…तर मगो भाजपसोबत युतीस तयार

0
50

>> भाजपकडे पक्षासाठी १२ जागा सोडण्याचा प्रस्ताव

भाजपबरोबर युती करणे म्हणजे आत्महत्त्या करण्यासारखे आहे हे विधान चार-पाच दिवसांपूर्वीच पत्रकार परिषदेतून करणारे मगोचे नेते व आमदार सुदिन ढवळीकर यांनी भाजपबरोबरच्या युतीच्या प्रश्‍नावरून काल घुमजाव करताना जर भाजप मगोसाठी १२ जागा सोडण्यास तयार असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर युतीस तयार आहोत, असे काल स्पष्ट केले.

यासंबंधी पुढे बोलताना ढवळीकर म्हणाले की, राज्यातील १२ मतदारसंघांत मगो पक्षाचे वर्चस्व असून यापूर्वीच पक्षाने तेथे आपले काम सुरू केले आहे. या १२ मतदारसंघात मगो पक्षाला विजयाची खात्री असल्याने जर भाजप हे १२ मतदारसंघ मगो पक्षासाठी सोडायला तयार असेल तर आम्ही भाजपबरोबर येत्या गोवा विधानसभा निवडणुकीत युती करण्यास तयार आहोत, असे सुदिन ढवळीकर यांनी म्हटले आहे.

भाजपने आमचा विश्‍वासघात केलेला आहे. आणि त्यामुळे त्यांच्याशी आम्ही कोणत्याही परिस्थितीत युती करणे म्हणजे आत्महत्त्या करण्यासारखे आहे, असे विधान ढवळीकर यांनी गेले काही दिवस सातत्याने केले आहे. मात्र, काल ह्या भूमिकेपासून फारकत घेत ते म्हणाले की जर भाजप आम्हाला १२ जागा देण्यास तयार असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर युती करण्यास तयार आहोत.