इटलीचा हॉलंडवर निसटता विजय

0
327

>> नेशन्स कप

मध्यपटू निकोलो बारेलाने पहिल्या सत्राच्या इंज्युरी वेळेत हेडरद्वारे नोंदविलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर इटलीने हॉलंडचा १-० असा पराभव करीत युएफा नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेत काल आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. इटली या स्पर्धेत गेल्या दोन वर्षांपासून १६ सामन्यांत अपराजित वाटचाल करीत आहे.

पहिल्या सत्राच्या ४५मिनिटांपर्यंत दोन्ही संघांना गोलकोेंडी सोडविता आली नव्हती. त्यानंतर इंज्युरी वेळेत निकोलो बारेलाने हेडरद्वारे प्रतिस्पर्धी हॉलंडच्या गोलरक्षकाला थोडक्यात चकवित संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी कायम ठेवताना इटलीने दुसर्‍या सत्रात हॉलंडला बरोबरी साधण्याची संधीच दिली नाही व आपला पहिला विजय नोंदविला. हॉलंडला इटलीविरुद्ध गेल्या १५ लढतींत केवळ एकच सामना जिंकता आलेला आहे.

दरम्यान, अन्य एका सामन्यात नॉर्वेने नॉर्दर्न आयर्लंडचा ५-१ असा धुव्वा उडवित स्पर्धेतील आपला पहिला विजय नोंदविला. नॉर्वेच्या विजयात मोलाचा वाटा उचलताना स्टार खेळाडू एर्लिंग हालेंड (८ व ५९वे मिनिट) आणि आलेक्झेंडर सोरलोथ (२०वे व ४८वे मिनिट) यांनी प्रत्येकी दोन गोल नोंदविले. तर मोहम्मद इलियौनुसीने १ गोल केला. सोमवारी खेळविण्यात आलेल्या अन्य सामन्यांमन्यांमध्ये रोमेनियाने ऑस्ट्रियावर ३-२, स्कॉटलंडने झेक प्रजासत्तकावर २-१, बेलारुसने कझाखस्तानवर २-१, लिथुआनियाने अल्बानियावर १-० तर पोलंडने बॉस्निया व हर्झेगोविनावर २-१ अशी मात करीत पूर्ण गुणांची कमाई केली.