तमिळनाडूच्या सर्व 234 जागांवर गुरुवार दि. 23 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी पहिल्या टप्प्यात 152 जागांवर मतदान होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान दि. 29 एप्रिलला होईल. दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल 4 मे रोजी जाहीर केला जाईल.
तमिळनाडूमध्ये 234 जागा असून, तब्बल 4023 उमेदवार रिंगणात आहेत. तसेच एकूण 5 कोटी 60 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तमिळनाडूचे राजकारण गेल्या काही दशकांपासून द्रमुक आणि अण्णा द्रमुक याच प्रादेशिक पक्षांभोवती फिरत आले आहे. यंदा 2026च्या विधानसभा निवडणूक रिंगणात प्रसिद्ध अभिनेता विजयच्या ‘तमीळगा वेत्री कळघम’ पक्षाने उडी घेतल्याने तिरंगी सामना होईल. विजय यांचा पक्ष तरुण मतदारांना आणि पारंपरिक राजकारणास कंटाळलेल्या वर्गाला आकर्षित करत असल्याने त्यांच्या कामगिरीवर निकाल निश्चित होईल.
तमिळनाडूत ‘द्रमुक’प्रणित ‘धर्मनिरपेक्ष पुरोगामी आघाडी’मध्ये काँग्रेस, डावे पक्ष आणि विदुथलाई चिरुथाईगल कात्ची (व्हीसीके) यांचा समावेश आहे. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली ही आघाडी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे, तर एडप्पाडी के. पलानीसामी यांच्या नेतृत्वाखाली ‘अण्णा द्रमुक’, भाजप आणि पट्टाली मक्कळ कच्ची (पीएमके) यासारखे पक्ष ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’तून निवडणूक लढवत आहेत.
पश्चिम बंगालमध्ये काय स्थिती?
पश्चिम बंगालचे राजकारण सध्या तृणमूल काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांभोवती फिरत आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूलची गेल्या 15 वर्षांपासूनची सत्ता संपुष्टात आणण्यासाठी भाजपने जणू कंबर कसली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अनेक दौरे केले.
पश्चिम बंगालच्या विधानसभेचे एकूण संख्याबळ 294 इतके आहे. पहिल्या टप्प्यात 23 एप्रिलला 152 जागांसाठी, तर दुसऱ्या टप्प्यात 29 एप्रिलला 142 जागांसाठी मतदान होत आहे. निवडणुकीसाठी 2,900 पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्यात सुमारे 1,470 उमेदवार आहेत. त्यात भाजपने सर्व म्हणजे 152 मतदारसंघांमध्ये उमेदवार दिले आहेत, तर तृणमूल काँग्रेसचे 148 उमेदवार आहेत.