घ्यावी कमळाची अलिप्तता

0
182
  • पल्लवी दि. भांडणकर

आपल्या स्वार्थी जगात कमळासारखी माणसेही जन्मतात, जी स्वतःला या दलदलीत न गुंतवता अलिप्त ठेवतात. संत मीराबाईला विषप्रयोग करणारी स्वतःचीच माणसं होती ना? भक्त प्रल्हाद असुरांच्या कुळात जन्मुनसुद्धा देवभक्त होताच की!

एकदा एका शैक्षणिक क्षेत्रातल्या कार्यसत्रात एका स्त्रोत व्यक्तीने एका उपक्रमात प्रत्येक शिक्षकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीशी किंवा वस्तूशी स्वतःची तुलना करायला लावली. ती गोष्ट आपल्याला स्वतःत का दिसते… असे विचारताच अनेकांनी कधी अगदी मजेशीर तर कधी प्रेरणा देणारी उत्तरे दिली. माझी पाळी
येताच माझ्या मनात अनेक विचार येऊन गेले. वेळ कमी असल्याने, मला वाटतं मी एका कमळासारखी आहे, असं पटकन उत्तर दिलं. तुला असं का बरं वाटतं असा त्या तज्ञ व्यक्तीने प्रश्न विचारताच माझ्या मनात विचार सुरू झाले. कमळ हे एक निसर्ग देवतेने निर्माण केलेले एक सुंदर फुल तरी त्याचा उगम मात्र कित्येकदा दलदली भागात किंवा चिखलात होतो.

माणसाचा जन्म ही तसाच आहे ना? हे जगही एक मिथ्या आहे आणि अश्या ह्या जगात सर्वत्र चांगुलपणापेक्षा बहुतेक ठिकाणी कुविचारांची दलदल आहे. आपला स्वार्थ साधून केलेल्या देवाणघेवाणीचा चिखल सगळीकडे पसरलेला आहे. अनेक कुकर्मांनी माणूस व्यापलेला आपल्याला दिसतो. पण ज्याप्रमाणे कमळ अशा दलदलीत उगवूनसुद्धा स्वतः मात्र सुंदर शुभ्र फुलतं. या दलदलीचा त्याच्या फुलण्यावर काहीच परिणाम होत नाही. ते स्वतःला या चिखलातही अलिप्त ठेवतं. स्वतःच्या नितळ तेजानं ते दलदली वातावरण अगदी नाहीसं भासवतं. आपला सुगंध सर्वत्र सांडत जातं.

आपल्या स्वार्थी जगात कमळासारखी माणसेही जन्मतात, जी स्वतःला या दलदलीत न गुंतवता अलिप्त ठेवतात. संत मीराबाईला विषप्रयोग करणारी स्वतःचीच माणसं होती ना? भक्त प्रल्हाद असुरांच्या कुळात जन्मुनसुद्धा देवभक्त होताच की! अशी कितीतरी उदाहरणे आपल्यापुढे आहेत. जात-पात मानणार्‍या समाजाने भ्रष्ट म्हणून हिणवलेल्या संत चोखामेळाने अशा लोकांना कधीही न दुखावता स्वतः देवावर निस्सीम प्रेम आणि भक्ती केलीच की? अशी कमळासारखी माणसे दृष्ट प्रवृत्ती आणि दुष्ट विचारांनी ग्रासलेल्या दलदलीत राहूनसुद्धा स्वतःचा व इतरांचा उद्धार करतात. असे हे कमळ वारंवार आपल्याला हा संदेश देऊ इच्छिते की आपण कुठे जाणार आहोत हे महत्त्वाचं आहे, कुठून आलो आहोत ते नाही!