून गाठले.

धावांचा पाठलाग करताना लेंडल सिमन्स याने ४४ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह नाबाद ५४ धावा कुटल्या. टियोन वेबस्टरने ४३ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह नाबाद ४४ धावा करत दुसर्‍या गड्यासाठी ९७ धावांची अविभक्त भागीदारी रचली.

तत्पूर्वी, त्रिनबागोने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली. त्रिनबागो संघात सुनील नारायण, ड्वेन ब्राव्हो, खारी पिएर व लेंडल सिमन्स यांचे पुनरागमन झाले. जायबंदी असल्यामुळे कॉलिन मन्रो याला संघात जागा मिळाली नाही. तलावाहज्‌ने निकोलस किर्टोन व चॅटविक वॉल्टन यांना वगळून एनक्रुमा बोनर व आसिफ अली यांना संघात घेतले. अकिल हुसेन व खारी पिएर या दोन डावखुर्‍या गोलंदाजांसह त्रिनबागोने गोलंदाजीची सुरुवात केली. पहिल्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर हुसेनने ब्लॅकवूडचा त्रिफळा उडवला.

ब्लॅकवूडला भोपळादेखील फोडता आला नाही. पिएरचा अधिक उसळलेला चेंडू कट् करण्याच्या नादात फिलिप्स ‘पॉईंट’वर सोपा झेल देत बाद झाला. मुजीब रहमान याला तिसर्‍या स्थानावर फटकेबाजीसाठी पाठवण्याचा तलावाहज्‌चा प्रयत्न पुरता फसला. हुसेनच्या गोलंदाजीवर ‘रिव्हर्स स्वीप’ मारण्याच्या नादात तो बाद झाला. यावेळी तलावाहज्‌चा संघ ३ बाद १० असा चाचपडत होता. पाकिस्तानच्या आसिफ अली (४) यालादेखील फारशी चमक दाखवता आली नाही. एनक्रुमा बोनर (४२ चेंडूंत ४१) व रोव्हमन पॉवेल (३५ चेंडूंत ३३) यांनी पाचव्या गड्यासाठी ३८ धावांची भागीदारी केली. तलावाहज्‌ने आंद्रे रसेलला सातव्या स्थानावर उतरवले. नारायणचा चेंडू पुढे सरसावत बचावात्मकरित्या खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू पॅडला लागून हवेत उडाल्यानंतर ब्राव्होने हा चेंडू झेलत झेलबादचे केलेले जोरदार अपील पंचांनी उचलून धरल्याने रसेलला हताशपणे मैदान सोडावे लागले. कार्लोस ब्रेथवेटने २० चेंडूंत नाबाद १३ धावा केल्या. परमॉल ३ धावा करून नाबाद राहिला. तलावाहज्‌ने निर्धारित २० षटकांत ७ बाद १०७ धावांपर्यंत मजल मारली. त्रिनबागोच्या हुसेनने ३, पिएरने २ तर नारायण व फवाद यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

धावफलक
जमैका तलावाहज् ः जर्मेन ब्लॅकवूड त्रि. गो. हुसेन ०, ग्लेन फिलिप्स झे. अली खान गो. पिएर २, मुजीब रहमान झे. ड्वेन ब्राव्हो गो. हुसेन ०, एनक्रुमा बोनर त्रि. गो. फवाद ४१, आसिफ अली झे. पोलार्ड गो. हुसेन ४, रोव्हमन पॉवेल झे. पोलार्ड गो. पिएर ३३, आंद्रे रसेल झे. ड्वेन ब्राव्हो गो. नारायण २, कार्लोस ब्रेथवेट नाबाद १३, वीरसामी परमॉल नाबाद ३, अवांतर ९, एकूण २० षटकांत ७ बाद १०७
गोलंदाजी ः अकिल हुसेन ४-१-१४-३, खारी पिएर ४-०-२९-२, सुनील नारायण ४-१-१३-१, फवाद अहमद ४-०-२९-१, ड्वेन ब्राव्हो ३-०-१२-०, अली खान १-०-१०-०
त्रिनबागो नाईट रायडर्स ः लेंडल सिमन्स नाबाद ५४, सुनील नारायण त्रि. गो. मुजीब ४, टियोन वेबस्टर नाबाद ४४, अवांतर ९, एकूण १५ षटकांत १ बाद १११. गोलंदाजी ः फिडेल एडवर्डस् १-०-१०-०, मुजीब रहमान ३-०-१८-१, वीरसामी परमॉल ४-१-१४-०, संदीप लामिछाने ४-०-२९-०, आंद्रे रसेल २-०-२५-०, कार्लोस ब्रेथवेट १-०-१४-०