234 पैकी 144 आमदारांनी दिला पाठिंबा
तामिळनाडू विधानसभेत विजयच्या टीव्हीके सरकारने काल बुधवारी बहुमत चाचणी उत्तीर्ण केली. मतदानाच्या वेळी सभागृहात 171 आमदार उपस्थित होते. यापैकी 144 आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दिला. टीव्हीकेच्या बाजूने अण्णाद्रमुकच्या 25 बंडखोर आमदारांनीही मतदान केले. अण्णाद्रमुकचे 47 आमदार आहेत. 22 आमदारांनी टीव्हीके सरकारला विरोध केला. बहुमत चाचणीत 59 आमदार असलेल्या द्रमुक पक्षाने सभात्याग केला. सभागृहात उपस्थित असलेल्या पीएमकेचे 4 आणि भाजपचा एक आमदार मतदानात सहभागी झाले नाहीत.
विजय त्रिची ईस्ट आणि पेरम्बूरमधून अशा दोन जागा जिंकले होते. मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी त्रिची ईस्टमधून राजीनामा दिला. त्यामुळे त्रिची ईस्टवर पोटनिवडणूक होईल.
अण्णाद्रमुकमध्ये फूट
क्रॉस वोटिंगमुळे अण्णाद्रमुकमध्ये फूट पडली आहे. पक्ष पलानीस्वामी आणि सीव्ही षणमुगम या दोन गटांमध्ये विभागला गेला आहे.
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत विजयच्या पक्षाने एकूण 234 जागांपैकी सर्वाधिक 108 जागा जिंकल्या. द्रमुकला 59 आणि अण्णाद्रमुकला 47 जागा मिळाल्या. लहान पक्ष आणि इतरांना 20 जागा मिळाल्या. सरकार स्थापन करण्यासाठी 118 चे बहुमत कोणालाही मिळाले नाही.