ते आणि आम्ही

0
118

ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरातील थरारनाट्य अखेर सोळा तासांनंतरच्या धडक कारवाईत संपुष्टात आले. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याशी साधर्म्य असलेला हा हल्ला असला, तरी ऑस्ट्रेलियाच्या सुरक्षा दलांनी तो कसा हाताळला आणि आपल्याकडे काय घडले यातील कमालीचा फरक विचार करण्यासारखा आहे. मुंबईवर हल्ला चढवलेल्या हल्लेखोरांची संख्या जास्त होती आणि ते पूर्ण प्रशिक्षित होते, तर सिडनीतील हल्लेखोर हा एकटा होता, मध्यमवयीन होता व त्याने त्यासाठी विशेष प्रशिक्षण वगैरे घेतलेले नव्हते वा त्याला मुंबई हल्ल्याप्रमाणे कोणी फोनवरून मार्गदर्शन करीत नव्हते हे जरी खरे असले, तरी हल्ल्याचे स्वरूप तितकेच गंभीर होते. तीस – चाळीस जणांना ओलीस धरण्यात या हल्लेखोराला यश आले होते. पण ऑस्ट्रेलियाच्या सुरक्षा दलांनी त्याच्यापुढे मान तुकवली नाही. अत्यंत संयमाने, त्याच्याशी वाटाघाटी सुरू ठेवल्याचा आव आणत संधी मिळताच तडफेने कमांडो कारवाई करून त्याला यमसदनी पाठवण्यात आले आणि बंधकांची मुक्तता करण्यात आली. अशा प्रकारची धडक कारवाई करून ऑस्ट्रेलियाने एक संदेश दहशतवाद्यांना दिला आहे की, पुन्हा असा प्रयत्न कराल, तर त्याचा शेवट असाच होईल. दहशतवाद्यांना अशा प्रकारचे हल्ले चढवले तरी वाटाघाटीची संधी मिळणार नाही आणि मागण्या तर कदापि मान्य केल्या जाणार नाहीत हे या कारवाईतून सूचित केले गेले आहे आणि हा संदेश जाणे फार महत्त्वाचे होते. ज्या हरून मोनीस नावाच्या व्यक्तीने हा हल्ला केला, त्याने तो स्वयंप्रेरणेतून केल्याचे दिसून येत आहे. म्हणजे आयएसआयएस किंवा अन्य कोणत्याही दहशतवादी संघटनेच्या पाठबळाविना स्वतःहून त्याने हा सशस्त्र हल्ला चढवला. असे स्वयंप्रेरित माथेफिरू आपल्या भारतामध्येही आहेत. त्यातले काहीजण थेट इराकमध्ये जाऊन आयएसआयएसमध्ये भरती झाले, तर बेंगलुरूच्या एका तरूणाने त्यांच्यासाठी ट्वीटर खाते चालवल्याचे नुकतेच निष्पन्न झाले आहे. त्यामुळे एकट्या दुकट्याने अशा प्रकारचे हल्ले चढवले जाणे असंभव म्हणता येत नाही. त्यामुळे अशा आव्हानाचा मुकाबला कसा केला गेला पाहिजे याचे उदाहरण ऑस्ट्रेलियाने घालून दिले आहे. त्यांच्या पायोनियर या कमांडो दलाने धडक कारवाई करून क्षणार्धात हल्लेखोराला ठार मारले. या कमांडोंपाशी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे होती. त्यांच्याजवळची बळकट चिलखते, शिरस्त्राणे, नाईट व्हीजन गॉगलसारखी साधने, हाती असलेली अत्याधुनिक व हलकी शस्त्रे यांचे लढण्यासाठी आवश्यक ते मनोबल उंचावण्यात मोठे योगदान असते. याउलट आपल्या सुरक्षा दलांची स्थिती आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ला होऊनही आपल्या सुरक्षा दलांच्या स्थितीत सुधारणा घडून आलेली दिसत नाही. सिडनीतील कॅफेमध्ये जेव्हा पायोनियर कमांडो घुसले तेव्हा तेथील वीज बंद करण्यात आली होती. या कमांडोंपाशी नाईट व्हीजन गॉगल होते. त्याच्या आधारे त्यांनी हल्लेखोराचा माग काढला आणि त्याला कंठस्नान घातले. हल्लेखोराला ठार मारल्यानंतर लगेच तेथे बॉम्बशोधक रोबो पाठवण्यात आला आणि त्या रोबोने तो परिसर पिंजून काढला. आपल्याकडे अजूनही बॉम्बविरोधी पथकातील माणसे पाठवली जातात. दहशतवादाचा मुकाबला करायचा असेल तर पारंपरिक पद्धतींना फाटा देऊन नव्या, अत्याधुनिक साधनांचा, तंत्रज्ञानाचा वापर प्राधान्यक्रमाने झाला पाहिजे. भारतापुढे असलेला दहशतवादी हल्ल्याचा धोका तर ऑस्ट्रेलियापेक्षा कैक पटींनी मोठा आहे. त्यामुळे भारतीय सुरक्षा दलांजवळची सुरक्षात्मक साधने, उपकरणे, शस्त्रास्त्रे यामध्ये आमूलाग्र परिवर्तन येण्याची आवश्यकता आहे. त्या दिशेने नुकते कुठे प्रयत्न सुरू झालेले आहेत, परंतु ते जलदगतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. कोणत्याही दहशतवादी हल्ल्याच्या प्रसंगास तोंड देण्यास आपली सुरक्षा दले सक्षम आहेत याची खात्री त्या जवानांना पाहिल्याबरोबर पटली पाहिजे. त्यांचा वेश, त्यांच्याजवळची साधने, शस्त्रास्त्रे यांचा अशा मुकाबल्यात महत्त्वाचा वाटा असतोच. काल पाकिस्तानच्या पेशावरमध्ये शाळेवर दहशतवादी हल्ला झाला. भारतावर तर अशी संकटे घोंगावतच आहेत. अशा आव्हानांच्या मुकाबल्यासाठी आपली सुरक्षा दले पूर्णपणे सक्षम झाली पाहिजेत. आधुनिक शस्त्रास्त्रे, तंत्रज्ञान यांची मदत त्यांना आर्थिक बाबींचा विचार न करता मिळायला हवी. या संकटाच्या घडीस त्याशिवाय प्रत्यवाय नाही.