ताळगाव पंचायत निवडणुकीसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल

0
4

ताळगाव ग्रामपंचायतीच्या येत्या 28 एप्रिल 2024 रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज येत्या सोमवार 8 एप्रिल ते 18 एप्रिल 2024 पर्यत स्वीकारले जाणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने काल दिली.
ताळगाव ग्रामपंचायतीचे एकूण 11 प्रभाग आहेत. या पंचायत क्षेत्रात एकूण 19,349 मतदार असून, त्यात 9,206 पुरुष मतदार आणि 10,143 महिला मतदारांचा समावेश आहे. ग्रामपंचायतीच्या अकरा प्रभागांपैकी चार प्रभाग महिला आणि प्रत्येकी 1 प्रभाग ओबीसी आणि एसटीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

पंचायतीच्या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून तिसवाडी मामलेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी मतदान मतपत्रिकेद्वारे घेतले जाणार आहे. पंचायत निवडणूक पक्षीय पातळीवर घेतली जाणार नाही. उमेदवारांसाठी खर्च मर्यादा 40 हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे.

उमेदवारी अर्जांची छाननी 19 एप्रिल रोजी केली जाणार असून, 20 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतले जाऊ शकतात. 28 रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 5 यावेळेत मतदान घेतले जाणार आहे. मतमोजणी 29 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता केली जाणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून तिसवाडीचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमली यांची नियुक्ती करण्यात आहे. निवडणूक आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.