त्या दोघी

0
184
  • प्राजक्ता गावकर

‘‘मूल देऊन टाकू? तिला स्वतःला खायला काही नाही, या बाळाला ती काय घालणार? कशी सांभाळणार? कारण तिचा वाली कुणी नाही. ती एकटीच आहे, वरून कुमारी माता….

मे महिन्यातली गोष्ट. आम्ही सहकुटुंब बेळगावला लग्नकार्यानिमित्ताने गेलो होतो. जाताना बसने अनमोड घाटातून गेलो. मुले खुश होती. डोंगर, दर्‍या, कडे, कपारी हा सह्याद्रीचा साज सर्व जवळून पाहता आले. ठीक बारा- साडेबारादरम्यान आम्ही बेळगावला पोचलो. मुलांना शाळेमुळे कुठेही जाता येत नसे आणि पतीदेवांना कामावरून सुटी नाही. परिणाम मीही घरीच. कधी नव्हे ते बेळगावला जायला मिळाले म्हणून मी आणि मुलेसुद्धा खुश.
नातलगाकडे लग्नकार्य आटोपून चार दिवस राहून आम्ही परत गोव्याला यायला निघालो. मुले म्हणाली म्हणून बसने न जाता ट्रेनने जायचे ठरवले.

आम्ही मिरज ते मडगाव ट्रेनने गोव्यात सावर्डेपर्यंत येणार होतो. मुले तर पहिल्यांदाच ट्रेनच्या प्रवासाचा आनंद घेणार होती. मी त्यांना सांगत होते, ‘‘लहानपणीही मी एकदा बेळगावहून गोव्याला ट्रेननेच गेले होते. मस्त मजा येते. डोंगर-दर्‍या जवळून पाहता येतात. २१ बोगदे लागतात. बोगद्यात गाडी गेली की मला फार भीती वाटायची. मी डोळे मिटून बाबांचा हात घट्ट धरायची. बाबांना, माझी खूप गंमत वाटायची. गाडी बोगद्यातून बाहेर आली की बाबा मला म्हणायचे, ‘‘बाळ उजेड आला, आता डोळे उघड पाहू’’. मुले विचारत होती, ‘‘आता कुठले स्टेशन येणार?’’ मीही उत्साहाने सांगत होते, ‘‘आपण बेळगाव, खानापूर, लोंढा, कॅसलरॉक या मार्गाने सावर्ड्यापर्यंत जाणार आहोत. कुळे येथे दूधसागर धबधबा तुम्हाला फार जवळून पाहता येईल.’’
मुलांचा किलबिलाट सुरू झाला की मी एका खिडकीकडे बसणार, तू दुसर्‍या खिडकीकडे बस. मी जरा आजूबाजूला नजर टाकली. स्टेशनवर गर्दी भरपूर होती. लमाणी लोकांचाच जास्त भरणा होता. बसायलासुद्धा जागा नव्हती. गोंधळ आणि कलकलाटही खूप होता.

मधूनच ट्रेनचे भोंगे वाजत. साराच गोंधळ. या गोंधळातच आणखी एक गोंधळ ऐकू आला. आम्ही सहजच कुतुहलाने पहायला गेलो तर दोन बायकांमध्ये भांडण जुंपले होते. दोन्ही बायका लमाणी समाजातल्या. पहिली जरा बारीक अंगकाठीची नाजूक, असेल सतरा- अठरा वर्षांची आणि दुसरी जरा वयस्कर आणि जरा स्थूल! पहिल्या बाईची सासू किंवा आई शोभेल दुसरी, अशा दोघी एका तीन-चार महिन्याच्या बाळासाठी भांडत होत्या.

पहिली म्हणत होती, ‘‘मी तुझ्या पाया पडते, माझे बाळ मला दे.’’ तर दुसरी म्हणत होती, ‘‘वा गं वा, म्हणे माझे बाळ! हे बाळ माझे आहे!’’ पहिली रडत म्हणत होती, ‘‘नको, असे करू नको. या बाळाशिवाय मला कोण आहे? तू याला घेऊन जाऊ नकोस. दे माझं बाळ’’. दुसरी तिला दरडावत म्हणत होती, ‘‘गप्प बस. तोंड वेंगाडत सारखे सारखे तेच तेच बोलू नकोस. मी बाळ घेऊनच जाणार.’’ पहिली बाई बाळासाठी दुसर्‍या बाईशी झोंबाझोंबी करत होती. दुसरी बाई पहिल्या बाळाला हातच लावायला देत नव्हती. सगळे लोक हे भांडण पाहात होते पण कुणाची बाजू घ्यावी हे कुणालाच कळत नव्हते. शेवटी गर्दीतल्याच एका म्हातार्‍या बाबांनी विचारलं, ‘‘बाळ कुणाचं?’’ दोघी एकदमच म्हणाल्या, ‘‘माझं’’. ते म्हातारे बाबा परत म्हणाले, ‘‘ही तुझी सून आहे की मुलगी?’’ तशी ती जाड बाई म्हणाली, ‘‘ही माझी कुणीच नाही.’’ त्या म्हातार्‍या बाबांनी त्या बारीक बाईला विचारलं, ‘‘हे बाळ तुझं आहे कशावरून?’’ ती बारीक बाई काकुळतीने म्हणाली, ‘‘असं हो काय बोलता आजोबा? या बाळाला मी जन्म दिलाय. नऊ महिने मी त्याला माझ्या पोटात वाढवलंय. कळा मी काढल्या, जन्माला मी घातलं. मग हे बाळ माझंच नव्हे काय?’’
तिचं बोलणं ऐकून म्हातारे बाबा म्हणाले, ‘‘हे बाळ तुझं आहे तर मग ही बाई हे बाळ आपण घेऊन जाते, असे का म्हणतेय? ती तुझी कोण?’’
ती बारीक बाई म्हणाली, ‘‘ही बाई माझी कुणीही नाही. पण तिला आपलं स्वतःचं मूल नाही म्हणून ती माझं मूल पळवायला बघतेय.’’
सर्व लोक हा तमाशा तल्लीन होऊन पाहत होते. त्या म्हातार्‍या बाबांनी बारीक बाईला सांगितले, ‘‘तू पोलिसात तक्रार दे या बाईविरुद्ध.’’
ती जाडी बाई हातवारे करत बोलली, ‘‘तेवढी हिम्मत पाहिजे ना तक्रार द्यायला.’’
म्हातार्‍या बाबांनी परत बारीक बाईला म्हटले, ‘‘तू तुझ्या नवर्‍याला बोलावून घे.’’ तेव्हा ती जाडी बाई उसळून म्हणाली, ‘‘हिला नवराच नाही तर कुणाला बोलावणार हो ही?’’ आणि खी खी करून जोरात हसू लागली.
ती बारीक बाई तोंड कसतरीच करून सर्वांकडे पाहात होती. तिचे डोळे भरून वाहायला लागले. ते म्हातारे बाबा त्या जाड्या बाईला जरा रागावूनच म्हणाले, ‘‘का तिचे मूल पळवतेस? देऊन टाक आधी तिचे मूल.’’ त्यावर ती बाई बोलली, ‘‘मूल देऊन टाकू? तिला स्वतःला खायला काही नाही, या बाळाला ती काय घालणार? कशी सांभाळणार? कारण तिचा वाली कुणी नाही. ती एकटीच आहे, वरून कुमारी माता. आता बघा, मी जर बाळाला नेले तर तीही येईल माझ्याबरोबर. माझा भंगाराचा अड्डा आहे. त्याला माझा मुलगा म्हणून वाढवीन. उद्या तो मोठा झाला की मी त्याला भंगार अड्‌ड्याचे काम बघायला लावीन. स्वतःच्या पायावर उभा राहील तो! हिच्याकडे ठेवून काय करायचं? तो उपाशी मरेल नाहीतर इथल्या भिकार्‍यांसारखा रस्त्यावर फिरेल. म्हणून मी नेते बाळाला.’’ आता त्या बाईचे म्हणणे सगळ्यांना पटले. त्या म्हातार्‍या बाबांनी त्या बाळाच्या आईला सांगितले, ‘‘हे बघ मुली, ही बाई म्हणते ते बरोबर आहे. तूपण हिच्याबरोबर जा. त्यातच तुझं भलं आहे.’’ एवढं बोलून ते तिथून निघून गेले.

आता सर्व गर्दी पांगली. पण त्या दोघींची हमरीतुमरी अजूनही चालूच होती. आमचीही ट्रेन आली. आम्ही चढलो. बसायला छान मिळाले. मी सहज खिडकीतून त्या बायकांकडे नजर टाकली. त्या दोघी त्याच जागेवर बसल्या होत्या. ती बाळाची आई बाळाला पाजत होती. बाळ तिच्या गळ्यातल्या हाराला धरून खेळत खेळत दूध पीत होतं आणि ती जाडी बाई कौतुकाने त्या मायलेकराला पाहात होती. तिच्या चेहर्‍यावर एक समाधान दिसत होतं.