‘त्या’ वक्तव्याप्रकरणी आमोणकर, वेर्णेकरांविरुद्ध तक्रार

0
3

>> काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांच्याकडून मडगाव पोलिसांत तक्रार दाखल

ख्रिस्ती धर्मगुरुंच्या हस्तक्षेपामुळे दक्षिण गोव्यात भाजपचा पराभव झाला हे मुरगावचे भाजपचे आमदार संकल्प आमोणकर आणि भाजपचे प्रवक्ते गिरिराज पै वेर्णेकर यांनी केलेले वक्तव्य आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. काँग्रेस पक्षाने त्यांच्या वक्तव्याला आक्षेप घेतला असून, काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारी समितीचे सदस्य गिरीश चोडणकर यांनी मडगाव पोलीस स्थानकात त्या दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, भाजपचे मंत्री आणि नेत्यांकडून दोघांच्या वक्तव्याबाबत सावध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

भाजपने राजकीय पराभवाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न चालविला आहे, असा आरोप गिरीश चोडणकर यांनी केला आहे. नागरिकांना धर्मगुरुंच्या विरोधात भडकाविण्याचे हे कारस्थान आहे. गोव्यात असल्या प्रकारांना थारा देता कामा नये. त्यामुळे या दोघांच्या विरोधात भा.दं.सं.च्या कलम 153 (अ) दोन गटांत शत्रुत्व निर्माण करणे आणि कलम 259 (अ) धार्मिक भावना भडकवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे या कलमाखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी चोडणकर यांनी तक्रारीत केली आहे.

भाजपने धर्माचे राजकारण करू नये. भाजपचा धर्माच्या नावावर नागरिकांत फूट घालण्याचा प्रयत्नामुळे धार्मिक सलोखा धोक्यात येऊ शकतो, अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी केली. गोव्याच्या आर्चबिशपांनी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी एक पत्रक जारी करून जनतेला मतदानाबाबत जाहीर आवाहन केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आर्चबिशप यांच्या वक्तव्याचे स्वागत केले होते. मग, आता ख्रिस्ती धर्मगुरुंवर मतांच्या ध्रुवीकरणाचा आरोप करणे चुकीचे आहे, असेही कवठणकर यांनी म्हटले आहे.

पराभवासाठी इतरांना दोष नको : माविन गुदिन्हो

दक्षिण गोवा मतदारसंघातील भाजपच्या पराभवाला इतरांना दोष देणे चुकीचे आहे. भाजपला काही मतदारसंघात आघाडी घेण्यास अपयश आले आहे, याची कारणे शोधण्याची गरज आहे. लोकांची सेवा हे आमचे ध्येय आहे. निवडणुकीनंतर लोकसेवेच्या कामावर भर देण्याची गरज आहे, असे मत वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी पत्रकारांशी बोलताना काल व्यक्त केले.