‘त्या’ प्रेमळ आठवणी

0
291
  •  दीप्ती रायकर
    (मळा-पणजी)

आमची आजी तापट व फटकळ जरी होती अन् त्या गोष्टीची भीती जरी होती तरीदेखील ती आमची आजी होती, आमच्यावर जरी ओरडली तरी तिचं आमच्यावर प्रेम होतंच, हे नक्की! आजी-आजोबा घरी असायला आणि त्यांच्याकडून लाड करुन घ्यायला नशीब लागतं.

कुटुंब म्हटलं की डोळ्यासमोर येतात ती घरात वावरणारी ज्येष्ठ मंडळी, म्हणजेच आपले आजी-आजोबा. प्रत्येक घरात कुणाचातरी धाक अथवा दरारा असणे महत्त्वाचे. शिवाय कुटुंब एकत्र ठेवायचं तर कुटुंबातील शिस्त ढासळू नये याची खबरदारी घेणार्‍या या दोन व्यक्ती, असं मला वाटतं. आजी-आजोबा घरी असायला आणि त्यांच्याकडून लाड करुन घ्यायला नशीब लागतं. कारण आजच्या काळात जनरेशन गॅप असून विभक्त कुटुंबाची संकल्पना जास्त दिसते. अन् त्यामुळे नात्यांमध्ये विभाजन असून ती दुरावलेली दिसतात. पण माझ्या आजीविषयी सांगायचं झालं तर तिची गोष्ट वेगळीच. कारण जरी प्रत्येक आजीप्रमाणे माझी आजी जरी असली तरीदेखील आम्हाला तिची भीती वाटत होती.

माझ्या आठवणीप्रमाणे आमच्या आजीबाई अगदी कणखर असून स्वतःची काम स्वतःच करीत असे. आपली कामे दुसर्‍यांनी केलेली त्यांना आवडत नसे. स्वतःची भांडी धुण्यापासून ते आपले कपडे स्वच्छ धुवून सुकत टाकण्यापर्यंत त्या स्वतः करत. स्वभावाने त्या थोड्याशा तापट व फटकळ असल्याने सर्वांना त्यांची भीती वाटे. खाण्यापिण्याच्या बाबतीत तर त्या अगदी पक्क्या होत्या. खाण्याच्या सर्व गोष्टी त्यांना वेळेवर हव्या असायच्या. त्या देण्यास विलंब झाला तर त्यांचा पारा चढल्यास आवरणे कठीण होत असे. पण त्यावेळी खाण्यासाठी थोडी साखर जरी दिली तरी त्या शांत होत असत.
गप्पागोष्टी करणे त्यांना जास्त आवडत नसे. पण त्यांच्या मनाचा कल उत्तम असला तर गप्पा करण्यास त्या बसत अन् आपल्या लहानपणातल्या गोष्टींपासून सर्व गोष्टी अगदी साखरेच्या पाकाप्रमाणे घोळून रंगवून सांगत. त्यावेळी गंमत म्हणून आम्ही इकडचे- तिकडचे प्रश्‍न विचारत आणि मग त्या प्रश्‍नांची उत्तरे देऊन शेवटी कंटाळल्यावर, ‘चल, मी जाते’ म्हणून आपली चप्पल टिकटिकत चालत दिवाणखान्याच्या सोफ्यावर पाठ लावून साखर मिटक्या मारून खात अन् मी गंमत म्हणून त्यांना मुद्दाम चिडवत असे. ज्यामुळे त्या माझ्या मागे काठी घेऊन यायच्या. अनेकदा आम्ही गच्चीवरून त्या कपडे सुकत घालण्यासाठी आल्यास गंमत म्हणून गच्चीवरून त्यांना चोरून हाका मारत असू. मग त्या वर पाहू लागल्या की बसल्याजागी लपून आम्ही हसत असू. मग पुन्हा हीच कृती केल्यावर त्या ओरडू लागल्या की आम्ही तिथून धूम ठोकत असू.

असेच एके दिवशी त्यांची गंमत करता करताच त्यांचा मला बराच चोप पडल्याची आठवण अजूनही स्मृतीत आहे.
मी इयत्ता चौथीत असतानाची गोष्ट. दिवाळीच्या सुट्‌ट्या नुकत्याच सुरू झाल्या होत्या. मी व माझी छोटी बहीण नम्रता गच्चीवर राहून पाहत होतो. आजी आपली चप्पल टिकटिकत अंगणात कपडे सुकत घालण्यासाठी आल्या. त्या कपडे सुकत टाकत असताना माझ्या डोक्यात गंमत करण्याचा विचार घोळू लागला. व त्यांना आवाज न देता मी माझ्या छोट्या बहिणीला, नम्रताला म्हणाले, ‘‘माऊ ऐक. आजी आत गेल्याबरोबर आपण जिना हळूच उतरून आजीची काष्टी सोडून धावूया?’’
माझी खतरनाक योजना ऐकून नम्रता म्हणाली, ‘‘अगं, आजी मारतील आपल्याला.’’
‘‘अगं घाबरतेस काय? फक्त आजीची काष्टी सोडून धावायचं.
माझं बेफिकिरी बोलणं तिला योग्य वाटलं नाही हे मला तिच्या घाबरलेल्या नेत्रांवरून समजलं व म्हणून मी तिला माझ्यासोबत खालच्या जिन्यापर्यंत उभं राहून पाहण्यास सुचवलं.
आम्ही जिन्याच्या पायर्‍या उतरण्यापूर्वी गच्चीवरून खाली वाकून पाहिले. आजी आपले कपडे सुकत टाकून आत गेल्या होत्या असे आमच्या लक्षात आले.

मी नमुला माझ्या मागून चोरपावलांनी चालण्यास सांगून आम्ही दोघी पाय दाबून जिना उतरून अंगणाच्या बाहेर राहून दिवाणखान्याच्या आत डोकं वळवलं. आजी दिवाणखान्यात समोर असलेल्या सोफ्याकडे पाठ करून उभ्या होत्या. नमुला इथंच उभं रहा, असा इशारा करून मी दिवाणखान्यात पाऊल आवाज न करता टाकलं. पण कुणास ठाऊक, आजीला कसं समजलं.. ज्यावर त्या एकदम वळून माझ्या हाताला धरून दोन धबाडके देत उद्गारल्या, ‘‘माझी काष्टी सोडायला आली आहेस? मदांध मुलगी!’’
आजीने माझा हात धरल्यामुळे मला तिथून धावता आलं नाही. अन् मला पडलेले धबाडके पाहून नम्रताने धूम ठोकली होती. कसाबसा माझा हात आजीच्या तावडीतून सोडवून जीव हातात घेऊन मी धावत सुटली.

त्यानंतर आई-बाबांची बोलणी खाऊन तरीही मी सुधारली नाही. गंमत म्हणून आजीची तरीही मस्करी थोडीशी सावध राहून करायचीच अन् त्या माझ्यावर ओरडताच मी लपून हसायची.
आज माझ्या आजीला जाऊन अनेक वर्षं झालीत. तरीही तिच्या सोबत केलेली मस्करी, खाल्लेला मार अन् बोलणी खूप आठवते. अनेकवेळा घरातील मंडळी एकत्र बसून गप्पा करताना तिच्या आठवणी काढून कधी हसतो तर कधी रडतोही. वाटतं आजीला भेटावंसं.
आमची आजी तापट व फटकळ जरी होती अन् त्या गोष्टीची भीति जरी होती तरीदेखील ती आमची आजी होती, आमच्यावर जरी ओरडली तरी तिचं आमच्यावर प्रेम होतंच, हे नक्की!