अमेरिका आणि इराणदरम्यान पाकिस्तानमध्ये जवळजवळ एकवीस तास चाललेल्या चर्चेतून काही तोडगा जरी निघू शकलेला नसला, तरी दोन्ही बाजू चर्चेसाठी समोरासमोर उभ्या ठाकल्या ही जमेची बाबच म्हणायला हवी. इस्लामाबादेतील चर्चा निष्फळ ठरली, तरी दोन्ही पक्षांतील राजनैतिक संपर्क पाकिस्तानच्या मार्फत सुरूच ठेवण्याबाबत सहमती झालेली असल्याने अजूनही आशेला वाव आहे. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची एक घाव दोन तुकडे करण्याची खुमखुमी लक्षात घेता अजूनही हा संघर्ष धोकादायक वळणावरच उभा आहे. इराण – अमेरिकेतील बोलणी मुख्यत्वे तीन मुद्द्यांवर फिसकटली. ह्यातील पहिला आणि सर्वांत महत्त्वाचा मुद्दा होता तो इराणच्या आण्विक क्षमतेचा. अमेरिकेने हे युद्ध पुकारण्यास मुख्यतः तेच कारण होते. इराण अण्वस्त्रे तयार करीत आहे आणि काहीही झाले तरी इराणने आपला आण्विक कार्यक्रम सोडून दिला पाहिजे हा हेका अमेरिकेने धरला आहे. मात्र, नागरी गरजांखातर आण्विक कार्यक्रम सुरू ठेवण्याचा आपला अधिकार आहे अशी भूमिका स्वीकारून इराण त्यावर ठाम राहिल्याने मुख्यत्वे ही बोलणी फिसकटली. दुसरा विवादित मुद्दा होता होर्मुझच्या सामुद्रधुनीचा. खरे तर हे युद्ध पुकारले गेले, तेव्हा होर्मुझ हा विषयच नव्हता. परंतु इराणने अमेरिकेला कोंडीत पकडण्यासाठी आपल्याजवळील हा हुकुमाचा पत्ता उघडला. त्यामुळे आता उभय देशांत तोही एक संघर्षाचा मुद्दा बनला आहे. एकीकडे इस्लामाबादेत चर्चा सुरू असतानाच अमेरिकेने आपल्या युद्धनौका होर्मुझमधील पाणसुरूंग निकामी करण्यास रवाना देखील केल्या होत्या. लवकरात लवकर होर्मुझची सामुद्रधुनी मोकळी करून त्याचे श्रेय उपटण्यास डोनाल्ड ट्रम्प उतावीळ आहेत, तर होर्मुझच्या सामुद्रधुनीवर ह्या निमित्ताने अधिकृतरीत्या आपले नियंत्रण प्रस्थापित करून परिस्थितीचा फायदा उठवण्याच्या प्रयत्नात इराण आहे. तिसरा विवादित मुद्दा ठरला तो इराणने आजूबाजूच्या देशांमध्ये पाळलेल्या हस्तकांचा. लेबनॉनमधील हिज्बुल्ला, येमेनमधील हौथी, गाझामधील हमास असे हे हस्तक इराणने पाळले, पोसले आहेत. इस्रायल हा त्यांचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे. इस्रायलने गाझामध्ये हमासला नेस्तनाबूत केले. आता ह्या युद्धाच्या निमित्ताने इस्रायल हिज्बुल्लासारख्या हाडवैऱ्याचा सर्वनाश करून आपले राष्ट्र सुरक्षित करू पाहतो आहे. त्यामुळे एकीकडे इराण – अमेरिका चर्चेची तयारी चालली असताना इस्रायलने मात्र लेबनॉनवरील आपले हल्ले सुरूच ठेवले होते. अक्षरशः दहा मिनिटांत शंभर क्षेपणास्त्रे डागून इस्रायलने हिज्बुल्लाच्या नायनाटाचा हा निर्धारच प्रकट केला होता. इराण – अमेरिकेची बोलणी फिसकटण्यास इस्रायलही कारणीभूत आहेच. मुळात इस्लामाबादेत झालेली बोलणी परस्परांविषयीच्या कमालीच्या अविश्वासाच्या भुसभुशीत पायावर सुरू झाली होती. इराणने हा अविश्वास जाहीरपणे व्यक्तही केला होता. पाकिस्तानच्या मध्यस्थीने दोन्ही बाजू आधी परोक्ष व नंतर समोरासमोर चर्चेसाठी बसल्या. मात्र, दोन्ही बाजू मुख्य मुद्द्यांवर अडून राहिल्याने चर्चा अनिर्णित राहिली. आता महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे ही चर्चा येथेच संपुष्टात येऊन प्रत्यक्ष युद्ध पुन्हा उफाळणार की चर्चेच्या पुढच्या फेऱ्यांतून काही समझोत्याला वाव राहणार. ही बोलणी फसली तर इराणचा सर्वनाश अटळ असेल अशी धमकी ट्रम्प यांनी पूर्वीच दिलेली आहे. त्यामुळे आता त्यांची भूमिका काय राहील हे अत्यंत महत्त्वाचे असेल. ह्या चर्चेतून तूर्त काही निष्पन्न जरी झाले नसले, तरी पाकिस्तानचा भाव मात्र वधारला आहे. अमेरिका आणि अफगाणिस्तानमधील तालीबान राजवटीदरम्यानही पाकिस्तानने मध्यस्थी केली होती, ज्यामुळे दोहा करार झाला होता. त्यामुळे इराण – अमेरिकेदरम्यान समझोता घडवून त्याचे श्रेय उपटण्याचा पुरेपूर प्रयत्न पाकिस्तानने केला. मात्र, समझोता न घडता पुन्हा संघर्ष सुरू झाला तर पाकिस्तान कोंडीत सापडणार आहे. चर्चा फिसकटत आहे हे पाहताच सौदी अरेबियाशी परस्पर सुरक्षा करार असल्याने पाकिस्तानने आपली लढाऊ विमाने सौदी अरेबियाला रवाना केली. म्हणजे उद्या पुन्हा युद्ध उफाळले आणि त्यात आखाती राष्ट्रे सामील झाली, तर पाकिस्तानला सौदी अरेबियाच्या वतीने इराणविरुद्ध आघाडी उघडावी लागेल. अमेरिकेच्या पाठबळाच्या आशेने पाकिस्तान ह्या संघर्षात फरफटत गेला आहे. अमेरिकेला माघार हवी आहे आणि इराणसाठीही हे युद्ध परवडणारे नाही. परंतु जाता जाता जास्तीत जास्त लाभ पदरात पाडून घेण्याची दोघांचीही धडपड आहे. परंतु अती ताणले की तुटते हा न्याय येथेही लागू होतो. त्यामुळे खरे पाहता अजूनही वेळ गेलेली नाही. दोन्ही बाजूंचे समझोत्याचे शहाणपण जागावे. तेच त्यांच्या व जगाच्या हिताचे आहे.