प्रजासत्ताकदिनी घोषणा
प्रजासत्ताक दिनानिमित्ताने तिहार तुरुंगातून एकूण २४ कैद्यांची मुक्तता करण्यात आली असून बलात्कार, तस्करी व अमली पदार्थ याप्रकरणी दोषी ठरलेल्या कैद्यांव्यतिरिक्त अन्य १००० जणांना त्यांच्या शिक्षेत १५ दिवसांपासून दोन महिन्यापर्यंत सूट देण्यात आली आहे.
तिहार तुरुंगाचे प्रवक्ते सुनील गुप्ता यांनी याविषयी माहिती दिली. तसेच १००० कैद्यांना शिक्षेत सूट दिल्याविषयीचे नायब राज्यपाल यांनी अधिकृत पत्र पाठविले असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
कैद्यांच्या चांगल्या वागणुकीबद्दल दर वर्षी त्यांच्या शिक्षेत प्रजासत्ताकदिनी सूट देण्याची तरतूद आहे. गुन्हे दंड संहितेतील कलम ४३२ खाली ही तरतूद आहे. तिहार तुरुंग मुख्यालयावर तुरुंग महासंचालक विमला मेहर यांनी ध्वजारोहण केल्यानंतर या विषयीची घोषणा करण्यात आली. त्यानुसार ज्या कैद्यांना एका वर्षाची शिक्षा झाली असेल त्यांना १५ दिवस सूट मिळणार आहे. ज्यांना एक ते पाच वर्षांपर्यंत शिक्षा झाली आहे त्यांना एका वर्षाची सूट तर ५ ते १० वर्षे शिक्षा झालेल्यांना ४५ दिवसांची सूट मिळणार आहे.
दक्षिण आशियातील सर्वात मोठे तुरुंग असलेल्या तिहार तुरुंगात १२,००० हून अधिक कैदी आहेत. ४०० एकर जागेत हे तुरुंग आहे.