तीन दिवसीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाची शक्यता

0
201

>> मुख्यमंत्र्यांच्या आजारपणामुळे विचार

>> कामकाज सल्लागार समितीचा आज निर्णय

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारपणामुळे गोवा विधानसभेच्या दीर्घकालीन अर्थसंकल्पीय अधिवेशनावर अनिश्‍चितेचे सावट पसरले असून हे अधिवेशन आता केवळ तीन दिवस घेतले जाण्याची शक्यता आहे. सभापती डॉ. प्रमोद सावंत यांना काल त्यासंबंधीचा निर्णय सोमवारी (आज) गोवा विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

आज सोमवारी राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांचे अभिभाषण होईल. त्यानंतर विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात येईल. नंतर विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार असून त्यावेळी अधिवेशन किती दिवसांचे करायचे त्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सभापती डॉ. सावंत यांनी सांगितले.
उपसभापती मायकल लोबो म्हणाले की, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज केवळ तीन दिवसांचे करायचे असा विचार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत आज त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. १९, २० व २१ असे तीन दिवसच अधिवेशन घेण्याचा विचार आहे. पर्रीकर यांच्या गैरहजेरीत विधानसभेतील एक ज्येष्ठ सदस्य असलेले मगो नेते व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर अर्थसंकल्प विधानसभेच्या पटलावर ठेवणार आहेत. दि. २० रोजी अर्थसंकल्प सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे पर्रीकर यांनीच त्यासाठी ढवळीकर यांचे नाव सूचित केले आहे. २१ रोजी चार महिन्यांसाठीच्या लेखानुदानाच्या तरतुदीला मंजुरी देण्यात येईल. तसेच सदर दिवशी अर्थसंकल्पावर चर्चा होईल असे लोबो म्हणाले.

प्रश्‍नोत्तराचे सत्र बहुतेक करून होणार नाही. पण त्याबाबत सोमवारच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याचे लोबो यांनी स्पष्ट केले. या अधिवेशनासाठी आलेले प्रश्‍न पुढील अधिवेशनात घेण्यात येतील. हे सर्वांत दीर्घ मुदतीचे अधिवेशन असल्याने प्रश्‍नही भरपूर आले असल्याचे लोबो यांनी सांगितले.

भाजप विधीमंडळ गटाची
आज तातडीची बैठक
आजपासून होऊ घातलेले गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे आजारपण ह्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या विधीमंडळ पक्षाची आज सोमवारी तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. ही बैठक आज सकाळी १०.३० वाजता होणार असल्याचे मायकल लोबो यांनी सांगितले. बैठकीत पर्रीकर यांचे आजारपण व आजपासून सुरू होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन अशी जी कठीण परिस्थिती उद्भवलेली आहे त्याबाबत सविस्तर चर्चा करून पुढील कृती ठरवण्यात येणार असल्याची माहिती लोबो यांनी दिली.