Home बातम्या लोकसभा निवडणूक लढविण्याचा अडवाणी यांचा विचार

लोकसभा निवडणूक लढविण्याचा अडवाणी यांचा विचार

0
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या पक्षाने आपली राज्यसभेवर नियुक्ती केल्याच्या वृत्ताचे काल खंडन केले. पत्रकारांशी संवाद साधताना अडवाणी यांनी वरील स्पष्टीकरण केले. तसेच आपण आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याचा विचार करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.‘मी काहीही म्हटलेले नाही (राज्यसभेवर जाण्यासंदर्भात) आणि कोणी तसा प्रस्ताव दिल्यास मी त्याबाबत विचार करीन.

परंतु साहजिकच तसा विचार करायचा होता तर मी ते याआधी केले असते’, अशी प्रतिक्रियाही अडवाणी यांनी एका प्रश्‍नावर व्यक्त केली. आपण लोकसभा निवडणूक लढविणार काय असे विचारले असता, ‘माझ्या मनात तसा विचार आहे’ असे उत्तर त्यांनी दिले. अडवाणी व अन्य काही नेत्यांची राज्यसभेवर नियुक्ती केली जाण्याविषयीचे वृत्त शनिवारी पसरले होतेे. अडवाणी लोकसभेत गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात.
भाजपचे निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची निवड झाल्यानंतर अडवाणी यांनी भाजपमधील सर्व पदांचा राजीनामा दिला होता. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हस्तक्षेपानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला होता.