पेडणे तालुक्यातील तुये हॉस्पिटल नागरिक कृती समितीने येत्या रविवार दि. 20 जुलै रोजी तुये हॉस्पिटलाच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जाहीर सभा घेण्याची घोषणा केल्यानंतर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी मांद्रेचे आमदार जीत आरोलकर आणि आरोग्य अधिकाऱ्यांची एक तातडीची बैठक घेऊन तुये हॉस्पिटलांच्या विषयावर काल चर्चा केली. तुये येथील सामाजिक आरोग्य केंद्र (सीएचसी) लवकरात लवकर कार्यान्वित करण्याबाबत चर्चा करण्यात आली असून, मांद्रे मतदारसंघातील लोकांना सर्वोत्तम आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी आमदार जीत आरोलकर सातत्याने पाठपुरावा करत आहेत. पेडणे तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी म्हटले आहे. याबैठकीला आरोग्य सचिव अरुण कुमार मिश्रा, आरोग्य संचालक डॉ. रूपा नाईक, तुयेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल मोरस्कर आणि आरोग्य खात्याच्या संचालक पूजा मडकईकर याची उपस्थिती होती.